Friday, January 10, 2014

अफाट आठवणींचा अजस्त्र गोफ

दिवाळीचा काळ दरवर्षी काही ना काही देऊन जातो. गेल्यावर्षी 'मिस्टर झी' पारितोषिक मिळालं. यंदा दिवाळीपूर्वीच कल्याणच्या 'सार्वजनिक वाचनालया'कडून मला पुरस्कार मिळाला. वाचनालयाला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत 'मला प्रभावित करणारं पुस्तक' या विषयावर मी लिहिलेल्या लेखाला प्रथम पुरस्कार मिळाला. २५०० रुपये रोख, सुंदरशी ट्रॉफी, भलामोठा पुष्गुच्छ आणि सन्मानपत्र मिळालं. 
एखादं पुस्तक हातात घेतो, तेव्हा आपल्या काही त्या पुस्तकाकडून अपेक्षा असतात. राजकीय पुस्तक वाचताना राजकीय विचारसरणी, राजकीय निर्णय आणि त्यामागची कारणं, त्यांचे परिणाम यांची अधिकाधिक संदर्भासह माहिती मिळावी, अशी अपेक्षा असते. कवितासंग्रह वाचताना आपल्या संवेदना जाग्या होतील, भाषेचं माधुर्य नव्याने जाणवावं. कवीच्या उत्तुंग कल्पनांची झिंग आपणही अनुभवावं अशी आपली अपेक्षा असते.  तर कादंबरी वाचताना विरंगुळा एवढंच उद्दिष्ट असतं. अर्थात काही कादंबऱ्या या संदर्भग्रंथांपेक्षा जास्त माहितीपर आणि उद्बोधक असतात. 
 
मुळातच माझं वाचन हे काहीसं ऑब्सेसिव्ह पद्धतीचं. एखादा विषय मनाला भिडला, तर त्या विषयावरची जितकी मिळतील, तितकी पुस्तकं शोधून वाचायची. एखाद्या लेखकाने प्रभावित केलं, तर त्या लेखकाचं समग्र साहित्य वाचून काढायचं, अशी माझी पद्धत. अशा वाचनपद्धतीत मला सर्वांत जास्त कुठला साहित्य प्रकार वाचायला आवडत असेल, तर तो म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र. हा साहित्यप्रकार अत्यंत गोळीबंद आणि तितकाच व्यापक असतो.  एखाद्या राजकीय किंवा सामाजिक संदर्भग्रंथांमधून तपशिल मिळतो. पण चरित्रामध्ये तत्कालिन परिस्थितीची स्पंदनं जाणवतात. घटनेकडे पाहाण्याची मनोभूमिका चरित्रांमधूनच दिसते आणि तरीही त्यात कल्पनेच्या डोहातल्या गटांगळ्या नसून व्यक्तिसापेक्ष सत्याची भक्कम जमीन असते. त्यामुळे अनेकदा अनेक विषयांवरील अभ्यासाची पुस्तकं वाचून जितकी गोष्ट कळत नाही, तितकी चरित्र किंवा आत्मचरित्रं समजावून जातात. चरित्रांमध्ये अर्थातच एक त्रयस्थता असते. आत्मचरित्रांमध्ये स्वतःचं मत पूर्णपणे समजून आपली बाजू मांडली असते. ते कदाचित पूर्णपणे प्रामाणिक असतं, किंवा नसतं. पण चरित्रांमधून मिळणारा एका समस्त काळाचा, एका पीढीचा धांडोळा स्तिमित करणारा असतो.

माझा आवडीचा आणि बराचसा अभ्यासाचा विषय म्हणजे नाटक. त्याच्याशी संबंधित बरीच पुस्तकं वाचली. देशोदेशींची नाटकं वाचली, पाहिली. विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड यांच्या नाटकांचं वाचन केल्यानंतर हळूहळू वाचन नाटकांच्या नाटकारांचं चरित्र समजवण्याच्या दिशेकडे वळलं. नाटक लिहिण्यासाठी आवश्यक ती मानसिक तयारी, अभ्यास, त्याचं क्राफ्टिंग हे कुठून निर्माण होतं, याचा वेध घ्यायचा प्रयत्न करू लागलो. या वाचनात हाती लागलेलं आणि सर्वांत प्रभावित करून गेलेलं पुस्तक म्हणजे विजया मेहता यांचं झिम्मा- गोफ आठवणींचा’…

विजया मेहता यांचा नाट्यसृष्टीतला दबदबा सर्वांना माहितीच आहे. त्यांची हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, महासागर, पुरूष, मुद्राराक्षस, शाकुंतल यांसारख्या नाटकांबद्दल मी ऐकलं बरंच काही होतं. पण मला स्वतःला त्यांचं कुठलंही नाटक पाहायची संधी मिळाली नव्हती. बाई या उल्लेखासोबत असणारा दरारा माझ्या परिचयाचा होता. विक्रम गोखले, नाना पाटेकर यांसारखे नाट्यसृष्टीतली तालेवार मंडळी ज्यांचं नाव घेताना कानाच्या पाळीला हात लावतात, बाईंनी आम्हाला घडवलं असं दिमाखाने सांगतात, त्या बाई मुळात कशा घडल्या हे जाणून घ्यायची उत्सुकता मला होतीच. पण झिम्मा पुस्तकाने मला केवळ उत्सुकता शमवली नाही, तर विलक्षण अनुभुती दिली. झिंग म्हणजे काय आणि तिची नशा काय असते, याचा अनुभव वाचनातून आला. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. रंगभूमीचा अभ्यासही या पुस्तकातून घडला. हा इतरवेळी रंगभूमीशी संबंधित इतर अभ्यासग्रंथ वाचूनही झाला नसता.

झिम्मा- गोफ आठवणींचा या पुस्तकात नाट्यसृष्टीत वावरताना अनुभवास अलेले जादुई क्षण बाईंनी शब्दबद्ध केले आहेत. वाचताना पहिल्यांदा प्रभावित करून गेलेली गोष्ट म्हणजे विजयाबाई या माझ्या आजीच्याच वयाच्या. गिरगावातल्या मराठमोळ्या संस्कृतीत लहानाच्या मोठ्या झालेल्या... माझ्या आजीसारख्याच. मात्र तरीही किती विलक्षण जीवन जगलेल्या... अत्यंत समृद्ध आयुष्य विजयाबाई जगल्या आहेत. समाधान, समाधान असं आपण म्हणतो, ते नेमकं गवसतं कसं? ते या पुस्तकात जाणवलं. सुखी माणसाचा सदरा असेल वा नसेल, सुखी स्त्रीच्या साडीचा पदर मात्र पुस्तकात  जाणवला. विजयाबाईंच्या आयुष्यात दुःख आलंच नाही, असं नाही. अवघ्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरवलं. तरुण वयात दोन मुलं पदरात टाकून पती अचानक संसार अर्धवट सोडून देवाघरी गेला. खरंतर हे किती मोठे आघात... पण यातून सावरून स्वतःचं आयुष्य कसं बाईंनी घडवलं, ते या पुस्तकात प्रभावीपणे मांडलं आहे. पुस्तकात बाई भेटतात त्या तीन नावांनी... ही तीन नावं म्हणजे तीन कालखंडाचं प्रतिबिंब आहे. तीन पिढ्यांची प्रगल्भतेकडे होणारी वाटचाल आहे. यात बाईंना भेटलेल्या विविध लोकोत्तर मंडळींचा सहभाग आहे. आधी बेबी, मग विजू जयवंत, त्यानंतर विजया खोटे, या ही पुढे विजया मेहता आणि सार्वकालिक बाई अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाची विजयाबाईंनी आपल्या आत्मचरित्रात हातचं राखून न ठेवता ओळख करून दिली आहे. हातचं राखलं, तरी अपूर्णत्व यात नाही. मी या आधी वाचलेल्या अनेक आत्मचरित्रांनी मला असमाधानाचाच अनुभव दिला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या गिरीश कार्नाड यांच्या खेळता खेळता आयुष्य या आत्मचरित्राने माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा नवे प्रश्नच मनात निर्माण केले. अगदी अमिताभ बच्चन, शाहरुख खानसारख्या सुपरस्टार्सचं चरित्र वाचतानाही बऱ्याचशा गोष्टी दडवल्या गेल्याचं लक्षात येत होतं. आपली इमेज संभाळण्याचा सोस बाळगून चरित्र लिहिलं की अशी गल्लत होते. त्यापेक्षा आपण केलेल्या चुकीचं समर्थन आपल्या चरित्रात केलं, तर खपून जातं. निदान आपल्यापुरता लेखक प्रामाणिक राहून आपली भूमिका मांडत असतो. (कधी कधी तेवढ्यासाठीच त्याने चरित्रप्रपंच मांडला असतो.)      

बाईंच्या चरित्रात इमेज संभाळण्यापेक्षा नाटकातल्या बॉडी इमेजेस कशा मिळवाव्यात, याचं यथार्थ वर्णन मिळतं. आपल्या प्रत्येक वागण्यामागचे विचार बाईंनी परखडपणे मांडले आहेत. नॉट विदाऊट माय डॉटर, अमार मेयाबेल आणि अशी अनेक अफगाणी, इराणी, पाकिस्तानी स्त्रियांची संघर्षात्मक चरित्रं मी वाचली. प्रभावितही झालो. पण कट्टर मुस्लिम राष्ट्रांमधल्या अपवादात्मक बंडखोर स्त्रियांसारख्या बाई नसूनही त्या तितक्याच बंडखोर वाटतात. स्त्री मुक्ती आंदोलनात सहभागी नसूनही स्त्री मुक्तीचे धडे आपल्या आत्मचरित्रातील पाना पानांत मांडतात... ते ही स्वतः अनुभवलेले. केवळ प्रमेयरुप नव्हे. एक मराठी बुद्धिवादी स्त्री कुठलाही मोठा संघर्ष न करता आपल्या मध्यमवर्गीय संस्कारांतून एक विश्व निर्माण करते. अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचं घराणं निर्माण करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या नावाचा ठसा उमटवते, हे विलक्षण वाटतं. ती गरीब घरात जन्म घेऊन संघर्ष करत त्या पदापर्यंत पोहोचलेली नाही. ती तोंडात चांदीचा चमचाही घेऊन जन्माला आली नाही. पण तिच्यावर संघर्षाची वेळही येऊ नये, म्हणजे नशिबालाही काय दरारा जाणवत असेल या स्त्रीचा? याचं आश्चर्य वाटतं. जीवनाकडे बघताना ती स्त्री काळाच्या बरीच पुढे होती. हे मला जास्त भावलं. मराठी आणि अमराठी वादावर जिथे आजही राजकारण तापतं, तिथे बाई दोन्ही संस्कृतींमध्ये सहजपणे सामावून जातात, चपखल बसतात. एवढंच नव्हे, तर आपली दखल घ्यायला भाग पाडतात.

मराठीतील आद्य आत्मचरित्र स्मृतिचित्रेमधील लक्ष्मीबाई या पारतंत्र्यातील सनातन, सोवळ्या घरातील सवाष्ण महिला... पतीच्या चंचल, लहरी निर्णयांचा सोवळ्या मनावरचा परिणाम त्यांच्या लिखाणात आहे. विजयाबाईंचा काळ बराच नंतरचा... पण जुन्या चालीरीतींची सावली बाईंच्या बालपणावर आहेच. बाईंचा काळ म्हणजे कालखंडाचा भव्य पट पाहिलेल्या पिढीचा. ज्यांनी दुसरं महायुद्धही अनुभवलं, स्वातंत्र्य पाहिलं, नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाची पहिली पिढी म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं, अशा महिला... बाईंचं आयुष्य किती समृद्ध? जमिनदार घराणं. एकीकडे भक्तांनी वेढलेले बुवा बनून गेलेले काका, तर दुसरीकडे तुझ्या कामाची जबाबदारी देवाची नाही, तर तुझीच असा पुरोगामित्वाचा धडा शिकवणारे नानासाहेब रानडे, एकीकडे आजीचं लाल अलवणं तर दुसरीकडे राष्ट्रसेवादलाची खादी. नलिनी जयवंत, शोभना समर्थ, नुतन, तनुजा अशा प्रख्यात अभिनेत्रींशी आई- वडिलांकडून वारशाने मिळालेलं नातं असूनही त्यांचा फार कमी प्रभाव पडलेल्या बाई, तर पं. जवाहरलाल नेहरूंच्या हलक्याशा स्पर्शासाठी धावपळ करणाऱ्या जबरदस्त फॅन बाई...


