Saturday, March 23, 2013

तहसीलदार कँटीनची झणझणीत मिसळ


 
मुंबईचं धाकटं भावंडं समजल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये खवय्येगिरीसाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणची रेस्टॉरंट्स, डायनिंग हॉल तर जागोजागी मिळणारे वडापाव, चाट कॉर्नर्सवर लोकांची गर्दी दिसते. स्टेशनपासून काही अंतरावर असणारं एक ठिकाण मात्र कायम गर्दीने अक्षरशः झाकून गेलेलं असतं. ते रेस्टॉरंट नाहीये. ती वडापावची गाडीही नाहीये. ना ती कुठली खानावळ आहे. ते ठाण्याच्या मामलेदार कचेरीखाली असणारं एक कँटिनसदृश ठिकाण. हे सुप्रसिद्ध आहे ते येथे मिळणाऱ्या मिसळीसाठी. इथली तिखट झणझणीत मिसळ संबंध मुंबईत फेमस आहे. लोक इथे लाईन लावून उभे असतात. रोज सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १०.३० पर्यंत हे कँटीन सुरू असतं. रविवारी मात्र कँटीन बंद असतं. एक प्लेट मिसळ मागवल्यावर 2 ग्लास पाणी लागतंच लागतं. आणि नाका-डोळ्यांतूनही चांगलंच पाणी निघतं. या कँटीनबद्दल अधिक माहिती मिळाली ती त्याचे मालक लक्ष्मण मुरुडेश्वर यांच्याकडून


 
या हॉटेलचं नक्की नाव काय आहे?
नाव असं काहीच नाही. पहिल्यापासून सगळे याला तहसीलदार कँटीन असं म्हणतात. याच नावाने सगळे ओळखतात.
 
कधी सुरू झालं हे कँटीन?
 
साधारण 46 -47 साली कँटीन सुरू झालं. माझे वडील नरसिंह मुरूडेश्वर यांनी हे कँटीन सुरू केलं होतं. आमचं मूळ गाव कारवारमधील मुरूडेश्वर. पण तिथल्या हालाखीच्या परिस्थितीमुळे वडील इथे आले. तहसीलदार कार्यालयाखाली चहापाण्याची टपरी सुरू केली. त्याचंच आता वाढता वाढता हे कँटीन बनलं आहे. १९५२ पर्यंत माझे वडीलच हे कँटीन संभाळत होते.
 
हे कँटीन प्रसिद्ध कशामुळे झालं?
 
खरं सांगायचं तर १९६० सालापर्यंत फारसं गिऱ्हाईक नव्हतंच आमच्याकडे. तहसीलदार कार्यालयामुळे थोड्या प्रमाणात चालत होतं कँटीन. पुढे ठाणे शहर मोठं होऊ लागलं, लोकसंख्या वाढू लागली. ठाण्यातली वस्ती वाढली. त्यामुळे आमच्या कँटीनला बरे दिवस आले. MIDC इथे आल्यापासून आमच्याकडील मिसळीचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला. आज आमच्याकडे ६० लोक काम करतात.
 
हे कँटीन मिसळीसाठी एवढं प्रसिद्ध कसं झालं?
 
इथली मिसळ खूप तिखट आणि झणझणीत असते. त्यामुळे ज्यांना झणझणीत खायची आवड आहे, ते लोक हमखास आमच्याकडे मिसळ खायला येतात. ही मिसळ खाताना नकातून, डोळ्यांतून पाणी येतंच येतं. ज्या लोकांना एवढी झणझणीत मिसळ खाणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही मीडियम तिखट मिसळही बनवतो. तरी लोकांना तडका मारलेली झणझणीत मिसळच हवी असते. आम्ही इतरही अनेक पदार्थ कँटीनमध्ये ठेवले आहेत. अगदी लाडू, शंकरपाळेसुद्धा आमच्याकडे मिळतात. पण सर्वाधिक खप होतो तो मिसळीचाच. ताक, लस्सी, कोल्ड ड्रिंक्सही चांगल्या प्रमाणात विकली जातात. पण त्याचं श्रेयही आमच्या झणझणीत मिसळीलाच जातं. दिवसाला कमीत कमी १००० प्लेट्स मिसळ तरी जातेच जाते.

 
तुमच्याकडील मिसळ बऱ्याच राजकारण्यांमध्ये, अभिनेत्यांमध्ये प्रसिद्ध आहे...

 
आहे खरी.. पण ते लोक इथे येऊन कधी मिसळ खात नाहीत. ही जागा खूप लहान आहे. भर बाजारपेठेत आहे. त्यामुळे एखादे नेते ठाण्यात आले असतील, तर त्यांची माणसं इथून मिसळ पार्सल घेऊन जातात. राज ठाकरेंना आमच्याकडील मिसळ आवडते. पण, ते कधी इकडे येऊन तर खाणार नाहीत. त्यामुळे मी खात्रीपूर्वक त्याबद्दल सांगू शकत नाही. कलाकारांचं म्हणाल, तर गडकरी रंगायतनला बऱ्याच वेळा आमच्याकडील मिसळ मागवली जात असते. त्यामुळे बऱ्याच मराठी कलाकारांना आमच्याकडील मिसळ आवडल्याचे अभिप्राय आम्हाला मिळाले आहेत.
 
तुम्हीही पहिल्यापासून हे कँटीन संभाळण्याचंच काम करायचं ठरवलेलंत का?
 
ते आपोआप घडलं. हे कँटीन एवढं मोठं होईल, प्रसिद्ध होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण १९६० नंतर ते नावारुपाला आलं. तो पर्यंत मी वडिलांसोबत इथे यायचो. शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यामुळे यातच पुढे लक्ष घालायचं ठरवून मी काम करू लागलो. कँटीन संभाळणारी माझी पिढी ही दुसरीच. या पिढीत मी एकटाच असल्यामुळे मीच कँटीन संभाळू लागलो.

 
वडिलांनंतर तुम्ही कँटीन संभाळू लागलात, तेव्हा मिसळीची ती चव ठेवणं कसं जमलं?
 
आमच्याकडे पहिल्यापासून मिसळीसाठी मसाल्यांचं एक माप ठरवून दिलेलं आहे. त्याच प्रमाणात आम्ही आजही मसाले घालतो. त्यामुळे मिसळीची चव अबाधित राहिली आहे.

 
हे कँटीन संभाळणारी तुमची दुसरी पिढी... पुढच्या पिढ्यांचा काय विचार आहे?
 
१९९१ साली आम्ही जवळच आमंत्रण हॉटेल उघडलं. माझा मुलगा ते हॉटेल संभाळतो. त्याचा मुलगा सध्या कॉलेजला आहे. त्याने पुढे या व्यवसायात उतरायचं की नाही, हे तोच ठरवेल.
 
केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित राहाण्याचा विचार आहे की मुंबईतसुद्धा ही मिसळ उपलब्ध करून देण्याच्या योजना आहेत?
 
व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे. पण, वयाप्रति ते मला सध्या शक्य वाटत नाही. माझं वय आता ६३ आहे. भविष्यात पुढच्या पिढ्यांनी त्यासाठी काम केलं, तर नक्कीच मुंबईतसुद्धा आमची मिसळ मिळू शकेल.

-    रवीश निमकर
९९२०७०२९१७
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)


1 comment: