Tuesday, September 28, 2010

॥ अमृतसरचा सफ़रनामा ॥


पठाणकोटमार्गे आम्ही अमृतसरला निघालो होतो. ट्रेन खचाखच भरलेली होती. गाडीत बर्गर्सपासून ते पापडांपर्यंत वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी येत होते.रात्री आठच्या सुमारास अमृतसरला पोहोचलो. स्टेशनवर तुरळक गर्दी होती. पण, स्टेशन वर सर्वप्रथम लक्ष वेधून घेतलं ते काचेच्या पेटीत ठेवलेल्या स्वर्ण मंदिराच्या प्रतिकृतीने.
सेवा म्हणजे नक्की काय? या गोष्टीचा साक्षात्कार इथे पावला-पावलावर घडत होता. अमृतसर रेल्वे स्थानक ते सुवर्ण मंदिरआणि सुवर्ण मंदिर ते अमृतसर रेल्वे स्थानक अशी छोट्या बसेसची मोफत व्यवस्था मंदिराच्या ट्रस्टतर्फे केलेली असते. (पण, या बसेसमध्येही चिक्कर गर्दी होती. कारण, एकेका शीख कुटुंबातल्या कुटुंबियांची संख्याच एवढी प्रचंड असायची की, संपुर्ण बस त्यांनीच व्यापली जायची. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, च्या घोषणा देत आणि ऐकत आम्ही सुवर्ण मंदिराशी पोहोचलो. मंदिराच्या परिसरातच उपलब्ध असलेल्या सरायामध्ये (धर्मशाळा) अम्हांला जागा मिळाली. या आवारात तर रस्त्यावरही गाद्या अंथरून माणसं झोपली होती.
प्रगतीचे दागिने अंगावर मिरवायला सुरूवात जरी झाली असली, तरी, अंगावरच्या इतिहासाच्या खुणा अमृतसरने अजुनही पुसलेल्या नाहीत. तसंच धार्मिक पावित्र्यही टिकवून ठेवलेलं आहे. अमृतसर हे माझा या दोआब च्या प्रदेशातलं (रावी आणि बियास या दोन नद्यांच्या प्रदेशात) शहर आहे. अमृतसर ज्या महत्त्वाच्या स्थळासाठी सुप्रसिध्द आहे, ते म्हणजे अर्थातच हरमंदिर साहॆब गुरुद्वारा म्हणजेच सुवर्ण मंदिर. शीखांच्या या अतिभव्य सुवर्ण मंदिराचा झगमगाट सबंध जगाला आपल्याकडे आकर्षित करतो आहे.N.R.I. लोकांचीही भेट या गुरुद्वारेला जास्त मिळते. ताज महल पहाण्यास येणार्‍यांहुनही सुवर्ण मंदिर पहाण्यास येणार्‍या विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणिय आहे. आम्हांला क़ुंदन धाब्यावर भेटलेल्या मेक्सिकन तरुणाने सांगितलं, की मेक्सिको देश पृथ्वीच्या गोलावर अमृतसरच्या बरोब्बर विरुध्द दिशेला येतो. म्हणुन, तो तरुण, खास अमृतसरला भेट देण्यास आला होता.
ज्या सुवर्ण मंदिरामुळे अमृतसरला अध्यात्मिक दर्जा प्राप्त झाला, ती जागा शीखांचे चौथे गुरू रामदास यांना अकबर बादशाहने देऊ केली होती. तिथल्याच नैसर्गिक तलावाचा विस्तार केला गेला.पाचवे गुरू अर्जुन देव यांनी या बांधल्या गेलेल्या सरोवराच्या मध्यात हरमंदिर साहॆब मंदिर बांधले. याचे बांधकाम 1574 साली सुरू होऊन 1604 मध्ये पूर्ण झाले. सर म्हणजे सरोवर.अमृतमय पाणी असलेले सरोवर या अर्थी अमृतसर हे नाव या शहरास प्राप्त झाले.