पुढे पुढे तर बाईंच्या आयुष्यातील अशा विविध गोष्टींचा अवाका एवढा वाढत गेला आहे, की थक्क व्हायला होतं. त्यांची सकाळ साहित्य संघात गणपतराव बोडस, केशवराव दाते यांसारख्या नटश्रेष्ठांसोबत, दुपार इब्राहिम अल्काझींसारख्या दिग्गज पाश्चात्य शैलीच्या दिग्दर्शक गुरुंसोबत तर संध्याकाळी चौपाटीवरची भेळ साक्षात पु.ल देशपांडे आणि सुनीता ताईंसोबत... जगातलं कुठलं व्यक्तिमत्व विकास शिबिर याहून चांगलं ग्रुमिंग करू शकेल?  असं भाग्य असावं... अभिनयाचं शिक्षण, दिग्दर्शनाचे धडे अल्काझी, आदी मर्झबान, दुर्गाबाई खोटे यांच्याकडून.. आणि लग्नाची वेळ आल्यावर कुठलंही प्रेमप्रकरण न घडता किंवा अडचण न येता थेट दुर्गाबाईंच्या सुविद्य आणि सुशील मुलाशी अरेंज्ड मॅरेज... कुठे आधुनिक, तर कुठे पारंपरिक स्त्री अशी विजयाबाईंची प्रतिमा... संभ्रमात टाकण्यापेक्षा कौतुकास्पद वाटते.

वयाच्या एकविसाव्या वर्षीच खुद्द विजय तेंडुलकरांकडून त्यांना मिळालेली बाई ही पदवी त्यांच्या प्रतिभेची साक्ष देते. रंगायन चळवळीच्या आठवणींबद्दल बोलताना तर लुचत असलेलं बाळ मध्येच थांबून मातेकडे जसं गोडसं हसत पाहातं, तसं त्या पाहातात. वाद विवाद एखादी नाट्यसंस्था कशी फोडतात, हे मराठी रसिकांसाठी नवीन नाही. तरीही मराठीत एक नाट्य चळवळ उभी करणं, तिचं कणखर नेतृत्व करणं, या गोष्टी बाईंबद्दलचा आदर वाढवतात. पुन्हा या संस्थेच्या परिसरात त्यांच्या तालमी पाहायला येणारे लोक तरी कोण?... भारतरत्न पं. रवीशंकर, संतुरवाद पं. शिवकुमार शर्मा!...मराठी रंगभूमीवर रेनसां निर्माण करणाऱ्या बाईच. विवाह होऊन जमशेदपूरला बाई गेल्या आणि नाटकांशी संबंध तुटला, असं एखाद्या गृहिणीला शोभणाऱ्या  घटनेतूनही बाईंच्या आयुष्यातील वेगळेपणा भावतो. जमशेदपुरात नाटक करणं, ते ही टाटा मोटर्सचे बेताज सर्वेसर्वा सुमंत मुळगांवरांच्या सांगण्यावरून!... पत्नी नाटकांशिवाय तळमळतेय, हे लक्षात येताच तिच्यासाठी पुन्हा मुंबईला बस्तान हलवणारा, प्रसंगी नोकरी बदलणारा पती हिरेन... 

वयाच्या अठराव्या वर्षी आपलं कार्यक्षेत्र सरकारी नोकरी किंवा सिनेमा इंडस्ट्री नसून नाट्यक्षेत्र आहे, याची झालेली जाणीव ही बाबच विजया बाईंच्या स्पष्ट विचारपद्धतीची जाण देते. नाट्य क्षेत्रातले त्यांनी लिहिलेले एकेक अनुभव तर अफाटच... 

गो.नी.दांची शितू साकारताना त्यांनी शोधलेली बॉडी इमेज आणि त्यानंतरच्या अनेक नाटकांमध्ये (संध्याछाया, हमिदाबाईची कोठी इ.) आपली बॉडी इमेज शोधण्याचा प्रयत्न हा नवोदितच नव्हे, तर कसलेल्या रंगकर्मींनाही वस्तुपाठ ठरावा असा. प्रायोगिक मराठी रंगभूमीवर सशक्त वावर सुरू असतानाच लोकमान्य रंगभूमीकडे (व्यवसायिक किंवा धंदेवाईक शब्दाला इतका सकारात्मक शब्द फक्त बाईंनाच सुचू शकतो.) बाई आल्या. आणखी एक नवा प्रवास सुरू झाला. या रंगभूमीवरही बाईंनी अनेक तगडी नाटकं सादर केली. हमिदाबाईची कोठी सारखं नाटक असो वा बॅरिस्टर, जास्वंदी असो वा संध्याछाया... अभिनेत्री म्हणून त्यांचा अवाका आणि दिग्दर्शिका म्हणून त्यांची हुकुमत पुस्तक वाचतानाही प्रत्ययाला येते. विजय तेंडुलकरांसारख्या लेखकाला ओळख मिळवून देण्याचं काम बाईंनी केलं. तर लोकमान्य रंगभूमीवर एक पर्व त्यांनी निर्माण केलं. सशक्त अभिनय करणाऱ्या दमदार कलाकारांची फौज बाईंनी तयार केली.

