Sunday, July 26, 2015

'शिवरायांचा आठवावा पराभव'... नरहर कुरुंदकरांच्या नजरेतून


गेल्या आठवड्यात बदलापूरला संपन्न झालेल्या 'अक्षरसंध्या' कार्यक्रमात आचार्य नरहर कुरुंदकर यांच्या साहित्यावर भाषण देण्याची मला संधी मिळाली.  मी रणजीत देसाईंच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीला कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना भाषणाचा विषय म्हणून निवडली. महाराजांच्या पराभवांची कारणमीमांसा करणाऱ्या प्रस्तावनेत कुरुंदकर शिवाजी महाराजांचा वस्तुनिष्ठ नजरेने व्यक्तिवेध घेतात, हे मी माझ्यापरीने कार्यक्रमात मांडलं. दैवतीकरणापेक्षा, व्यक्तीस्तोम माजवण्यापेक्षा माणूस म्हणून पराभव स्वीकारत, त्यावर मात करत शिवाजी महाराज कसे घडले हे जाणून घेणं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि जास्त विश्वासाने देशाला पुढे नेण्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. अनेकांनी त्यानंतर पूर्ण भाषण माझ्याकडे मागितलं. ते आज मी ब्लॉगवर अपलोड करतोय. या विषयावर मला बोलायची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि श्रोत्यांचे आभार...



नमस्कार, सर्वप्रथम मला बोलायची संधी दिली याबद्दल आयोजकांना धन्यवाद. माझं कुरुंदकरांवर वाचन असलं, तरी बराच काळ मध्ये गेला, ज्यामुळे प्रत्येक मुद्दा माझ्या डोक्यात नाही. इतक्या कमी वेळात मला फारशी तयारीचीही संधी मिळाली नाही. तरी, कुरुंदकर माझे सर्वांत आवडते लेखक असल्यामुळे मी बोलायची संधी सोडणं शक्य नाही.

कुरुंदकरांचे लेख, राजकारण, समाजशास्त्र, संस्कृती, व्यक्तिवेध असं सर्वस्पर्शी आहे. शिवरात्र, जागर, मागोवा, रूपवेध वाचणाऱ्यांना त्यांचा अवाका माहीतच आहे. साहित्यावरचं समीक्षात्मक लिखाण मला फारसं झेपलं नाही, त्यामुळे ते वाचन कमी पडलंय. पण व्यक्तिमत्वांची त्यांनी केलेली समीक्षा मला जास्त भावते. त्यातूनही त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना मला आकर्षित करतात. त्या स्वतंत्र लेख म्हणाव्या अशाच आहेत. पण मांडण्यांची पद्धत आणि औचित्य मला गमतीदार वाटतं.

इरावती कर्वे यांच्या संस्कृती या पुस्तकात त्यांची प्रस्तावना वजा समीक्षा वाचायला मिळते. आता इरावतीबाईंचं पुस्तक आणि त्यात कुरुंदकरांचं लिखाण समाविष्ट असणं खूपच लिथल कॉम्बिनेशन आहे. मला या प्रस्तावनेबद्दल स्वतंत्रपणे बोलायला आवडेल. पण विषय जरा क्लिष्ट आहे. त्यापेक्षा मी दुसऱ्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आताचा विषय म्हणून मी निवडलंय. ती प्रस्तावना म्हणजे श्रीमान योगी या पुस्तकाची. हे पुस्तक निवडण्याचं कारण म्हणजे मला वाटतं, उपस्थितांमधल्या बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेल. आणि शिवाजी महाराज म्हणजे अर्थातच आपल्या सर्वांचं आवडतं, वंदनिय व्यक्तिमत्व. आराध्य दैवतच... त्यांना दैवत म्हणतोय... म्हणूनच कुरुंदकर मला आता जास्त रिलिवंट वाटतायत.

रणजीत देसाईंनी महाराजांवर लिहिलेली आणि खूप गाजलेली कादंबरी म्हणजे श्रीमान योगी. मराठीत शिवाजी महाराजांवर झालेल्या बहुतेक कादंबऱ्या या एकाच दिशेने पुढे सरकल्या आहेत. व्यक्तिपुजेच्या दिशेने. श्रीमान योगीही त्याला अपवाद नाही. पण गंमत अशी की या कादंबरीला प्रस्तावना लिहिली ती कुरुंदकरांनी आणि त्यातही धागा असा पकडलाय, की शिवाजी महाराजांचा पराभव अधोरेखित करणारा. आता महाराजांचं दैवतीकरण सुरू असताना, जे आजही सुरूच आहे. त्यात तर्कशुद्ध विचार करायला गेलं की काय घडतं, हे आपल्याला माहीत आहे. गोविंद पानसरे यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे.

रणजीत देसाईंनी श्रीमान योगीसारख्या पुस्तकासाठी कुरुंदकरांकडे प्रस्तावना मागावी, त्यांनी ती द्यावी आणि ती पुस्तकाच्या प्रकृतीला साजेशी वाटूनही वेगळ्या वाटेवरची ठरावी अशी असणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती स्वीकारली जाणं हा महाराष्ट्रातल्या साहित्य सांस्कृतीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुद्धिवादी विजय आहे.
बरं, श्रीमान योगी पुस्तकाला कुरुंदकरांनी प्रस्तावना देताना महाराजांच्या पराभवांबद्दल का लिहावं?

असेलही पराभव झालेला, पण आपण आपल्या महाराजांच्या पराभवाची विश्लेषणं करण्यापेक्षा त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करणं आणि त्यातून प्रेरित होणं जास्त संयुक्तिक नाही का, असा प्रश्न कोणत्याही शिवप्रेमी मराठी माणसाला पडणं शक्य आहे.
आज कुरुंदकर असते, तर त्यांच्या या लिखाणावर तथाकथित शिवप्रेमी तुटून पडले असते. पराकोटीची टीका केली असती. त्यांचं निजाम शासित मराठवाड्यात गेलेल्या बालपणापर्यंत टीका केली गेली असती.

पण कुरुंदकरांना हा पराभव मांडावासा का वाटला, हे कोण पाहाणार ? कुरुंदकर वाद निर्माण व्हावा म्हणून लिखाण करत असले, तरी फालतू वाद निर्माण करणं त्यांचा उद्देश नव्हता. वादातून ठिणग्या उडाल्या की त्यातून अग्नि निर्माण होतो आणि प्रकाशाचा शोध लागतो, हा मानवी इतिहास आहे. कुरुंदकरांनी आपल्या लिखाणातून कसं समोरच्याला निरुत्तर केलं याबद्दल टाळ्या वाजवणं हा आपण Mature न झाल्याचं लक्षण आहे. कुरुंदकरांना अपेक्षित होतं ते समोरच्याने यावर विचार करून प्रतिवाद करावा. आता त्यानंतर कुरुंदकर प्रत्युत्तर देत बसले असते की नसते, हा कल्पनेतला भाग आहे.

याबाबत त्यांचंच उत्तर निवडक पत्रेपुस्तकात आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय, पूर्वी उपेक्षा करून मारण्याचा प्रयत्न झाला. मी शिल्लक आहे. आता आक्रस्ताळेपणा, उपहास करण्याचा प्रयत्न आहे, याने मी मरणार नाही. माझे मरण मला निरुत्तर करणाऱ्या खंडनात आहे. जे मला पुरावा व तर्क यांनी खोडून काढता येत नाही. ते मी हट्ट न करता निमुटपणे स्वीकारतो. म्हणून कुणी मला निरुत्तर करणारे खंडन केले, तर मी माझी मते सोडून त्याची मते स्वीकारेन. ते माझे खरे मरण आहे. त्या मरणाची मला भीती आहे आणि त्या मरणाचे आकर्षणही. तेव्हा मी नामशेषही होईन आणि कृतार्थही.
 भीष्मांनी जसा आपल्या मरणाचा मार्ग आपल्या स्वकीय शत्रूंना सांगावा, तसा काहीसा हा प्रकार आहे. पण मुख्य म्हणजे कुरुंदकर नामशेष झालेले नाहीत. यातच त्यांचं अमर असणं अधोरेखित होतं.

तर आता पुन्हा महाराजांच्या पराभवावर त्यांनी केलेल्या समीक्षेकडे वळू. कुरुंदकर हे Devil’s Advocate नव्हते. वादासाठी वाद ते करत नव्हते. श्रीमान योगीला प्रस्तावनेतच पराभवांची आठवण देणं हा काही चिप पब्लिसिटीचा प्रकार नव्हता.

त्यांनी असं लिहिण्यामागचं कारण त्यांनी प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदात स्पष्ट केलंय, ते देसाईंना सूचित करताना म्हणतायत, मला ही म्हणजे शिवरायांची विलक्षण व्यक्तिरेखा काल्पनिकाच्या पसाऱ्यात गमावली जाण्याची भीती वाटते. या एका वाक्यात कुरुंदकरांचं शिवप्रेमही व्यक्त होतं आणि त्यांची भूमिकाही. आणि दुर्दैवाने आज त्याची प्रचितीसुद्धा येतेय.

स्वप्नाळू, भक्तीभावाने कोणाच्याही आहारी न जाता तटस्थपणे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणं हा कुरुंदकरांचा स्थायीभावच आहे. त्यातून गांधीही सुटले नाही, नेहरूही नाही आणि आणि कार्ल मार्क्सही. त्यातून तर्क आणि खंडनमंडणाच्या मर्यादा त्यांना माहीत होत्या. केवळ खंडनमंडण आणि तर्क याने मानवी श्रद्धा डळमळीत होत नाहीत. मानवाच्या अनेक सहजप्रेरणा या तर्कातीत असतात याचीही जाण त्यांना होती. जी आज अनेकांना नसल्यामुळे विचारवंतांच्या हत्या घडल्या.

या पार्श्वभूमीवर शिवाजी महराजांच्या पराभवाकडे पाहाताना केवळ शक्ती कमी पडली, म्हणून हे पराभव झाल्याचं कुरुंदकरांनी दाखवून दिलं.  

शिवाजी महाराजांचे १६५६ ते १६४८ या १८ वर्षांचे प्रारंभिक चक्र पराभवावर येऊन थांबते. दुसरं १६५६ ते ६६ हा दशकभरातला पराभव, मिर्झाराजेंसमोर पत्करलेली शरणागती याबद्दल कुरुंदकरांनी ऐतिहासिक तथ्यं मांडत विश्लेषण आणि भाष्य केलंय. मी त्या ऐतिहासिक घटनांमध्ये जात नाही, कारण तो आपला आजचा विषय नाही. विषय कुरुंदकरांचं विश्लेषण करण्याची हिंमत आणि पद्धत आणि प्रस्तावनेतलं त्यांचं स्वतंत्रपणे असलेलं महत्त्व हा आहे.

शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत त्यांनी जिंकलेला बराच मुलुख त्यांना तहाद्वारे परत करावा लागलाय, हे विसरू नका. हा इतिहास पाहिला, तरच तहाच्यावेळी वा पराभवसमयी त्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी आपल्याला दिसेल.

जिथे इतर इतिहासकार शिवाजी महाराजांना शास्त्रोक्त पारंपरिक क्षत्रिय गुणधर्म आणि हिंदू आदर्शवादी मुल्यांच्या चौकटी बसवून त्यांच्या शत्रूशी लढताना खोटी नैतिकता जोडून मोठेपण दाखवण्याच्या अहमहमिकेत सहभागी होत असतात, तिथे कुरुंदकरांनी थेट कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या निकषांवर शिवाजी महाराजांना पास केलं आहे. म्हणजे शिवाजी अफझलखान भेटीला जाताना पूर्ण प्लॅनिशी तयार होते. आपले मावळे जंगलात दडवून ठेवले होते. दुश्मनाच्या फौजेला गोंधळवून टाकत त्याचा निःपात करण्याची त्यांची योजना तयार होती. हातात वाघनखं होती. आता ती वाघनखं होती की बिचवा की कट्यार... जे असेल ते असेल. पण छुप्या शस्त्रानिशी ते सिद्ध होते. मग अशावेळी अफझलखानाने त्यांना बगलेत दाबून पहिला वार केला आणि म्हणून प्रतिक्रियेदाखल महाराजांनी कोथळा बाहेर काढला, हे फारसं पटणारं नाही. महाराज एवढे कच्चे नव्हते की अफझलखानाला पहिली संधी देऊन मग वार करण्याएवढे. एवढी सगळी तयारी त्यांनी खानाच्या भेटीसाठी केली, त्या भेटीत खानाने वारच केला नसता, तर महाराज बोलणी करून परत थोडीच आले असते? दगाफटका महाराजांनीही केला असू शकतो आणि यात गैर ते काय? खुद्द शिवाजी महाराजांनी मी शत्रूंना दगा दिला. मित्रांना दगा दिल्याचे दाखवा असं आव्हान एका पत्रात दिलंय. याकडे कुरुंदकर लक्ष वेधतात. प्रस्तावनेच्या पान २४ वर लिहिलंय-

