Monday, September 5, 2011

बेरीज.. काल, आज आणि उद्याची

लोकससत्ताच्या लोकरंग पुरवणीसाठी लिहीलेलं  पुस्तक परीक्षण. 
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=125
आदित्य निमकर 
alt‘मागची पिढी बुरसटलेली आणि पुढची पिढी बहकलेली’ असं मधल्या पिढीचं नेहमीच म्हणणं असतं. पण या दोन पिढय़ांच्या दरम्यान घडलेल्या मधल्या पिढीने बहकलेपणाकडे काहीच वाटचाल केलेली नसते का? मधल्या पिढीचं बहकलेपणही बुरसटलेलं ठरावं इतक्या वेगाने आणि विविध आवेगाने नवी पिढी बदलत असते. दिनकर जोषींच्या ‘एकडा वगारना मिंडा’ या गुजराथी पुस्तकाच्या अंजली नरवणे यांनी केलेल्या ‘अंकरहित शून्याची बेरीज’ या अनुवादित कादंबरीत अशाच पिढी दर पिढी होत असणाऱ्या स्थित्यंतराची कथा मांडलेली आहे.
‘अंकरहित शून्याची बेरीज’ ही कथा आहे व्रजमोहनदास, त्यांचा मुलगा अविनाश आणि अविनाशचा मुलगा प्रतीप यांची. वर्तमानातून भविष्याकडे सरकत असलेली कथा ही थोडय़ा थोडय़ा वेळाने व्रजमोहनदास यांच्या आठवणींद्वारे भूतकाळातही डोकावत असते. कारण, शेवटी वर्तमान असो वा भविष्य, त्याची नाळ ही भूतकाळाशीच जोडलेली असते. व्रजमोहनदास यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईत पाऊल ठेवलेलं असतं. चिकाटीने आणि मेहनतीने व्रजमोहनदासांनी व्यापार सुरू करून भरभराटीला आणलेला असतो. यात त्यांना वेगवेगळ्या लोकांची मोलाची मदत झालेली असते आणि या लोकांचे ऋण व्रजमोहनदासांनी कधीच नाकारले नसते. योग्य मार्गाने मिळेल तेवढा पैसा कमावण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे त्यांची ही सर्व समृद्धी मूल्याधिष्ठित असते. त्यांचा मुलगा अविनाश याला वडलांच्या संघर्षांची जाणीव असते आणि त्याबद्दल खूप आदरही असतो. पण, व्यापार वृद्धिंगत करायचा असेल तर माणसांमध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा नव्या व्यापारात किंवा नव्या जागेत गुंतवणूक करणं अविनाशला महत्त्वाचं वाटतं. व्यापार हातात आल्यावर अविनाश प्रत्येक वेळी वडलांचं मन वळवून आपल्याला हवं तसं करून घ्यायला लागतो. पण, जेव्हा बायकोच्या नावावर घर घेतो, त्या वेळी पहिल्यांदाच व्रजमोहनदासांना अविनाशच्या मानसिकतेतला बदल जाणवतो. अविनाशलाही वडलांच्या नाराजीची पूर्वकल्पना असतेच. त्याचा विचार असतो की बापूजींचा राग आज नाही तर उद्या मावळेल. पण, आपल्या मुलांच्या भविष्याची तरतूद म्हणून व्यापारात अधिकाधिक नफा मिळवून आपला उत्कर्ष साधणं त्याला महत्त्वाचं वाटत असतं. नात्यांचं महत्त्व अविनाशला मान्य असतं, पण त्यावर वारेमाप पैसे उधळणं त्याला पटत नसतं. अविनाश  व्रजमोहनदासांचा एकुलता एक मुलगा असतो. वडलांचा सगळा व्यापार, सगळी संपत्ती आपल्याकडेच येणार आहे हे त्याला माहीत असतं, पण तरीही त्याला आपल्या मोठय़ा बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची भीती वाटत असते. वडलांनी आपल्या संपत्तीतला अर्धा वाटा तिला दिला तर आपल्या मुलांचं कसं होणार या विवंचनेत अविनाश असतो. पण, जशी आपल्याला आपल्या मुलांची काळजी आहे, तशीच आपल्या वडलांना आपली आणि बहिणीची काळजी आहे हे तो विसरून जात असतो.  