मराठी रंगभूमीसोबतच इंग्रजी आणि जर्मन रंगभूमीवरही बाईंचा दरारा कायम राहिला. पु.ल. देशपांडेंची लाघवी नाटकं करत असताना एकीकडे ब्रेख्तसारख्या नाटककाराला मराठी मातीत रुजवण्याचं कार्य त्यांनी केलं. मराठीच्या बंदिस्त नाट्यगृहात न अडकता ग्रीक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन रंगभूमीलाही सहज गवसणी घातली. पायाखाली मराठी माती असली, तर आकाशाला सीमा नव्हती. थिएटर ऑफ अॅब्झर्ड करण्याची हिंमत त्यांनी दाखवली. सार्त्र, बेकेटची नाटकं जी जगभरातल्या भल्याभल्यांना चकवतात, त्याच्यात काम करण्याची संधी बाईंना मिळाली. दुसरे पती फारोख मेहतांसोबत इंग्लंडला वास्तव्यासाठी गेल्यानंतर तर ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवत बाईंनी जागतिक रंगभूमीचं साक्षेपी ज्ञान मिळवलं. मुख्य म्हणजे चरित्रात पाश्चात्य कसे चांगले आणि आपण किती मागे अशा पद्धतीचा निरर्थक तौलनिक अभ्यास न करता त्या जागतिक रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी यांच्यातल्या दुवा बनल्या. विजया बाई नामक पुलावरून मराठीतील तमाशा प्रकार ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेला. कुडियाट्टी हा केरळी प्रकार जर्मन थिएटरमध्ये सादर झाला. मुद्राराक्षस, शाकुंतलसारखी एतद्देशीय संस्कृत नाटकं जर्मन भाषेत सादर झाली, गाजली. आधुनिक भारतातील महत्वाचे नाटककार, ज्यांचा अमरीश पुरी तत्वज्ञ नाटककारअशा उल्लेख करत, त्या गिरीश कार्नाडांचं हयवदन आणि नागमंडल त्यांनी जर्मनीत सादर केली. वास्तविक मी ही नाटकं वाचली होती. पण काही केल्या मला या नाटकांचा रंगमंचीय अविष्कार डोळ्यांसमोर आणता येत नव्हता. विजयाबाईंनी केवळ तो कसा सादर केला, एवढंच या पुस्तकात लिहिलेलं नाही, तर त्याचे अर्थ बाईंनी प्रकट केले. पारंपरिक कथांमधलं नाट्य आणि त्यांना समकालीन संदर्भ देणं, बिटवीन द लाईन्स शोधणं, याचं भान मला हे पुस्तक वाचताना आलं. ऑक्सफोर्डमध्ये शिकताना आलेले अनुभवच बाईंनी शब्दबद्ध केले नाहीत, तर तेथील शिक्षणही आपल्या आत्मचरित्रामार्फत भावी रंगकर्मींना दिलं आहे. सरधोपट पद्धतीचा अभनय आणि आडतालातला अभिनय त्यांनी फोड करून सांगितला. विसंगत अभिनयातील ताकदही दाखवली. संवाद म्हणजे हिमनगाचं टोक असतं, खरा भावनांचा पर्वत मनात उभा करायचा असतो, तो ही केवळ पात्रांपुरताच, हे ज्ञान यथार्थ आहे. केवळ आपल्या यशस्वी नाटकांबद्दल लिहून अपयशी नाटकांकडे डोळेझाक बाईंनी केली नाही. तर अयशस्वी झालेल्या नाटकांची कारणमीमांसा शोधणारं स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिलंय. हे प्रकरणही नाट्यशिक्षणाच्या अभ्यासक्रमात वापरावं, इतकं जबरदस्त आहे. अनेकांशी मतभेद, वाद होऊनही बाईंनी संबंधित व्यक्तींबद्दल आकसानं न लिहिता वादाचं स्वरूप सांगत संबंधित व्यक्तींबद्दल आत्मियतेनेच लिहिलं आहे. आपल्या चरित्राला वादांचं गालबोट लागू दिलं नाही. त्यामुळे आठवणींचा गोफ हा गोफच राहिला आहे. इतरांवर डागणारी तोफ झाला नाही.

बाईंचा जन्म हा नाटकासाठीच झाला आहे, हे त्यांच्याबद्दल वाचताना जाणवलं. बाळंतीण होईपर्यत आणि बाळंतीण झाल्यावर १२-१५ दिवसांत तालमीला उभं राहाणं बाईंमध्ये असलेली झिंग दाखवतं. इतकंच नव्हे तर पती निधनानंतरही घटकाभर वियोगानंतर पुन्हा रंगमंचावर उभं राहाणं, हे बाईंचं केवळ व्यावसायिक शिस्तच नव्हे, तर भक्तीभाव दर्शवतं. पतीच्या मृत्यूनंतरही जेव्हा बाई पहिल्यांदा रडल्या, त्या घरात नाही, तर रंगमंचावरच्या प्रोसिनियम आर्कमध्ये परफॉर्म करताना... बाईंचे अश्रूही नाटकाच्या पात्राला मिळाले. ही उदाहरणं बाईंच्या व्यक्तिमत्वाची शक्ती दाखवण्यास पुरेशी आहेत. अशा एक दोन नव्हे, तर असंख्य अनुभवांचा गोफ झिम्मा पुस्तकात वाचायला मिळतो. एका अजस्त्र अनुभवाला सामोरं गेल्याची भावना जागी होते. एका सुखवस्तू बाईची प्रतिभा तिला किती रम्य अनुभवांच्या लाटांवरून फिरवते, याचा प्रत्यय येतो. ज्यातला थेंबभर अनुभव आपल्याला मिळावा, अशी आपण मनिषा बाळगतो, त्या अनुभवांचा महासागर बाईंकडे आहे.
 
बाईंना जर्मन सरकराकडून फ्रेंड ऑफ पीपल्स हा अद्वितिय सन्मानही प्राप्त झाला. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या अशियाई नागरीक... जर्मनी हे तर त्यांचं माहेरच बनलं. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये लेटर्स टू डॉटर्सचा अद्भुत प्रयोग त्यांनी केला. फ्रेंच महाभारतासाठी पीटर ब्रुकच्या खांद्याला खांदा लावून इतिहास घडवला.   

नाटकांपलिकडे जात बाईंच्या आयुष्यातलं माध्यमांतरही तितकंच प्रभावी आहे. स्मृतीचित्रेवर सिनेमा बनवण्यासाठी त्यांना सल्ला देतात, ते साक्षात व्ही. शांताराम... सिनेमाचं शिक्षण घ्यायला जावं, तर थेट श्याम बेनेगल सारखे दिग्दर्शक लहानशी भूमिका करत तंत्र शिकून घे अशी ऑफर देतात... यांसारखे अनुभव किती व्यापक स्तरावर घेऊन जाणारे असतात, याची झलक झिम्मा वाचताना मिळते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं त्यांनी भूषवलेलं चेअरमन पद असो, वा १२ वर्षं एन.सीपी.ए सारख्या संस्थेची वाहिलेली धूरा असो. बाई या तितक्याच प्रभावी आणि कणखर असल्याचं जाणवतं. यासाठी कुठल्याही स्त्री लेखिकेप्रमाणे त्यांनी स्त्री मुक्ती, बंडखोरी अशा शब्दांचा आधार घेतलेला नाही. एक व्यक्ती म्हणून कशा रीतीने त्या समृद्ध होत गेल्या, जगण्याला कशा रीतीने भिडल्या याचीच माहिती दिली आहे.
दुःख त्यांच्या वाट्याला आलीच नव्हती, असं नाही, पण पतीच्या मृत्यूनंतर कामामध्ये स्वतःला झोकून देणं, दुसऱ्या लग्नाचा योग्य निर्णय घेऊन तो इतरांचा नकार झेलत पूर्ण करणं आणि त्यातून पुन्हा संसारी स्त्री आणि रंगकर्मी अशी तारेवरची कसरत करणं हे बाईंच्या बहुआयामी व्यक्तित्वाचं लक्षण प्रकर्षाने जाणवतं.