शाहिस्तेखानाला शासन हा दगाबाजीचा दुसरा प्रकार. विश्वास देऊन भेटीला बोलावून मारणे, गाफील सेनेवर हल्ला करणे, तहाची बोलणी लावून अंधारातून पळणे यातील काहीच राजपूत धर्मात न बसणारे पण झोपलेल्याला झोपेत मारणे, पळणाऱ्या निःशस्त्रावर हत्यार चालवणे, आडवे आलेले हिजडे, दासी, स्त्रियांची कत्तल करणे हे ही राजपूत धर्मात न बसणारे. एकूण शाहिस्तेखान प्रकरणात शाहिस्तेखानाचा मुलगा, जावई, बायका, सूना, मुली मिळून ६ प्रतिष्ठित स्त्रिया, ६ सामान्य कुळबिणी, ४० पुरुष, ज्यात अनेक पहारेकरी खोजा म्हणजे हिजडे ठार झाले. हा शिवाजी परंपरागत क्षात्रधर्मात बसवू नये. त्यांची संगती कौटिल्याच्या राजधर्मात बसते.

बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांचा पराभव हा नैतिकतेच्या भलत्याच आदर्शवादी मुल्यांमध्ये बसवण्याच्या धडपडीत आहे. महाराजांनी विजयाचे जे मार्ग निवडले, ते आपण निवडण्याची हिंमत आपण करू शकत नाही. आपल्याला महाराजांकडे रामायणाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या साच्यात बसवायची इच्छा असते आणि तिथेच आपण फसतो. ही खरंतर किती साधी गोष्ट आहे. अगदी बेसिक.. पण हा विचार कुरुंदकरांनी केला, तो अजूनही आपण करत नाही. कुरुंदकरांची इतिहास आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांकडे पाहाण्याची ही दृष्टी आपण कधी मिळवणार?  

कुरुंदकरांचं हे विश्लेषण धक्कादायक आहे. पण त्यात तथ्य आहे. कुरुंदकरांची वाद निर्माण करणारी पद्धत ही परंपरागत विचारांना आव्हान नाही, तर आवाहन असतं. आपलाच राजा, आपलाच इतिहास पण कसा पाहावा हे कुरुंदकर आपल्याला शिकवतात.

शिवाजी महाराजांच्या पराभवाची मीमांसा ते काटेकोरपणे करत असले, तरी व्यक्तीश्रेष्ठत्व ते नाकारत नाहीत, तर त्यांच्यावर फासला जात असलेला दंतकथांचा शेंदूर वेळीच खरवडून काढत खरा शिवाजी आपल्यासमोर त्यांना आणायचा असतो.

ते लक्षात घेतलं नाही, तर काय होऊ शकतं, ते आपण आज पाहातोच आहोत. शिवधर्म नावाचा भलताच खुद्द शिवाजी महाराजांनाही अपेक्षित नसलेला पंथ स्वतःला धर्म म्हणत पसरण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे राजकीय पक्ष शिवाजी महाराज आपल्या सोयीने वापरतायत. त्यामुळे अशावेळी असा विलक्षण ऐतिहासिक राजा पुराणपुरूष बनून दैवी आवरणांनी खोटा ठरू नये, यासाठी कुरुंदकरांची धडपड आहे.
शिवाजी महाराजांभोवती आख्यायिकांचं जाळं विणलं जातं, यामुळे शिवाजी महाराजांच्या खऱ्या व्यक्तिमत्वावर अन्याय होतो आणि प्रेरणा कशावरून घ्यावी हेच आपल्या लक्षात येत नाही. शिवाजी हे अनन्यसाधारण दैवी आवतार असल्याची आपली धारणा होते. मग त्यांना त्यांची तलवार भवानी मातेने दिल्याचं आपल्याला वाटतं. ते साक्षात शंकराचाच अवतार असल्याचं आपण ठरवायला लागतो. कारण माणूस म्हणून त्यांचे झालेले पराभव आपल्याला दिसतच नाहीत. त्यातून आपण काही शिकूच शकत नाहीत. आपल्याला दिसतो फक्त त्यांचा भव्या उदात्त पराक्रम एके पराक्रम जो आपल्याला शिकवत काही नाही. फक्त आपल्याठायी फुकटचा उन्माद वाढवतो.

आता गंमत म्हणजे कुरुंदकर जितक्या तटस्थपणे विश्लेषण करतात, तितकेच ते शिवाजी महाराजांच्या स्वभावातले इतर कंगोरेही वस्तुनिष्ठ पद्धतीने उलगडतात. शिवाजी महाराजांचे पराभव झाले, ते केवळ आणि केवळ शक्ती कमी पडल्यामुळे हे कुरुंदकरांनी स्पष्टपणे मांडलं आहे. फंदफितुरी, शत्रूवर फाजील विश्वास, क्षमाशील स्वभाव, अव्यवहारी बेसावधपणा, चुकलेलं सेनानियोजन, खचलेला धीर यातलं कुठलंही राष्ट्रघातकी आणि राजेपणाला तडा बसेल असं कारण शिवाजीच्या पराभवामागे नाही, हे कुरुंदकर स्पष्ट करतात. इथेच कुरुंदकरांचं कुरुंदकरपण सिद्ध होतं.



शिवाजी व्यक्तिरेखेला ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून पाहाताना पराभव हा नकारात्मक भाग म्हणून कुरुंदकर पाहात नाहीत. तर शिवाजीचा व्यक्तिवेध घेताना इतिहासाचा भव्य पटही ते उभा करतात. म्हणजे या प्रस्तावनेत ते एका ठिकाणी लिहितात- परधर्मसहिष्णुतेच्या बाबतीत अशोक, विक्रमादित्य, हर्ष, अकबर यांच्याशी महाराजांची तुलना करता येणं शक्य आहे. पण सर्वांना प्रचंड जनानखाने होते. अकबराचा मीनाबाजार होता. अशोकाची तिष्यरक्षिता होती. शिवाजीने वासना मोकाट सोडली नव्हती.रसिकता, चित्र, शिल्प, संगीत, काव्य यांना उदार आश्रय देणं, मोठमोठ्या इमारती बांधणं इतका पैसाही शिवाजीजवळ नव्हता. त्याला फुरसदही नव्हती, त्याच्या मनाचा तो कौलही नव्हता. तो तुमच्या माझ्यासारखा पापी व उपयोगितावादी माणूस होता.

परधर्मसहिष्णुतेतला फरकही कुरंदकर वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडतात. म्हणजे अकबराची सहिष्णुता ज्या हिंदूंबद्दल होती, त्यामागे व्यवहारज्ञान होतं. म्हणजे बहुसंख्य हिंदूंकडून कर घेऊन वैभव प्राप्त होत होतं. हिंदूंना आक्रमणाचा इतिहास नव्हता. मुस्लिमांच्या कत्तली करणं, बायका भ्रष्टवणं, सक्तीचं धर्मांतर लादणं अशी कुठलीही स्वधर्मासा आणि राज्याला धोकादायक पार्श्वभूमी नसलेल्या हिंदूंना अकबराने औदार्याने वागवणं हे व्यवहार्य होतं तर शिवाजीच्या राज्यात मुस्लिम बहुसंख्य नव्हते. (Muslim minority हा परवलीचा शब्द) त्यांच्याकडून फार मोठा कर मिळत नव्हता. मुस्लिमांच्या तलवारी स्वराज्याला फार उपयुक्त नव्हत्या. त्यांना आक्रमणांचा इतिहास होता, तरीही त्यांना औदार्याने वागवणं हे अंगभूत औदार्य शिवाजीपाशी होतं, हे इतिहासाच्या पटावर लक्षात घेणं आजही आपल्याकडून होत नाही आणि आजच्या काळाला ते relevant आहे म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

कुरुंदकरांचा मुद्दाच असा आहे की, मराठी माणूस जिथे शिवाजी महाराज अधिकाधिक मोठे करण्याचा प्रयत्न करतात, तिथे या पार्श्वभूमीवर शिवाजी छोटा करून पाहाण्याची कुरुंदकर तयारी दर्शवतात. मात्र तो कुणापेक्षा छोटा ठरवावा, याचं मोजमाप आहेच कुठे, हा प्रश्नही ते उपस्थित करतात. कुरुंदकरांचं विषयाला भिडण्याचं तंत्र इथे उठून दिसतं.

बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांच्या इतिहासाला नेपोलियनच्या पॅरेमीटरवर जोखतात. पण कुरुंदकर १२०० वर्षांच्या भारतीय इतिहासाच्याच जमिनीवर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेचं विश्लेषण करतात. कलिंग, यौधेयानंतर पहिल्यांदाच १२०० वर्षांनी शिवाजी महाराजांच्या राज्यात असं घडलं होतं की जनता युद्धात सहभागी होती. जे राणा प्रताप आदींच्याही भाग्यात नव्हतं. तिथे लढायची ती सेना. जनता उदासिनच असायची. महाराजांच्या मानवी हुशारीचं हे दुर्लक्षित कॅरेक्टरिस्टिक कुरुंदकर आपल्यासमोर उलगडतात.


पुन्हा मूळ प्रश्नाकडे येऊ. शिवाजी महाराजांचा पराभव... आधी स्पष्ट केल्याप्रमाणे शक्ती कमी पडणं हे एकमेव कारण पराभवामागे आहे आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा पराभव आपल्याला उच्चारायला आणि पटायला धक्कादायक वाटला, तरी ते वास्तव आहे. आपल्या ध्येयासाठी ते झुंजत राहिले, ते ही बलाढ्य शत्रूपुढे. त्यात हार- जीत होतच राहाणार. जर आपण ४०० वर्षांपूर्वीच्या इतिहासातील राजांचा पराभव स्वीकारू शकत नसू, तर आपल्या स्वतःचा पराभव कसा स्वीकारणार? पराक्रम प्रेरणा देऊ शकतो. पण धडा मात्र पराभवातूनच मिळत असतो आणि हा धडा मोलाचा आहे. कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे पराभूत आणि गुलाम राष्ट्रांचा स्वातंत्र्याकडे जाण्याचा रस्ता सरळ कधीच नसतो. तो अनेक पराभवांनी आणि अनेक पीछेहाटींनी भरलेला, फक्त अभंग ध्येयवादाच्या सामर्थ्यावर यशाच्या टोकापर्यंत जाण्याचा रस्ता असतो. कोणत्याही देशाला असे पराभव पायदळी तुडवतच स्वातंत्र्यापर्यंत जावयाचे असते. शिवाजीचे मोठेपण ही वाटचाल करण्यात आणि वाटचाल आपण यशस्वी करू शकतो हा विश्वास चेतवण्यात असते. स्वातंत्र्य सवंग, सोपे आणि चटकन मिळणारे कधीच नसते. अलौकिक नेत्यांच्यासाठी सुद्धा हा प्रवास कष्टाचा आणि दीर्घ मुदतीचा अशतो. जे तत्व गुलाम राष्ट्रांना स्वतंत्र होण्याला लागू आहे तेच तत्व स्वतंत्र राष्ट्रांनी आपले वैभवशाली जीवन साकार करण्याला लागू असते. हाही प्रवास सोपा आणि झटकन आटोपणारा नसतो. समृद्ध जीवनापर्यंत जाण्यासाठी सतरा चढ उतार हिंमतीने पाहाण्याची तयारी असावी लागते. छोट्याछोट्या विजयांनी बेभान होणारी आणि क्षणकालच्या पराभवांनी एकदम हाताश आणि खच्ची होणारी मनोवृत्ती आपण जोपासलेली असते. हिच्यावर उतारा पराभवाच्या आठवणी सतत जाग्या ठेवणे हाच आहे. ही पराभवांची जंगले तुडवीतच एक दिवस हा देश विजयापर्यंत जाऊ शकेल. 

