Saturday, December 13, 2014

'फिल्मी' गर्लफ्रेंड



युथचा लाडका भारतीय इंग्रजी लेखक चेतन भगत याचं नवं पुस्तक 'हाफ गर्लफ्रेण्ड 'या पुस्तकाची मी लोकप्रभा या मराठीतल्या अग्रगण्य साप्ताहिकासाठी लिहिलेली समीक्षा... या समीक्षेचं unedited व्हर्जन या ब्लॉगवर प्रसिद्ध करत आहे... या समिक्षेसोबत चेतन भगतची मुलाखतही मी घेतली होती, जी काही कारणास्तव प्रसिद्ध केली नाही.. ती मुलाखतही लवकरच या ब्लॉगवर अपडेट करेन...


चेतन भगतचं पुस्तक म्हणजे तरुणांसाठी पर्वणीच! सहसा इंग्रजीच्या वाट्याला न जाणारा भारतीय तरुणही चेतन भगतचं पुस्तक आवर्जून वाचतो. चेतन भगतने भारतीय इंग्रजी साहित्यात केलेली क्रांती दुर्लक्षित करताच येणार नाही. साधारण दशकभरापूर्वी 'फाईव्ह पॉइंट समवन' लिहून बॉलिवूड स्टाईल फिल्मी इंग्लिश पुस्तकांचा फक्त नवा ट्रेंडच सेट केला नाही, तर नवं मार्केट खुलं करून दिलं. चेतनच्या लिखाणातून इंग्रजी साहित्यात किती मोलाची भर पडली यावर टीकाकार वाद घालत असले, तरी देशी  इंग्रजी लेखकांच्या आणि वाचकांच्या संख्येत मोलाची भर मात्र नक्कीच पडली.

चेतन भगत स्टाईल पुस्तकं लिहिणारी एक पिढीच इंग्रजी साहित्यात निर्माण झाली. पण जसं दोन जेवणांच्या मध्ये लागणारी भूक भागवण्यासाठी चिवडा, फरसाणसारखे पदार्थ लोक खातात, तसंच चेतन भगतच्या दोन पुस्तकांमध्ये पडणाऱ्या गॅपमध्ये वाचकांची भूक भागवणारं चेतन भगत स्टाईलचं लेखन करणाऱ्या तरुण लेखकांची एक फलटणच भारतात निर्माण झाली.  आणि प्रकाशकांनाही सुगीचे दिवस आले. रस्त्यांवर पुस्तकं विकणाऱ्यांच्या पुस्तकविक्रीतही वाढ झाली. त्यामुळेच, जेव्हा 'हाफ गर्लफ्रेंड' हे त्याचं पुस्तक प्रकाशित होणार होतं, तेव्हा तो प्रकाशन सोहळा न राहता मेगा इव्हेंट बनला. 'फ्लिपकार्ट'ने बड्या इंग्रजी दैनिकाचं पहिलं पान 'हाफ गर्लफ्रेंड'च्या जाहिरातीने व्यापलं. प्री-ऑर्डर बुकिंगमुळे प्रकाशनाच्या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरलाच बहुसंख्य वाचकांच्या हातात हे पुस्तक पोहोचलं. प्रकाशनाच्या इव्हेंटचं इंटरनेटवर लाईव्ह चित्रिकरण लोकांना पाहायला मिळत होतं. बॉलिवूड स्टार कृती सॅनॉनने पुस्तकातला काही भाग वाचून दाखवला. मोहित सुरी या दिग्दर्शकाने आपण या पुस्तकावर सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं. मल्लिका-ए मालिका एकता कपूर या सिनेमाची निर्मिती करणार असून स्वतःचेतनही निर्मिती प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं. एकुणच 'हाफ गर्लफ्रेंड'बद्दल तरुणांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात चेतनला यश आलं.