सर्व लिखाणात मला आवडलेली गोष्ट म्हणजे लिखाणाचं झालेलं संपादन. अंबरीश मिश्रंचं याबद्दल कौतुक. लिखाणाची शैली, त्यातली घटनांची मेख. कधी नाट्य प्रवास आणि त्यात इतर गोष्टी विसरण्याच्या आतच पुन्हा लिहिलेल्या कौटुंबिक आघाडीवरच्या घटना. काही सुसंस्कृत मराठीतले काळाआड लोप पावत असलेले शब्द, अजिबात बोजड न होता गप्पांमध्ये रंगावी तशी भाषा... त्यात बासुंदीचा गोडवा चाखताना दाताखाली बदाम येऊन मजा द्यावी, तसा येणार एखादा उर्दू शब्द... भाषेतलं लालित्य पूर्णपणे जपलं आहे.


रंगकर्मींनी हे पुस्तक वाचलं, तर त्यांची रंगभूमीबद्दलची जाण समृद्ध होईल. इतरांनी वाचलं तर एका बाईची झेप किती अफाट असू शकते, याची माहिती मिळेल. झिम्मा नावाचा गोफ विणताना प्रभावित करू शकणाऱ्या घटनांची मालिका आशयघन आणि संपन्न आहेच, पण तितकीच मातीतली आणि बहुपेडी आहे. हे पुस्तक एकदा वाचलं तर अवाक व्हायला होतं. पण पुन्हा पुन्हा वाचलं, की त्यांच्या आयुष्यातल्या कित्येक घटना जगण्याची प्रेरणा देऊ लागतात. जादुई क्षण अनुभवायची झिंग देतात. संघर्षापलिकडे पाहात ध्येय, स्वप्न, ध्यास आणि जगण्याचे क्षण चिरंतन करून जाण्याचं बळ देतात. त्यासाठी हे पुस्तक नुसतं वाचूच नये, तर प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं आहे.

स्मारकांचे मारेकरी!

शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं... महाराजांची कीर्ती जगात पोहोचावी, यासाठी अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं आखली आहे. देशाच्या राजधानीत असलेल्या महाराजांच्या पुतळ्याची दुरवस्था मात्र राज्यकर्त्यांना दिसत नाहीये...

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा हा देशाच्या राजधानीत असलेला पुतळा... एकेकाळी दिल्ली स्टेशनवर उतरताच नजरेला पडणारा हा 40 फुटी पुतळा आता जंगलात हरवलाय... याकडे ना दिल्ली पालिकेचं लक्ष आहे ना उठसूठ दिल्लीला पळणा-या मराठी नेत्यांचं... 

काही दिवसांपूर्वी पुतळ्याचा जिरेटोप आणि तलवारीचं म्यान चोरट्यांनी लांबवलं होतं. पण हा पुतळा घडवणारे शिल्पकार भाऊ साठे यांनी याची काहीच माहिती न देता कोणत्यातरी होतकरू शिल्पकाराकडून त्याची डागडुजी करून घेतली गेली... ही संतापजनक बाबही मराठी नेत्यांच्या नजरेआडच राहिलीये... 

केवळ शिवाजी महाराजच नव्हे, तर `चलो दिल्ली`चा नारा देणारे सुभाषचंद्र बोस यांचं स्मारकही गायब झालंय. लाल किल्ल्यासमोर पूर्वी हे स्मारक होतं... मेट्रो स्टेशन बांधण्यासाठी ते हटवण्यात आलं. खरंतर हे स्मारक सन्मानानं अन्यत्र हलवता आलं असतं... मात्र ती तसदी कोणीच घेतली नाही... महत्त्वाची बाब म्हणजे, असा ग्रूप स्टॅच्यू घडवणं कठीण असतो. चार मानवी आकृती, रायफल्स, झेंडा, तोफेचा गाडा हे एकत्र असलेला हा देशातला एकमेव ग्रूप स्टॅच्यू आहे... आता हा पुतळा कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही.... 

सुभाषबाबू असोत की शिवाजी महाराज... राजधानीत असलेल्या या राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांकडे कोणाचंच लक्ष नाही... ना राजकारणात रंगलेल्या दिल्लीतल्या नेत्यांचं, ना दिल्लीचे उंबरठे झिजवणा-या मराठी नेत्यांचं, ना महाराजांच्या नावानं मतं मागणा-यांचं.... 


आदित्य नीला दिलीप निमकर
९९२०७०२९१७
adi.nimkar@gmail.com

Sunday, July 7, 2013

सणसणीत कानाखाली!

“सर, सर बातमी पाहिलीत का?”

एक गोंधळलेला भांबावलेला असिस्टंट नामांकित, प्रथितयश अशा आपल्या दिग्दर्शकाला भेटून सांगू लागला. दिग्दर्शक आपल्या प्रगल्भ आणि विचारी नजरेने असिस्टंटकडे पाहू लागला. मोठ्या प्रयत्नांनी दिग्दर्शकाने ही नजर कमावलेली होती. इतर वेळी हिरोइन्सकडे आशाळभूत नजरेने पाहाण्याचाच त्याच्या डोळ्यांना सराव असावा. आपल्याला ब्रह्मज्ञान असल्याचा जरी दिग्दर्शकाने आव आणला असला, तरी त्याने असिस्टंट सांगत असलेली बातमी पाहिली नसल्यामुळे जरा गोंधळच उडाला होता. 

“कुठली बातमी?”- दिग्दर्शक

“सेन्सॉर बोर्डाची...”- असिस्टंट

सेन्सॉर बोर्डाला टाळं लावण्यात येतंय की काय अशी शंका दिग्दर्शकाच्या मनात डोकावली आणि आतल्या आतच त्याला गुदगुल्या झाल्या. पण बातमी भलतीच होती. 