रात्री पोहोचल्यावर ताबडतोब पाय धुवून, डोकं कापडाने झाकून आम्ही गुरुद्वारेत गेलो. रात्री असंख्य बल्ब्सच्या प्रकाशाने सुवर्ण मंदिर झळाळून उठले होते. पाण्यात तेजस्वी प्रतिबिंब हेलकावत होतं. दर्शनाची वेळ खरंतर संपली होती. मंदिरातून गुरू ग्रंथ साहॆब पालखीत बसवून ते विश्रांतीसाठी अकाल तख्त मध्ये नेले जात होते. लंघरमधुन भांड्यांचा प्रचंड आवाज येत होता. येथील लंघर 24 तास चालू असते.दर दिवशी सरासरी 40,000 लोकं तरी येथे जेवतात. पाणी पाजायला, भांडी विसळायला मोठमोठी कुटुंबं पुढे होती. श्रीमंत N.R.I. शीख तुम्हांला येथे निःसंकोचपणे लादी धुवत असल्याचे सहज अढळून य़ेईल.
सकाळी पुन्हा आम्ही मंदिराकडे निघालो. समोर विस्तीर्ण तलाव दिसत होता. सभोवती शुभ्र रंगात न्हाऊन निघलेल्या वास्तू दिसत होत्या. भाविकांचा कोलाहल जाणवत होता.आणि समोर जलाशयामध्ये उभे होते तेजस्वी सुवर्णमंदिर. एका बाजूला शीखांच्या राजकीय सार्वभौमत्त्वाचं प्रतिक असलेलं अकाल तख्त दिसत होतं. या अकाल तख़्तावरही अनेक आघात झालेले आहेत. अठराव्या शतकामधल्या अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणांपासून ते 1984 मध्ये झालेल्या भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये या वास्तूची प्रचंड नासधुस झाली. पण, आजही हे अकाल तख़्त दिमाखात उभं आहे. असे काळाचे कित्येक वार या जागेने आणि या शहराने झेलले आहेत. मंदिराच्या या आवारातच ऑपरेशन ब्लू स्टारच्या रुपाने मृत्यूचे थैमान घातले गेले होते. सुदैवाने, आज मात्र इथे शांततेची अनुभुती मिळते. गुरबाणी, शबद गायनाचे सुर मंदिर परिसरात रात्रंदिवस निनादत होते. गाणार्‍यांचा माईक, वाजवणार्‍यांचे हार्मोनिअम, तबला- डग्गा ही सोन्याने मढवलेले होते. भरजरी आसनावर गुरू ग्रंथ साहॆब विराजमान होते. शीखांच्या दहाव्या गुरूंनी म्हणजे गुरू गोविंद सिंग यांनी अकरावे आणि अखेरचे गुरू म्हणून साक्षात आदि ग्रंथाचीच निवड केली तोच ग्रंथ म्हणजे गुरू ग्रंथ साहॆब.
निळी पगडीवाले, छातीवर पांढरी दाढी रुळत असणारे महंत काचांच्या पलीकडे ग्रंथ साहॆबाचे वाचन करत होते. निळ्या पोषाखातले,पगडीधारी,कमरेला तलवार आणि हातात भाला घेऊन फिरणारे धिप्पाड निहांग सर्वांच्या सुरक्षेसाठी सज्ज होते. पठाणी परिधान केलेले, पगडी बांधलेले, दाढी-मिश्या राखलेले, कमरेला तलवारी, कृपाण लटकवत अतिशय दिलदार पणे आपली चौकशी करणारे उंच-पुरे शीख सरदार फक्त मंदिरातच नाही शहरातही सर्वत्र आढळतात.
सुवर्ण मंदिरापासून पाच मिनीटांच्या अंतरावरच रक्तरंजीत इतिहासाची साक्षीदार जालियॉंवाला बाग आहे. 13 एप्रिल 1919 ला बागेत जमलेल्या नि:शस्त्र हिंदुस्तानी जमावावर जनरल डायरच्या आदेशावरून कुठलीही पूर्वसुचना न देता सतत वीस मिनीटं गोळीबार करण्यात आला होता. झाडण्यात आलेल्या 1650 फैरींनी दीड हजारांहूनही जास्त निर्दोष लोकांचे प्राण घेतले होते. या बागेला केवळ एकच प्रवेशद्वार असल्यामुळे लोकांना सुटकेचा दुसरा कुठलाच मर्ग नव्हता. प्रवेशद्वारच सैनिकांनी रोखून धरलेले होते. जीव वाचवण्यासाठी उंच भिंतींवरून उडी मारण्याचे निष्फळ प्रयत्न ही केले. बागेतील एका भिंतीत घुसलेल्या 28 गोळ्यांची चिन्हं आजही त्या भयाण घटनेची साक्ष देतात. गोळ्य़ांपासून वाचण्यासाठी काही जणांनी बागेतल्याच विहीरीत उड्या टाकल्या. नंतर या विहीरीतून 120 प्रेतं बाहेर काढण्यात आली. ती विहीर आज शहिदी कुवॉं म्हणून जतन केली आहे.ज्या जागेवरून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, तेथेही छोटा दगडी त्रिकोण उभारला आहे. तसेच, अमर ज्योत ही इथे तेवत आहे.फ्लेम ऑफ लिबर्टी या नावाने स्मारक बांधण्यात आले आहे.
एवढं सर्व असूनही या बागेचा आत्मा हरवलेलाच आहे. रक्तलांच्छित इतिहासाची छाया इथे जाणवत नाही.दुर्दैवाने ह्या बागेचा आता पार्क बनून गेला आहे. ही एक वेळ घालवण्याची जागा बनली आहे. ज्या जागी पुर्वी प्रेतांचे खच पडले होते, तेथे हल्ली स्थानिक भणंग मेल्यासारखे घोरत पडले असतात. हा प्रकार जास्त विषण्ण करतो.या स्वैराचाराचं शल्य बाळगावं, की स्वतंत्र भारतात लोकांना मिळालेल्या संरक्षणाचं कौतुक? कारण, आजही इथे प्रवेशासाठी तिच एकमेव ऐतिहासिक बोळ आहे. पण, आज एक विश्वास आहे, की आपल्याला इथे कुठलाही धोका नाही. म्हणुन तर लोक आज इथे बिनधास्त झोपू शकतात... इतिहास उश्याशी घेऊन !
दुपारी बसमधून अटारी ला जाताना लालेलाल खालसा कॉलेज दिसले. 300 एकरच्या भव्य परिसरात पसरलेलं हे कॉलेज 1892 साली बांधलं गेलं. राजवाड्यासारखं भासणारं हे शाही बांधकाम मोंगल वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. हे कॉलेज अमृतसर पासून 8 किमीवर असलेल्या कोट खालसा या गावात आहे.आमचं कॉलेज असं प्रेक्षणिय असतं, तर, आम्ही आयुष्यभर कॉलेजमध्येच वास्तव्य करून राहिलो असतो. बर्‍याच हिंदी व प्रादेशिक सिनेमांचं शुटिंग या कॉलेजच्या आवारात करण्यात आलं आहे. वीर-जारा चित्रपटातही लाहोरचं कोर्ट म्हणून हेच कॉलेज दाखवलं गेलं आहे.
अटारीच्या पुढे बस जात नाही. पुढचे 2-3 किमी सायकल रिक्षेने जात होतो. शुन्य लोकवस्तीच्या प्रदेशातून रिक्षा चालली होती. अस्वस्थ वाटू लागलं होतं. सरळसोट रस्ता, दोन्ही बाजूंनी ओसाड जंगल होतं. इथून 2 किमीवर अटारी स्टेशन आहे. दिल्ली (हिंदूस्तान) ते लाहोर (पाकिस्तान) प्रवास करणार्‍या समझौता एक्सप्रेस ची ट्रेन बदलण्याची ही जागा आहे. काटेरी तारा दिसू लागल्या. मंटो, गुलज़ार, अमृता प्रीतम, खुशवंत सिंग यांच्या कथा-काव्यांमधून वाचलेलं पाकिस्तानचं वर्णन, फाळणीचे ऐकलेले विदारक अनुभव-कथन मन व्यापू लागले.साडे-तीन च्या आसपास वाघा बॉर्डर ला पोहोचलो. अखंड हिंदुस्तानाच्या पेशावर ते सोनारगाव, नारायणगंज अश्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत शेर शहा सुरीने बांधलेल्या ग्रॅंड ट्रंक़ रोड वरच वाघा आहे. पेशावर आता पाकिस्तानाची शोभा वाढवतंय तर, सोनारगाव, नारायणगंज बांग्ला देशाची. फाळणीच्या तडाख्याने हे वाघा गावही दुभंगले आहे. सीमारेषा ठरवणारी रेडक्लीफ् लाईन या गावातूनच गेल्यामुळे वाघा गावाचा एक भाग हिंदुस्तानात तर उरलेला पाकिस्तानात गेला आहे. गोलगप्पे, चाट, मिनरल वॉटर, चहा, पराठे यांचे स्टॉल्स BSF (Border Security Force) हद्दीच्या गेटपाशीच सुरु होतात.