चेतन भगतचं पुस्तक म्हणजे वाचकांच्या आणि टीकाकारांच्या उड्या पडणं ठरलेलंच असतं. हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाच्या नावापासूनच त्यावर टीका व्हायला लागली. पण खरंतर टीका होण्यासारखं यात काहीच नाही. मुळात पुस्तकाच्या नावाचा आणि पुस्तकातील कथेचा काहीही संबंध नाही. पण आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या नावाचा अंकांशी संबंध आणायचाच असा जो चेतनचा प्रयत्न असतो, त्या प्रयत्नांतून हाफ गर्लफ्रेंड हे शीर्षक जन्माला आलेलं वाटतं.  

अर्थात या कथेत मांडलेला विषय नक्कीच वेगळा आहे आणि महत्त्वाचाही. सध्याच्या भारतीय तरूण लेखकांनी साहित्यात वर्गभेदाबद्दल फारसं लिहिलेलं नाही. कदाचित शहरी तरुणांना वर्गभेद हा विषय फारसा अपिलिंग वाटणार नाही, असा समज असू शकतो. मात्र चेतन भगतने हा विषय आपल्या नव्या कादंबरीत कॉलेजगोईंग तरुणांना आवडेल अशा मांडून चांगलं काम केलं आहे. मात्र ६० पासून ते ९० च्या दशकापर्यंत बहुतेक बॉलिवूड सिनेमांचा फॉर्म्युला अशाच स्वरूपाचा आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हटलं तर हेच की इंग्रजीचा न्यूनगंड असणाऱ्या मुलाची इंग्रजी वातावरणातली घुसमट इंग्रजी पुस्तकातून लोकांसमोर आणणं. कॉलेजमधल्या सुरुवातीच्या दिवसांत इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण न झालेल्या अनेक मुला मुलींना इंग्रजीबद्दल भीती असते. कित्येक उच्चभ्रु इंग्रजाळलेल्या वातावरणातली मुलं इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत बोलणं कमीपणाचं समजतात. अशाच वातावरणात बिहारमधल्या दुर्गम भागातला बास्केटबॉलपटू मुलगा स्पोर्ट्स कोट्याद्वारे दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजात दाखल होतो. अशा कॉलेजांमधल्या हाय-फाय वातावरणाचं सुप्त आकर्षण आणि त्याचबरोबर स्वतःबद्दल वाटू लागणारा कमीपणा त्याला छळायला लागतो. अगदी पहिल्या मुलाखतीमध्येच डोक्यात हिंदी वाक्य इंग्रजीत भाषांतरित करून बोलताना त्याची उडणारी धांदल आणि त्यावर थंड पण बोचरी ब्रिटिश पद्धतीची प्रतिक्रिया देणारे कॉलेज प्रोफेसर्स या प्रसंगातच विषयाबद्दल अवाका जाणवू लागतो. ‘Without English I felt naked’ हे वाक्यच खूप काही सांगून जातं.

अर्थात 'व्हॉट यंग इंडिया वॉण्ट्स' पासूनच चेतनचा तरुणांकडे बघण्याचा उद्देश बदललेला दिसत आहे. तरुणांचे प्रश्न, त्यांची धम्माल आणि रोमान्स एवढ्यापुरताच मर्यादित न राहाता राजकारण, समाजकारण आणि त्यात तरुणांचा सहभाग हा विषय चेतनला महत्त्वाचा वाटतो. '३ मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' पुस्तकात नको असतानाही राजकारणाशी संबंध आल्यामुळे गुजराती तरुणांवर ओढावलेली बिकट परिस्थिती चेतनने मांडली होती. मात्र, 'रेव्होल्युशन २०२०' या पुस्तकात तरुणांचा राजकारणातला सहभाग किती महत्त्वाचा ठरू शकतो, हे त्याने लिहिलं. या कथेत प्रेम-त्रिकोण रचला असला, तरी शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाची महत्त्वपूर्ण पार्श्वभूमी या कथेत जास्त प्रभावी ठरली होती. 'हाफ गर्लफ्रेंड'मध्येही प्रेमकथेला सामाजिक भानाची किनार दिली आहे. दिल्लीमध्ये शिकून तिथेच गब्बर पगाराची नोकरी करण्याची संधी उपलब्ध असतानाही आपल्या दारिद्र्य भरलेल्या गावात जाऊन आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या शाळेची स्थिती सुधारणं 'हाफ गर्लफ्रेंड'मधल्या माधवला जास्त महत्त्वाचं वाटतं. शाळेला चांगली देणगी मिळावी यासाठी थेट बिल गेट्सला गवसणी घालतो. त्याच्यासमोर भाषण देता यावं यासाठी इंग्रजी शिकतो.