मुळात कुरुंदकरांचं वैशिष्ट्यच हे आहे, की त्यांची मतं ते मांडतात, तेव्हा ती सत्य आहेत, हे त्यांनी माहीत असतं पण त्यामुळे समोरचा माणूस आपल्यापासून तुटावा हे त्यांना कधीच वाटत नव्हतं. म्हणूनच ते कुठल्याही कंपूत दाखल झाले नाहीत. त्यांनी धर्म नाकारला म्हणून समाजवादी त्यांना गोंजारायला धावले, तर मोठ्या थाटात कुरुंदकरांनी आपल्या मुलाची मुंज लावली होती. हिंदुत्वावर हल्ला चढवला, कुराणावर अभ्यास होता. त्यांचा म्हणून 'जमात-ए- इस्लामी'ने त्यांना संमेलनाला बोलावलं, तर तिथे 'मी पूर्ण नास्तिक आहे, म्हणजे अल्लाचं अस्तित्वही मी मान्य करत नाही. त्यामुळे 'अल्ला न मानणाऱ्यांच्या जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या इस्लाम'च्या तुम्हा अनुयायांना माझ्या जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? हे थेट कट्टर मुस्लिमांच्या गर्दीसमोर विचारायची हिंमत त्यांच्यापाशी होती. शिवाजी महाराजांमधलं माणूसपण शोधण्याची दृष्टी अशाच माणसाकडे असू शकते.


एक थोडा वेगळा मुद्दा. आज ज्ञानपीठविजेत्या भालचंद्र नेमाडे यांचा नेमाडपंथ मानला जातो. देशीवादाला अनुसरून... पण साहित्यात असे पंथ निर्माण होणं हे सारस्वतांसाठी आणि समाजाच्या साहित्याकडे पाहाण्याच्या दृष्टीसाठी खूप महत्वाचं आहे, कारण साहित्यात समाज किती गुंतलाय, हे त्यातून स्पष्ट होत असतं. संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे ही त्याचं अप्रतिम उदाहरण आहे. मला वाटतं, कुरुंदकरपंथ हा ही एक साहित्यातला पंथ आहे. स्वतः कुरुंदकर चार्वाकपंथाशी आपलं लोकायत नातं सांगू पाहातात, तेव्हा आपणही तर्कशुद्ध कुरुंदकरपंथ मान्य करायला हवा, असं मला वाटतं. कुरुंदकरांनी हे मांडलं एवढंच त्यांचं वेगळेपण नाही. तर त्यांनी लोकायत संप्रदायाला पुष्टी देत, ती दृष्टी देऊन वादांची वैदिक पंरपराही खुली केली होती. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर वैचारिक वाद आपण घालू शकू. पण तो वादही कुरुंदकरच घालून त्यावरचं प्रत्युत्तरही स्वतःच देऊन पुन्हा त्या प्रत्युत्तरातल्या दाव्यांवर हल्लाबोल करून मोकळे होतात. ही प्रोसेस अजिबात सोपी नाही. त्याचं आकलन होण्यासाठी आणि प्रतिवाद घालण्यासाठी वैचारिक सुस्पष्टता हवी आणि ती येण्यासाठी पुन्हा आपल्याला कुरुंदकरांच्याच लिखाणाचा आधार घ्यावा लागतो. बुद्धिनिष्ठेचा उगम इथेच होतो. आज कुरुंदकरांच्या विचारधारा अंगिकारणं जमो ना जमो, निदान त्यांच्या विचारपद्धतीचा अवलंब तरी आपण केलाच पाहिजे असं मला वाटतं. मी इथेच माझं भाषण संपवतो. धन्यवाद.

©आदित्य नीला दिलीप निमकर
९९२०७०२९१७

1 comment: