Tuesday, May 3, 2011

२०१०च्या 'लाजरी' दिवाळी अंकासाठी लिहीलेली 'नैना लाल किडवाईं'ची यशोगाथा

ग्लोबली इन्फ्लुएन्सिंग... इनव्हेस्टमेंट बॅंकिंग
नैना लाल किडवाई

HSBC India च्या ग्रुप जनरल मॅनेजर व कंट्री हेड अशी दुहेरी जबाबदारीची भूमिका निभावणे ही स्त्री जागृती... फायनान्स विषयाचा आंतरराष्ट्रीय आयाम जोखणे ही स्त्री अस्मिता... देश-विदेशांच्या अर्थकारणावर आपला ठसा उमटवणे ही स्त्री युक्ती... तर जागतिक स्तरावर प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून मानांकित होणे ही स्त्री शक्ती... समानतेच्या मूलभूत हक्कासाठी अजूनही चाचपडणाऱ्या स्त्रियांसाठी 'नैना लाल किडवाईं यांची ही कहाणी दृष्टीदायी ठरेल...

आजच्या कॉर्पोरेट जगात पुरूषांच्या बरोबरीने भारतीय महिलाही उत्तुंगतेची नवी-नवी शिखरं पादाक्रांत करत आहेत. कला, क्रीडा यांच्या बरोबरीनेच व्यापार उद्योगांमध्येही नाव कमावू लागल्या आहेत.अशाच यशस्वी स्त्रियांमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे श्रीमती नैना लाल किडवाई. नैना लाल किडवाई हे आज इन्व्हेस्टेंट बँकिंगमधील एक गुरूतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. एचएसबीसी हे बँकींग क्षेत्रातील जागति स्तरावरचं एक आघाडीचं नाव. आणि याच बँकेच्या भारतीय शाखेच्या ग्रुप जनरल मॅनेजर तसेच कंट्री हेड या पदांवर श्रीमती नैना लाल किडवाई कार्यरत आहेत.
श्रीमती नैना लाल किडवाई यांचा जन्म १९५७ मध्ये झाला. त्यांचं बालपण मुंबई आणि दिल्लीत गेलं. त्यांचे वडील देशातील एका मोठ्या विमा कंपनीचे CEO होते, तर आई प्रसिध्द उद्योगपती ललि मोहन थापर यांची भगिनी. नैना यांना एक बहिण आहे, जी गोल्फ खेळाडू आहे.
लहानपणी शाळेत असताना छोटी नैना अनेकदा केवळ गंमत म्हणून वडिलांच्या swivel खुर्चीवर बसायची. याच छोट्याश्या गमतीदार खेळाने त्यांच्या मनात भविष्याची बीजं रोवली. शाळेत असताना नैना विविध वादविवाद स्पर्धां मध्ये नेहमी पुढे असायच्या. तसेच,प्रत्येक खेळामध्ये त्या आपल्या शाळेचं प्रतिनिधीत्व करायच्या. एवढ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग असतानाही अभ्यासाकडे कधी त्यांचं दुर्लक्ष झालं नाही. दरवर्षी परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत.
पुढे दिल्ली विद्यापीठातून नैना यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवली.तिथेही नैना यांचा अवांतर गोष्टींमधला सहभाग कमी झाला नव्हता. दिल्ली विद्यापीठाच्या स्टुडंट युनिअनच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली होती, आणि आपल्या असामान्य नेतृत्वगुणांबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला होता. नैना लाल किडवाईंच्या मते, यश संपादन करायचं असेल, तर तुमच्या अंगी उत्तम नेतृत्वगुण असणं आवश्यक आहे.खेळावं तर जिंकण्यासाठीच. जिद्द ही असलीच पाहिजे.आपण भारतीय याच गोष्टीत मागे पडतो. आहे त्या गोष्टीच्या पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रस्थापित दर्जा पार करून नवी क्षितीजं गाठायचा प्रयास करणं ही आजची गरज आहे.
चार्टर्ड अकाऊंटन्सीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नैना १९७७ साली 'प्राईसवॉटरहाऊस फर्म'मध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाल्या. त्यावेळी फर्ममध्ये कार्यरत असलेल्या त्या एकमेव महिला होत्या. त्यामुळे सुरूवातीला त्यांच्या कामाबद्दल सर्वच जण साशंक होते. पण नैना यांनी अजिबात हार मानता आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आणि पुढची तीन वर्षं त्याच संस्थेत स्वतंत्र ऑडिटर म्हणून काम पाहिले. हे काम करताना आपल्या क्लायंट्सचे जमाखर्च,आर्थिक धोरणं,कायदेविषयक तरतुदी असे सर्व अर्थव्यवहार संभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
तरीपण, काम करत असताना नैना यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे जर का या पुरूषांचं वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर अधिकाधिक शिक्षण घ्यायला हवं, पदव्या मिळवायला हव्यात. हाच विचार करून नैना MBA करण्यासाठी अमेरिकेतल्या प्रख्यात'हॉवर्ड बिझनेस स्कुल'मध्ये दाखल झाल्या. १९८२ मध्ये 'हॉवर्ड बिझनेस स्कुल'मधून MBA ची पदवी मिळवलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यानंतर अमेरिकेत भविष्याच्या दृष्टीने अनेक उत्तमोत्तम संधी उपलब्ध असतानाही त्यांच्याकडे पाठ फिरवून नैना मायदेशी परतल्या.
भारतात आल्यावर त्या ANZ Grindlays बरोबर काम करू लागल्या. ANZ Grindlays मध्ये Global NRI Services, investment bank इत्यादी प्रभागांच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८५ मध्ये नैना लाल किडवाई मॉर्गन स्टॅनले,इंडिया मध्ये रुजू झाल्या.२००२ पर्यंत त्या मॉर्गन स्टॅनले, इंडियाच्या विविध प्रकल्पांवर कार्यरत होत्या.काही काळ त्यांनी merchant banking विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिलं. Investment bankingचं क्षेत्र त्या काळात बाल्यावस्थेतच होतं.गुंतवणूक क्षेत्रात लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल याचा विचार किडवाई करू लागल्या. त्या काळात दूरसंचार तसंच माहिती तंत्रज्ञान यांच्या सारखी क्षेत्रं नव्याने उदयाला येत होती. दूरदृष्टी लाभलेल्या नैना यांनी Morgan Stanley,India ला या क्षेत्रांकडे नजर वळवण्यास भाग पाडलं. याचा खुप मोठा फायदा पुढे Morgan Stanley,Indiaला झालाच.या कालावधीत त्यांनी बजावलेली आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे १९९७ मध्ये JM Financials या मुंबईतल्या सुविख्यात वित्तीय संस्थेचा मॉर्गन स्टॅनले,इंडिया बरोबर घडवून आणलेला करार.या जॉईंट व्हेंचर नंतर या बँकेचं नामकरण JM Morgan stanley असं करण्यात आलं.या जॉईंट व्हेंचरमुळे इन्फोसिस,विप्रो यांसारखे नामवंत क्लायंट्स मिळवले.AT&T, टाटा,बिर्ला समुहांच्या बरोबरही असेच धोरण अवलंबले.या बँकेने १९९९ पर्यंत कॉर्पोरेट क्षेत्रात जवळपास ७०० दशलक्ष डॉलर्सचं विलीनीकरण घडवून आणलं.या प्रचंड विस्तारामध्ये किडवाई यांचा सिंहाचा वाटा आहे.नैना लाल किडवाई या अतिशय कुशल,आत्मविश्वासू आणि मुत्सद्दी मध्यस्थ आहेत.
२००२ साली नैना लाल किडवाईंनी HSBC (Hong Kong Shanghai Banking Corporation)बँकेच्या इन्व्हेस्टमेंट बँकींग बिझनेसच्या प्रमुखपदाचा स्विकार केला. एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केटच्या व्हाईस चेअरवुमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर या पदांवर किडवाई यांची नियुक्ती झाली. HSBC मध्ये आधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) आणि नंतर कार्यकारी संचालिका (CEO) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आणि सध्या एचएसबीसी समुहाच्या भारतीय शाखेच्या ग्रुप जनरल मॅनेजर तसेच कंट्री हेड या पदांवर श्रीमती नैना लाल किडवाई कार्यरत आहेत.
नैना लाल किडवाई हे भारतीय अर्थकारणातलं आज एक प्रभावशाली नाव आहे. पण हे नाव काही त्यांनी एका रात्रीत कमावलेलं नाही. कुठल्याही गोष्टीचा ध्यास असणं महत्त्वाचं. व्यवस्थापन हे पुस्तकं वाचून जमत नाही. ते स्वानुभवातून आणि आपल्या सुज्ञपणातून उमगत जाते, आपल्या मानसिक क्षमतेवर अवलंबून असते. व्यवस्थापन ही कुठली वस्तू नाही की प्रक्रीया नाही, तर जगण्याचं एक तत्व आहे.
आपल्या यशाचं श्रेय नैना लाल किडवाई नेहमी आपल्या टीमला देतात. जर तुम्ही नेतृत्व करत असाल, तर तुम्हाला सर्व संघाला एकत्र घेऊन पुढे जाणं जमलं पाहिजे. Investment Banking म्हणजे निरनिराळे विचार आणि वेगवेगळी कौशल्य असणाऱ्या लोकांचं एकत्र येणं होय. एक व्यक्ती केवळ कल्पना करू शकते, योजना आखू शकते. परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेक लोकांचं सहकार्य अपेक्षित असतं. आपल्या सहकाऱ्यांमध्ये स्फुल्लिंग पेटवण्याचं काम करण्यासोबतच नवं नेतृत्व निर्माण करायचं कामही एक उत्तम नेता करत असतो. जॉर्ज बर्नोड शॉ यांचं एक वाक्य आहे.-"Some men see things around them and wonder why! I dream of things that aren’t, and say why not?" (काही लोक आसपासच्या गोष्टींची भुरळ पडून विचारतात की,या गोष्टी कशा काय घडल्या. मी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचं स्वप्न पहाते आणि विचारते की या गोष्टी का घडत नाहीत?) हे वाक्यच नैना लाल किडवाई यांच्या कार्यपध्दतीचे सूत्र आहे.
भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणं हे किडवाई यांचं स्वप्न होतं, आणि तेच स्वप्न त्या आजतागायत जगत आहेत. पण, हे करत असताना त्यांना आपल्या सामाजिक जबाबदारीचा कधीही विसर पडला नाही. आपल्या र्तृत्त्वाचा फायदा समाजातल्या उपेक्षित घटकांनाही व्हावा म्हणून त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. देशभरात सध्या वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्तेची कारणमीमांसा देताना त्या म्हणतात की, आजही ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळत नाही. बँकांनाही कर्जवसूली करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. यातून मार्ग काढण्याची आज खरी गरज आहे.किडवाई यांच्या मते, समाजात आजही एक मोठा वर्ग असा आहे, जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, ज्याला पुरेसं अर्थसहाय्य उपलब्ध होत नाही. या वर्गालाही आपल्या संघटित वित्तीय यंत्रणेत सहभागी करून घेणं गरजेचं आहे. या उपेक्षित वर्गाच्या हातात जेव्हा जास्त पैसा येईल, तेव्हाच तो बचतीचा विचार करू शकेल, त्यासाठी या लोकांना बचतीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. ही बचत बँकेमध्येच ठेवली जाईल.यातून बँकेकडच्या ठेवींमध्ये वाढ होईल.या ठेवींचा वापर विविध उत्पादनांसाठी अर्थसहाय्य पुरवण्यासाठी होईल. अशा प्रकारे देशाच्या आर्थिक विकासाला मोलाचा हातभार लागेल आणि देशातलं दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होईल.
भारतातल्या स्त्री-पुरूष असमानतेवर नेहमीच टीका होत असते. किडवाई यांना स्वतःच्या बाबतीत काम करताना असा भेदभाव कधी जाणवला नाही. पण,एक मात्र खरं की उच्च पदावर काम करताना बऱ्याचदा लोक तुमच्यावर नजर ठेऊन असतात. वाट पहात असतात की, कधी तुमच्या हातून चूक घडते, असं किडवाई यांचं निरीक्षण आहे.
२००३ मध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या बँकर म्हणून नैना लाल किडवाई नावाजल्या गेल्या होत्या. उद्योग जगतातल्या एक आघाडीच्या महिला असल्या, तरी इतर स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचीही त्यांना जाणिव आहे. आजची काही प्रमुख औद्योगिक शहरं सोडली, तर बाकीच्या शहरांमधली स्त्रियांची स्थिती गंभीर आहे. ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधांसाठीही झगडावं लागत आहे. या स्त्रियांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठीही किडवाई प्रयत्नशील आहेत. 'Self Employed Women's Association'(SEWA) या NGO बरोबर किडवाई काम करतात. याद्वारे किडवाई ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारनिर्मितीसाठी सहकार्य करतात. याव्यतिरिक्त विविध संस्थांवर किडवाई काम करत आहेत. सध्या त्या दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेजच्या शासकीय सदस्य आहेत, सिटी ऑफ लंडन्स ऍडवायजरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा आहेत.हॉवर्ड बिझनेस स्कुलच्या ग्लोबल ऍडवायजर आहेत. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या सदस्य म्हणून काम पाहत आहेत.
नैना लाल किडवाई यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा अवाका पाहूनच उर धपापतो. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या कामांमधला समतोल कसा काय साधू शकते! याचं आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. किडवाई याचं श्रेय अंगी बाणवलेली शिस्तबध्दता, वक्तशीरपणा आणि मेहनतीला देतात.
जागतिक स्तरावरचेही अनेक मान सन्मान किडवाई यांना प्राप्त झाले आहेत.फॉर्च्यून मासिकाने २००० साली उद्योग जगतातल्या सर्वाधिक यशस्वी महिलांची जी यादी प्रसिध्द केली, त्यात नैना लाल किडवाई यांचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर होते. मुख्य म्हणजे त्यांनी कमावलेलं हे तिसरं स्थान पुढे २००१, २००२ आणि २००३ असं सलग तीन वर्षं अबाधित राहिलं. २००२ मध्ये टाईम या जगप्रसिध्द मासिकात जगातल्या १५ प्रभावशाली उद्योजिकांमध्ये किडवाई यांची वर्णी लागली.२००६ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने १२व्या क्रमांकावर किडवाईंना मानांकीत केले.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या आपल्या असामान्य कतृत्वाबद्दल भारत सरकारने २००७ साली नैना लाल किडवाई यांना पद्मश्री किताबाने सन्मानित केले.
ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्त्री चा हात असतो, त्याप्रमाणे नैना लाल किडवाई या यशस्वी स्त्री मागे एका पुरूषाचा हात आहे. हा पुरूष म्हणजे त्यांचे पती श्री. राशीद किडवाई. त्यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय हे यश मिळणं अशक्य होतं, असं नैना लाल किडवाई निःसंकोचपणे सांगतात. कुटुंबवत्सल असूनही सतत कामात व्यस्त असल्यामुळे आपल्या दोन्ही लेकरांना वेळ देऊ शकत नाही, याची खंतही किडवाई यांना वाटते.
पण आज नैना लाल किडवाई यांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व अनेक महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. महिलांची बुध्दीमत्ता आणि शिक्षण यांचा मिलाफ केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर व्यवसाय-उद्योगधंद्यांनाही होऊ लागला आहे. आज वित्तीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. १९७७ साली 'प्राईसवॉटरहाऊस फर्म'मध्ये किडवाई एकमेव महिला होत्या आणि त्यांच्या कामाबद्दल जे साशंक होते, तेच आज किडवाई यांना जेव्हा असं सांगतात की ऑफिसमध्ये आता महिलांएवढे उच्चविद्याविभुषित पुरूष कर्मचारी कठीण झाले आहे, तेव्हा नैना लाल किडवाई यांना आपल्या कतृत्वाचा सार्थ अभिमान वाटतो.
- आदित्य नीला दिलीप निमकर
९९२०७०२९१७
adi.nimkar@gmail.com

No comments:

Post a Comment