अर्थात कथा एवढीच नाही. सुरुवातीला इंग्लिश वातावरणात होणारी घुसमट, हाय-प्रोफाईल मुलीला ‘पटवण्यासाठी’ माधवची होणारी तगमग, रानटी रागाचा आणि वासनेच्या आवेगात तोंडातून निघणाऱ्या अर्वाच्य हिंदी शिविगाळीतून मुलीशी होणारं गैरवर्तन ही या कथेची महत्त्वाची अंगं आहेत. खरंतर याच वळणांवर कथा जास्त वाचनीय वाटते. मात्र दिल्ली ते बिहार, बिहार ते न्यूयॉर्क असा कथेचा होणारा प्रवास मात्र रटाळ होत जातो. जमीनदारी गेल्यावरही नावापुरती असणारी श्रीमंती टिकवण्याचा माधवच्या आईचा प्रयत्न, घटस्फोटित रियाचं गावात माधवबरोबर राहाण्याने त्याच्या आईला येणारा राग चुकीचा असला, तरी समजून घेण्यासारखा आहे. मात्र त्यातही चेतन भगतच्या पावलांवर पाऊल ठेवून लिहिणाऱ्या नव्या लेखकांच्या कथांमध्ये असणारा कथाभागच चेतनने वापरलेला दिसतो. उदाहरणार्थ, रियाला कॅन्सर असणं. कथेच्या दुसऱ्या टप्प्याच्या क्लायमॅक्सला माधवचं ईप्सित साध्य होताच तिचं त्याच्या आयुष्यातून निघून जाणं हे फारसं नाविन्यपूर्ण वाटत नाही. ‘बडे घर की लडकी असणाऱ्या रियाच्या वडिलांचा बडेजाव, त्यांनी तिच्यावर बालवयात केलेल्या लैंगिक अत्याचाराचे ओझरते उल्लेख, तिच्या मनाविरुद्ध श्रीमंत एनआरआय मुलाशी तिचं लग्न लावून देणं, या नवऱ्याचं दारू पिऊन तिला मारहाण करणं यातून विनाकारण श्रीमंत लोकांना जुन्याच परिप्रेक्ष्यातून पाहिलं जात असल्याचं जाणवतं. ‘खरं प्रेम श्रीमंतांच्या महालात नाही तर गरीबाच्या झोपडीतच...’ असं बॉलिवूडच्या निर्मितीपासून वापरलं गेलेलं घिसंपिटं प्रकरण या पुस्तकात आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून घरी परतलेल्या रियाला तिचे आई-वडील पुन्हा नवऱ्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करतात. ‘अपने ससुराल वापस जा, लोग क्या कहेंगे’ असे संवाद ऐकवतात, हे मॉडर्न वाचकांना फारसं रुचणारं नाही. बरं, कथा फिल्मी होण्याचा प्रकार इथेच थांबत नाही. तर तो पाना पानागणिक वाढतच जातो. त्यात इंग्रजीचा न्यूनगंड, वर्गभेद हे मुद्दे मागेच राहतात. ‘बिल गेट्स फाऊंडेशन’च्या मदतीने न्यूयॉर्कला जाणारा माधव तिथे जाऊन इंग्रजीतून संवाद साधून आपलं स्थान, आत्मविश्वास मिळवतो असं दाखवलं असतं, तर कथा जरा प्रेरणादायी वाटली असती, किंवा निदान विषय भरकटलेला तरी वाटला नसता. पण ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही फिल्मी प्रेमकथा असल्यामुळे माधव रियाला शोधत शोधत न्यूयॉर्क गाठतो, ते ही बिल गेट्स फाऊंडेशनच्या मदतीने. रिया न्यूयॉर्कच्या एखाद्या पबमध्ये गात असावी, एवढ्या एका अंदाजावरून माधवचं न्यूयॉर्कला जाणं, तिथे सराईताप्रमाणे वावरणं तार्कसंगत नाही. अर्थातच ही चेतन भगतने रचलेली प्रेमकथा असल्याने तर्कशास्त्राला चार हात दूरच ठेवावं लागतं.