अविनाशला आणखी एका गोष्टीची चिंता भेडसावत असते. वडलांनी आपला सर्व व्यापार आता त्याच्याकडेच सोपवलेला असतो. मात्र त्यांचं चांगलं नाव असणाऱ्या, पैसा मिळवून देणाऱ्या चित्रपट वितरणाच्या व्यवसायापासून मात्र वडील अविनाशला जाणूनबुजून दूर ठेवत असतात. त्यांच्या स्वच्छ चारित्र्याला कंचनीबाई नावाचं गालबोट लागलेलं असतं. पण, या संबंधांनाही नैतिक ठरावी अशी उदात्ततेची एक करुण किनार लाभलेली असते. अर्थात त्यातूनही ते कुणावर अन्याय करत नाहीत.
अविनाशची मुलं मात्र वयात आल्यावर फारच पुढे निघून गेल्याचं अविनाशच्या लक्षात येतं. अविनाशचा वकिली शिकणारा मुलगा प्रतीप वडलांशीच वकिलीची भाषा करू लागतो. त्याला आपल्या वडलांचं वागणं अव्यवहारी वाटायला लागतं. तो घरचा जुना ‘धंदा’ न करता जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या रॅप शोजचं ‘कल्चर’ मुंबईत आणायचा घाट घालतो. वडलांशी भांडण करून तो यासाठी पैसे मिळवतो. अनेक नैतिक-अनैतिक गोष्टी करून यशस्वीही होत जातो. कारण, नैतिकता ही पैशापेक्षा मोठी नाही, हा विचार त्याच्यात पूर्णपणे रुजलेला असतो. थोडंफार गैरवर्तन अविनाशकडूनही झालेलं असल्यामुळे तोही आपल्या मुलांना समजावण्यासाठी आवश्यक असलेला खंबीरपणा गमावून बसला असतो. अशा प्रकारे पुढे जात असलेलं पण दिशाहीन असणारं चक्र पूर्ण होतं.
समृद्धीला महत्त्व देताना जो मूल्यऱ्हास आपल्याकडून होत आहे, त्यावर ही कथा आहे. एक अंकापुढे जितकी शून्यं वाढवत नेऊ, तितके आपण श्रीमंत होतो हे खरं, पण ही नुसती लौकिकार्थाने मिळवलेली श्रीमंती किती खरी? ही सगळी शून्यं ज्या एक अंकाच्या दावणीला बांधली आहेत तो अंकच नष्ट झाला, तर नुसत्या शून्यांना काय किंमत राहणार? हाच प्रश्न ही कादंबरी मांडते. पैसा कमावण्याच्या नादात, शून्य वाढवण्याच्या नादात अविनाश धावत असतो. पण मन:शांती असणारा, नीतिमूल्यं असणारा मूळचा एक अंकच तो विसरून जातो. धंद्याला प्रतिष्ठेची गरज नसते असं मानून ‘धंदा’ करणारा प्रतीप पाहून त्याला जाणीव होते की या नुसत्या शून्यांनी सगळंच नियंत्रणाबाहेर नेलं आहे. त्यांना नैतिकतेच्या, शिस्तीच्या, सचोटीच्या एक अंकाचं अधिष्ठान आवश्यक आहे. कारण ही मूल्यंच तुमच्या समृद्धीचा डोलारा ताठ मानेने सांभाळू शकतात. पैसा मिळवताना त्यासाठी आपण संस्कारांनाच तिलांजली देत आहोत याची कुठलीही शिकवणी न देत बसता ही कादंबरी आपल्या विवेकबुद्धीलाच हा प्रश्न विचारते आणि पुस्तक वाचून संपल्यावरही आपल्या मनातून आणि डोक्यातून हा प्रश्न जात नाही.. हेच या पुस्तकाचं मोठं यश आहे.


अंकरहित शून्याची बेरीज
मूळ लेखक - दिनकर जोषी, 

अनुवाद - अंजली नरवणे  
पृष्ठे- १६८, 
मूल्य - १६० रुपये

No comments:

Post a Comment