अर्धा तास रेंगाळल्यावर गेट उघडले आणि हजारोंच्या संख्येने वाट पहाणारी लोकं बॉर्डरपाशी धावत सुटली. साधारण 500 मी. वर स्वर्ण-जय़ंती द्वार दिसले. पलीकडे पाकिस्तानचे प्रवेशव्दार दिसत होते. मधल्या जागेत सुर्यास्ताच्या समयी रोज ध्वजावरोहण समारोह रंगतो. दोन्ही देशांच्या सहा- साडे सहा फूट उंचीच्या सैनिकांचं मार्चिंग, एकमेक़ांना अंगठे दाखवणं, पाय आदळत होणार्‍या परेडने आसमंत हादरवून सोडला होता. सोबतीला लावलेल्या देशभक्तीपर गाण्यांमुळे जमलेल्या हजारो लोकांच्या देशप्रेमाला उधाण आलं होतं. हिंदुस्तान ज़िंदाबाद, भारतमाता की जय, वंदे मातरम (आणि पलीकडे पाकिस्तान ज़िंदाबाद) या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.घड्याळाच्या काट्यावर घडणार्‍या या संचलनाने वातावरण भारुन गेले होते. देशभक्तीच्या लाटा हिंदुस्तान-पाकिस्तान सरहद्दीवर उसळत होत्या. राष्ट्रगीत झाले व ध्वज उतरवण्यात आला. दोन्ही देशांच्या मध्ये असणारे दरवाजे बंद करण्यात आले. समारंभ संपन्न झाल्यावर आम्ही त्या गेट्स पाशी गेलो. तिथूनच परत फिरावं लागलं. एकेकाळी, पंजाबचं हृदय, हिंदुस्तानाचं मन अश्या विशेषणांनी नावाजलेल्या लाहोरच्या गेट पासून मागे फिरताना वाईट वाटलं. आतंकवाद, शत्रुत्त्व एका बाजुला, पण, जी कधी काळी आपलीच जमीन होती, ती आज आपल्याला निषिध्द व्हावी, हे मनाला डसत होतं. जिस लाहोर नही देख्या, वोह जमियाही नही (ज्याने लाहोर पाहीलं नही, तो जन्मलाच नाही) असं ज्या शहराबद्दल अभिमानानं बोललं जातं, त्या शहराला आपण पारखे झालो आहोत. कित्येक निर्वासित हिंदुंच्या शेतजमिनी, घरं, गावं, नातलग यांच्या रुपाने आपल्या भावजीवनाचा एक घटक अडकून पडला आहे.
BSFच्या ऑफिसर्सशी, सैनिकांशी थोड्या गप्पा झाल्या. BSF चं वस्तुसंग्रहालय पाहिलं. परतीच्या वाटेला लागलो. सायकल रिक्षा धावत होती. दूरवर उंच काटेरी तारांपलीकडे सूर्य विझत होता. अश्या कातरवेळी, मैलों-मैल पसरलेला निर्जन प्रदेश पुन्हा एकाकीपणाची जाणिव करून देत होता.
दुपारी अमृतसरच्या बाजारात फेर-फटका मारला. भर रस्त्यात लाकडी तलवारींनी युध्दाचं प्रात्यक्षिक दाखवणारे शीख विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. कृपाण, तलवारी, पट्टे, कडं, क़ंगवे, क़ाटे, दहा ग़ुरुंचे फोटो, पगड्या यांबरोबरच फुलकारी नक्षीचे कुर्ते, मोजड्या या वस्तुंनी बाजार भरला होता. रंगीबेरंगी सरबतं, बर्फाचे गोळे, कुल्फी,गोलगप्पे, छोले, कुल्चे ठिकठिकाणी गाड्यांवर मिळत होते. अमृतसरचं भोजन आणि लस्सी हा तर लिखाणाचा एक स्वतंत्र विषय ठरेल. लस्सी विकणारे इथे कोपर्‍याकोपर्‍यावर दिसतात. छोट्याश्या वाडग्यातून दही काढून त्याची लस्सी बनवून आपल्यासमोर हजर करतात. मात्र, जालियॉंवाला बागेजवळच्या गल्लीमध्ये मिळणारी लस्सी निव्वळ अप्रतिम. अमृतसरला गेल्यावर जिथे शक्य आहे तिथे, आणि जितकी शक्य आहे तितकी लस्सी प्यायचीच, अशी शपथ तर मी अमृतसरला पोहोचण्यापुर्वीच घेतली होती, आणि ती मोडू नये म्हणून पूर्णपणे प्रयत्न केला. वेगवेगळ्या धाब्यांवर शुद्ध देसी घी मध्ये न्हाऊन निघालेले पराठे, छोले, रायता यांसारख्या पदार्थांनी पोट, मन आणि जीभ भरून पावत होतं. मंदीरापासून जवळच असणार्‍या दी ब्रदर्स धाब्यावर समोर आणलेली भरमसाठ थाळी तर पोटाची परीक्षाच पहात होती. इथल्या रस्त्यांवर मिळणारी कुल्फीही लाजवाब. गोलगप्पे (म्हणजे पाणीपुरी) अतिशय चविष्ट आणि खिशालाही स्वस्त. सरबत पिताना असाच एक वाचलेला जुना किस्सा अठवला. प्रसिद्ध् अभिनेते देव आनंद हे बालपणी गुरुदासपुर येथे रहात. हे गाव अमृतसरच्या जवळच होते. ते बालपणी रोज अमृतसरला येत. अमृतसरची लस्सी, सरबत त्यांचेही लाडके होते. स्वर्ण मंदिराच्या बाहेर सरबत पिण्यासाठी उभ्या असलेल्या छोट्या देव ला सरबतवाल्याने त्याचं कपाळ पाहून भविष्य वर्तवलं की एक दिवस आयुष्यात तू महान व्यक्ती बनशील. असा भविष्यवेत्ता सरबतवाला मला मात्र कुठेही भेटला नाही. तो भेटण्य़ाच्या अपेक्षेने किती वेळा मी स्वतःवर लस्सी, सरबत यांचा मारा केला याची नोंदच नाही.
इथल्या लोकांच्या एकूणच वागण्या-बोलण्यात ग्रामीण ढंग, सेवाभावी वृत्ती जाणवली. मुंबई-पुण्यासारख्या शहरात वावरणार्‍यांच्या लेखी अमृतसरला शहर म्हणणं जरा कठीणच जाईल. विटांचं बांधकाम असलेल्या, जास्तीत-जास्त एक-दोन मजली उंच असणार्‍या अवाढव्य क़ोठ्या, जिल्ह्याचं शहर असूनही फारशी दाटी-वाटी नसलेले रस्ते, रस्त्यावरून धावणार्‍या सायकल रिक्षा, सगळं कसं ज़िंदादिल तरीही अतिशय संथ वाटणारं. म्हणुनच, शहरासारखे शहर असूनही अमृतसर वेगळे आहे. त्याला वेगळा रंग आहे. निसर्ग सौंदर्याच्या भानगडीत न पडलेल्या या शहराने हिंदुस्तानाच्या संस्कृतीवर, आध्यात्मावर, इतिहासावर, अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर अनोखा प्रभाव पाडला आहे. इतिहासाने दिलेल्या अनेक जखमांवर दुर्दम्य आशावादाची फुंकर घालत, वाहे गुरूजी दा खालसा, वाहे गुरूजी दी फते अशी गर्जना करत, अमृतसर अधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. त्यामुळेच, या अद्भुत शहराची भेट अविस्मरणिय ठरते.
आदित्य नीला दिलीप निमकर
9920702917

adi.nimkar@gmail.com

3 comments:

  1. छान लिहिलयस.... पण मित्र नविन पोस्टची वाट बघतोय.... लवकर टाक....

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर सफरनामा आहे.....
    सुरुवातीला एवढा मोठा लेख वाचू कि नको अस झालेलं. पण वाचायला सुरुवात केली आणि संपूर्ण अमृतसर सफर बसल्या जागीच केव्हा पूर्ण झाली काही कळलेच नाही. इतिहासापासून आतापर्यंतच अमृतसर शहराच वर्णन अगदी बोलक्या शब्दांत केले आहेस. खूपच सुंदर.....अमृतसर सफर घडवल्या बद्दल धन्यवाद.....

    ReplyDelete
  3. आदी...खरचं अमृतसरला फेरफटका मारल्यासारखं वाटलं.इतकचं नाही तर, तिथल्या पदार्थांची तू जी काही तारिफ केली आहे, वाचता-वाचता तर जणू माझ्या जीभेवरच ती चव रेंगाळली.

    ReplyDelete