खरंतर या कथेत इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष, वर्गभेद, स्त्री मुक्ती, शिक्षण यंत्रणेतले प्रश्न असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र कथा ज्या पद्धतीने मांडली आहे, ती कथनशैली फारच साधारण आहे आणि मोठमोठ्या मुद्द्यांना कथा फक्त स्पर्शून जाते, खोलात शिरत नाही. कदाचित, या विषयांशी मेट्रो रिडर्सशी निदान तोंडओळखही व्हावी, अशीच चेतन भगतची इच्छा असावी.

कॉलेजच्या दिवसांबद्दल लिहिण्याबद्दल चेतन भगत लोकप्रिय आहे. तरी या पुस्तकातलं कॉलेज लाईफ तितकंसं मजेदार वाटत नाही. मुलांच्या मनात मुलींबद्दल असलेल्या भावना धमाल ‘वन-लाईनर्स’मधून मांडण्यात चेतन भगतचा हातखंडा आहे. मात्र या पुस्तकात मनातल्या मनात गुदगुल्या व्हाव्यात किंवा निदान गालातल्या गालात हसावं असं काहीच नाही. एका मागोमाग घडणाऱ्या घडामोडींचीच मालिका आहे, त्यामुळे पुस्तक वाचत राहावंसं वाटतं. पण रटाळही वाटतं. कित्येकवेळा तर लेखकानं इथेच पुस्तक संपवलं असतं, तर बरं झालं असतं, असंही वाटून जातं. मात्र अवाजवी ‘ट्विस्ट्स अँड टर्न्स’ पुस्तकाचा चार्म घालवून टाकतात.
'फाईव्ह पॉइंट समवन' आणि 'टू स्टेट्स' या स्वानुभवावरून लिहिलेल्या पुस्तकात चेतनचं लिखाण जेवढं मजेदार वाटतं, तेवढं इतर पुस्तकांत वाटत नाही. आपल्या कॉलेज लाईफबद्दल लिहिताना खुलणारा चेतन हाफ गर्लफ्रेंड लिहिताना खुललेला वाटत नाही. एक मात्र खरं, की चेतनच्या लिखाणात थोडीबहुत प्रगल्भता यायला लागली आहे. केवळ तरुणांची धम्माल- मस्ती, विवाहपूर्व सेक्स या त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या मांडणीत असणारा समान धागा या पुस्तकात नाही. या सर्वांच्या पलिकडे जाण्याचा चेतन भगतने प्रयत्न केला आहे. उथळपणा कमी करत तरुणांना सामाजिक जाण देण्याचा चेतनचा प्रयत्न तितक्याच रंजक कथासूत्रातून व्यक्त झाला, तर चेतन भगत 'सर्वाधिक वाचला जाणारा भारतीय इंग्रजी लेखक' या वाचकप्रिय बिरुदावलीपल्याड जाऊन टीकाकारांनाही गप्प करू शकेल.


'लोकप्रभा'मध्ये  प्रकाशित झालेला लेख वाचण्यासाठी- http://goo.gl/ve2cSy


- आदित्य नीला दिलीप निमकर
9920702917
adi.nimkar@gmail.com

No comments:

Post a Comment