“यापुढे सिनेमात महिलांना थोबाडीत मारायची दृश्यं दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...” असिस्टंटने शुभवर्तमान कळवलं. बातमी सांगताना त्याचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा झाला होता. बातमी ऐकून दिग्दर्शकच्या चेहऱ्यावर जे भाव अवतरले, ते सराईत हिरोही आणू शकणार नाही असे होते. काहीसा तुच्छतापूर्वक, काहीसा वैतागल्यासारखा असे अनेक भाव चेहऱ्यावर एकत्र आणत दिग्दर्शक गूढ हसला. (म्हणजे नेमका कसा? साधारण राहुल गांधींचं नाव काढलं की भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर कसे भाव असतात... किंवा नारायण राणेंचं नाव काढल्यावर उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर जसे भाव असतात... किंवा नरेंद्र मोदी सोडून इतर कुठल्याही नेत्याचं नाव काढलं की राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर जसे भाव असतात तसे...)

“अरे भाई, बरोबर आहे.. स्त्रिया या थोबाडीत खाण्यासाठी नसून पुरुषांनी त्यांच्यावर प्रेम करावं यासाठी असतात...” ऑस्कर वाइल्डचं कुठलंतरी वाक्यं आपल्या थाटात मारत दिग्दर्शकाने आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेची छाप भेदरलेल्या असिस्टंटवर पाडली. 

“पण सर, आता आपल्या सिनेमाचं काय?” असिस्टंटने घाबरून विचारलं?

“का?”- दिग्दर्शकाने त्याच पट्टीत प्रश्न केला.

“आपल्या सिनेमात हिरोइनच्या ८ वेळा थोबाडीत मारल्याची दृश्यं आहेत.” असिस्टंटचा संयम संपत आला होता.

दिग्दर्शकाचा खरंतर गोंधळ उडाला होता. सिनेमात हिरोइन्सच्या किसिंगचे सीन्स किती आहेत, याचाच हिशेब त्याच्याकडे होता. याच आकड्यांचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी करायचा बेत त्याने आखला होता. आता खरंच दिग्दर्शकाला आपल्या चेहऱ्यावरचे अभ्यासू भाव टिकवणं अशक्य झालं. यापूर्वी सेन्सॉरने तमाम शीला,मुन्न्या, अनरकल्या, चमेल्या, बबल्यांना परवानगी देऊन आता त्याच्या सिनेमातील ‘रसाळ रसिली’ या आयटम साँगला ‘गचाळ रसिली’ म्हणत टीव्हीवर दाखवण्याची परवानगी नाकारली होती. सिनेमातला सर्वांत जास्त खर्च याच गाण्यावर खरंतर झाला होता. महागडी आयटम गर्ल आणि (वीतभर असले तरी) तिच्याहून महाग असणारे कपडे यावर खर्च करताना निर्मात्याचे डोळे पांढरे झाले होते. निदान हे गाणं टीव्हीवर दिसलं, की लोक मोठ्या पडद्यावर हे गाणं पाहायला येऊन त्यांचे डोळे पांढरे करता येतील आणि त्यातून आपलं उखळ पांढरं होईल, असा दिग्दर्शकाचा अंदाज होता. पण आता सेन्सॉरच्या कात्रीमुळे हे गाणं फक्त इंटरनेटवर दाखवणं शक्य होतं. त्यानंतर घोड्यावरून येणाऱ्या नायकाचे सीन्सही प्राणीमित्र संघटनांच्या दबावाला बळी पडत सेन्सॉरने कट केले होते. अश्लील दृश्यांना कलात्मकतेची झालर देण्याचा प्रयत्न अंगाशी आला होता. सेन्सॉरच्या कृपेने ‘दिग्दर्शकीय नजरे’ला दिसलेलं सिनेमातलं स्त्री सौंदर्य प्रेक्षकांना दिसणं अशक्य झालं होतं. आता सिनेमात दाखवायचं तरी काय असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला होता. तामिळनाडूत म्हणे सिनेमातही रजनीकांतवर कुणी हात उचललेला चाहत्यांना पचत नाही. अशा सीन्सवर बंदी आणण्याची मागणी केली गेली होती. पण हिंदीत बंदी घातली समस्त महिला वर्गावरील अन्यायाला! टीव्हीवर अशी बंदी घातली तर काय होईल ? डेली सोप्सवाले तर घरीच बसतील... 
सणसणीत कानाखाली!

पण उसनं अवसान आणत दिग्दर्शकाने बोलायला सुरूवात केली. नाना पाटेकर जसा बोलताना समोरच्याशी बोलतोय, की स्वतःशीच बुद्धीवादी संवाद साधतोय असं वाटतं ना.. तसाच काहीशा पद्धतीने बोलत दिग्दर्शकाने असिस्टंटला समजवायला सुरूवात केली. “आजचा सिनेमा हा खूप पुरोगामी आहे. आणि सेन्सॉर प्रतिगामी. आता बघ ना... जुन्या सिनेमात रणजीत, शक्ती कपूर, गुलशन ग्रोवर यांचे महिला वर्गावर बलात्कार करण्याचे सीन्स असायचे... आता बिचाऱ्यांकडे फारसं कामच नाहीये. कारण...” दिग्दर्शकाने पॉझ घेतला. “कारण, हल्ली बलात्काराच्या सीनसाठी आवश्यक असणारी किमान प्रॉपर्टी म्हणजे कपडे हिरोइन्स एवढे कमी घातलात, की हे वस्त्रं फाडणार तरी कशी?” असिस्टंटने शंका उपस्थित केली.

दिग्दर्शक खरंतर निरुत्तर झाला होता. सिनेमात स्लॅपिंग सीन्समुळे हिंसाचार वाढत नाही रे... हल्ली तर टीव्ही, व्हिडिओ गेम्समध्येही हिंसाचार आणि रक्तपात असतो. त्याने वाढतो का हिंसाचार? एक चापट मारल्याने हिंसाचार वाढला तर आम्ही दिग्दर्शकांनी करायचं काय? असा आक्रोश तो आतून करत होता. खरंतर सेन्सॉरच्या कात्रीने वैचारिक हिंसाचार केला होता. पण बोलणार कुणाला? बाईने पुरुषाच्या श्रीमुखात भडकवल्यास सेन्सॉरच्या कैचीची गोची होणार का? असे अनेक प्रश्न दिग्दर्शकाला पडले. मुळाच थप्पड हा हिंसाचार असतो, का इथूनच त्याची सुरूवात होती. मात्र, त्याने आपली सर्व प्रतिभा, ज्ञान एकत्र आणत असिस्टंटला उत्तर दिलं.
सणसणीत कानाखाली!
आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये अग्रगण्य मानला जाणारा ‘बायसिकल थिफ’ या सिनेमातल्या हिंसाचाराचं उदाहरण दिग्दर्शकाने दिलं. “त्यातला एक सीन मला जगातला सर्वांत हिंसक वाटतो. ती हिंसा ना रॅम्बोच्या ‘गन’मध्ये आहे, ना आमिरच्या ‘गझनी’ मध्ये… दुसऱ्या महायुद्धात बेरोजगार बाप आपल्या लहानग्या पोराचं पोट भरावं यासाठी काम शोधत असतो. पोस्टर चिकटवण्याचं दिवसभराचं काम त्याला मिळतं. मात्र त्यासाठी सायकल असावी, एवढी एकमात्र अट असते. सायकल घेऊन बाप सानुल्या पोरासोबत पोस्टर चिकटवू लागतो. पण बिचाऱ्याची सायकल चोरीला जाते...” असिस्टंट कानात प्राण देऊन ऐकू लागला. “कथेच्या ओघात बापालाच सायकल चोर म्हणून पोलीस पकडतात. बाप हाता पाय पडून आपण चोर नसल्याचं सांगू लागतो. पण... पोलीस काय रे चोरा.. म्हणत त्याच्या सणसणीत कानाखाली मारतो... आपल्या कुटुंबासाठी राबणारा, वाट्टेल ते काम करून आपल्याला पोसणारा, आपल्या नजरेत हिरो असलेल्या बापाला ‘चोर’ म्हणत जेव्हा थोबाडीत खाताना तो चिमुकला पोरगा पाहातो आणि तो आतल्या आत कोसळतो. पाहाणारा प्रेक्षक छोट्याच्या नजरेत पाहून हादरतो... तेव्हा तो सीन प्रचंड हिंसक वाटतो. ती नजर ‘मेरा बाप चोर है’ या गोंदणामध्ये पण नाही. हिंसा अंगावर येते ती नजरेमुळे. चापटीमुळे नाही.” 


“सौंदर्य बघणाऱ्याच्या डोळ्यांत असतं. तसशी हिंसाही असावी. इतरवेळी क्रौर्याची परीसीमा गाठणारे सीन थिजवत नसताना एक मुस्कटात भडकवणारा सीन माणसाला मारहाणीला प्रेरित करेल? नजरेवरच सगळं अवलंबून आहे. आणि त्याहून जास्त सेन्सॉरच्या धोरणांवर...” दिग्दर्शक हे असिस्टंटशी बोलत होता की नाना पाटेकरप्रमाणे स्वतःशी हे खुद्द दिग्दर्शकही सांगू शकत नव्हता. आता मारायचे सीन कट केले तरी बिकिनीतलं हिरोइनचं सौंदर्य दाखवायला बंदी नसल्याचं समाधान मानत दिग्दर्शक हिरोइनला ‘कन्व्हिन्स’ करायला निघाला. असिस्टंट मात्र स्टन्ड होऊन विचार करत राहिला. त्याची नजर ‘त्या’ चिमुकल्यासारखीच अगतिक झाली होती, अणि कानात होती ‘थप्पड की गुँज...’ 
आदित्य नीला दिलीप निमकर
 
९९२०७०२९१७
 
(झी २४ तास वृत्तवाहिनीच्या www.24taas.com या संकेतस्थळावर लिहिलेला ब्लॉग)

Saturday, March 23, 2013

तहसीलदार कँटीनची झणझणीत मिसळ


 
मुंबईचं धाकटं भावंडं समजल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये खवय्येगिरीसाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणची रेस्टॉरंट्स, डायनिंग हॉल तर जागोजागी मिळणारे वडापाव, चाट कॉर्नर्सवर लोकांची गर्दी दिसते. स्टेशनपासून काही अंतरावर असणारं एक ठिकाण मात्र कायम गर्दीने अक्षरशः झाकून गेलेलं असतं. ते रेस्टॉरंट नाहीये. ती वडापावची गाडीही नाहीये. ना ती कुठली खानावळ आहे. ते ठाण्याच्या मामलेदार कचेरीखाली असणारं एक कँटिनसदृश ठिकाण. हे सुप्रसिद्ध आहे ते येथे मिळणाऱ्या मिसळीसाठी. इथली तिखट झणझणीत मिसळ संबंध मुंबईत फेमस आहे. लोक इथे लाईन लावून उभे असतात. रोज सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १०.३० पर्यंत हे कँटीन सुरू असतं. रविवारी मात्र कँटीन बंद असतं. एक प्लेट मिसळ मागवल्यावर 2 ग्लास पाणी लागतंच लागतं. आणि नाका-डोळ्यांतूनही चांगलंच पाणी निघतं. या कँटीनबद्दल अधिक माहिती मिळाली ती त्याचे मालक लक्ष्मण मुरुडेश्वर यांच्याकडून


 
या हॉटेलचं नक्की नाव काय आहे?
नाव असं काहीच नाही. पहिल्यापासून सगळे याला तहसीलदार कँटीन असं म्हणतात. याच नावाने सगळे ओळखतात.
 
कधी सुरू झालं हे कँटीन?
 
साधारण 46 -47 साली कँटीन सुरू झालं. माझे वडील नरसिंह मुरूडेश्वर यांनी हे कँटीन सुरू केलं होतं. आमचं मूळ गाव कारवारमधील मुरूडेश्वर. पण तिथल्या हालाखीच्या परिस्थितीमुळे वडील इथे आले. तहसीलदार कार्यालयाखाली चहापाण्याची टपरी सुरू केली. त्याचंच आता वाढता वाढता हे कँटीन बनलं आहे. १९५२ पर्यंत माझे वडीलच हे कँटीन संभाळत होते.
 
हे कँटीन प्रसिद्ध कशामुळे झालं?
 
खरं सांगायचं तर १९६० सालापर्यंत फारसं गिऱ्हाईक नव्हतंच आमच्याकडे. तहसीलदार कार्यालयामुळे थोड्या प्रमाणात चालत होतं कँटीन. पुढे ठाणे शहर मोठं होऊ लागलं, लोकसंख्या वाढू लागली. ठाण्यातली वस्ती वाढली. त्यामुळे आमच्या कँटीनला बरे दिवस आले. MIDC इथे आल्यापासून आमच्याकडील मिसळीचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला. आज आमच्याकडे ६० लोक काम करतात.
 
हे कँटीन मिसळीसाठी एवढं प्रसिद्ध कसं झालं?
 
इथली मिसळ खूप तिखट आणि झणझणीत असते. त्यामुळे ज्यांना झणझणीत खायची आवड आहे, ते लोक हमखास आमच्याकडे मिसळ खायला येतात. ही मिसळ खाताना नकातून, डोळ्यांतून पाणी येतंच येतं. ज्या लोकांना एवढी झणझणीत मिसळ खाणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही मीडियम तिखट मिसळही बनवतो. तरी लोकांना तडका मारलेली झणझणीत मिसळच हवी असते. आम्ही इतरही अनेक पदार्थ कँटीनमध्ये ठेवले आहेत. अगदी लाडू, शंकरपाळेसुद्धा आमच्याकडे मिळतात. पण सर्वाधिक खप होतो तो मिसळीचाच. ताक, लस्सी, कोल्ड ड्रिंक्सही चांगल्या प्रमाणात विकली जातात. पण त्याचं श्रेयही आमच्या झणझणीत मिसळीलाच जातं. दिवसाला कमीत कमी १००० प्लेट्स मिसळ तरी जातेच जाते.

 
तुमच्याकडील मिसळ बऱ्याच राजकारण्यांमध्ये, अभिनेत्यांमध्ये प्रसिद्ध आहे...

 
आहे खरी.. पण ते लोक इथे येऊन कधी मिसळ खात नाहीत. ही जागा खूप लहान आहे. भर बाजारपेठेत आहे. त्यामुळे एखादे नेते ठाण्यात आले असतील, तर त्यांची माणसं इथून मिसळ पार्सल घेऊन जातात. राज ठाकरेंना आमच्याकडील मिसळ आवडते. पण, ते कधी इकडे येऊन तर खाणार नाहीत. त्यामुळे मी खात्रीपूर्वक त्याबद्दल सांगू शकत नाही. कलाकारांचं म्हणाल, तर गडकरी रंगायतनला बऱ्याच वेळा आमच्याकडील मिसळ मागवली जात असते. त्यामुळे बऱ्याच मराठी कलाकारांना आमच्याकडील मिसळ आवडल्याचे अभिप्राय आम्हाला मिळाले आहेत.
 
तुम्हीही पहिल्यापासून हे कँटीन संभाळण्याचंच काम करायचं ठरवलेलंत का?
 
ते आपोआप घडलं. हे कँटीन एवढं मोठं होईल, प्रसिद्ध होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण १९६० नंतर ते नावारुपाला आलं. तो पर्यंत मी वडिलांसोबत इथे यायचो. शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यामुळे यातच पुढे लक्ष घालायचं ठरवून मी काम करू लागलो. कँटीन संभाळणारी माझी पिढी ही दुसरीच. या पिढीत मी एकटाच असल्यामुळे मीच कँटीन संभाळू लागलो.

 
वडिलांनंतर तुम्ही कँटीन संभाळू लागलात, तेव्हा मिसळीची ती चव ठेवणं कसं जमलं?
 
आमच्याकडे पहिल्यापासून मिसळीसाठी मसाल्यांचं एक माप ठरवून दिलेलं आहे. त्याच प्रमाणात आम्ही आजही मसाले घालतो. त्यामुळे मिसळीची चव अबाधित राहिली आहे.

 
हे कँटीन संभाळणारी तुमची दुसरी पिढी... पुढच्या पिढ्यांचा काय विचार आहे?
 
१९९१ साली आम्ही जवळच आमंत्रण हॉटेल उघडलं. माझा मुलगा ते हॉटेल संभाळतो. त्याचा मुलगा सध्या कॉलेजला आहे. त्याने पुढे या व्यवसायात उतरायचं की नाही, हे तोच ठरवेल.
 
केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित राहाण्याचा विचार आहे की मुंबईतसुद्धा ही मिसळ उपलब्ध करून देण्याच्या योजना आहेत?
 
व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे. पण, वयाप्रति ते मला सध्या शक्य वाटत नाही. माझं वय आता ६३ आहे. भविष्यात पुढच्या पिढ्यांनी त्यासाठी काम केलं, तर नक्कीच मुंबईतसुद्धा आमची मिसळ मिळू शकेल.

-    रवीश निमकर
९९२०७०२९१७
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)


‘बडे मियाँ’ तो बडे मियाँ....



मुंबई महानगर... या महानगराच्या पोटात सगळीकडे पोटार्थी लोकांची गर्दी.. आणि या गर्दीची पोटं भरण्यासाठी वडापावच्या गाड्यांपासून ते उंची फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत सगळेजण योगक्षेमं वहाम्यहम् म्हणत हात जोडून उभे असतात. मुंबईच्या कुलाबा कॉजवेमध्येही एकीकडे ताजसारखं विश्वविख्यात फाईव्ह स्टार हॉटेल आहे, तर त्याच्याच मागच्या गल्लीत बडे मियाँसारखं अपरात्रीसुद्धा पोटाचे आणि जीभेचे चोचले पुरवणारा रोडसाईड ठेलादेखील आहे. म्हटलं तर ठेला पण ताज हॉटेलइतकाच मुंबईत नावाजलेला ब्रँड बनला आहे. 
बडे मियाँच्या मालकांपैकी एक असणाऱ्या सलमान शेखशी बडे मियाँबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना भेटलो. आणि मुंबईतल्या या सुप्रसिद्ध बडे मियाँबद्दल माहिती मिळवली.

बडे मियाँ मूळचे कुठले?
उत्तर प्रदेशातील बिजनौर या छोट्या गावातले. तिथून १३ वर्षांचा यासीन मोहम्मद मुंबईत आला. मटणाचे तुकडे करणं आणि वेगवेगळ्या हॉटेलांना पुरवण्याचं काम तो करत असे. त्यांची गुरू हाजरत फिदा मोहम्मद आदम चिश्ती यांच्यावर प्रचंड श्रद्धा होती. त्यांनी लोकांची उत्तम आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याची शिकवण दिली होती. बक्षिस म्हणून या मुलाला २० रुपयेही दिले आणि सीख कबाबांचं दुकान उघडण्याची सूचना केली. हा मुलगा मोहम्मद यासीन म्हणजेच बडे मियाँ...   
बडे मियाँची स्थापना कधी आणि कशी झाली?
स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वर्षभर आधी म्हणजे १९४६मध्ये मोहम्मद यासीन यांनी या कुलाबा कॉजवे परिसरात फूटपाथवर सीख कबाब विकायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ १ शेगडी होती. त्यावरच सीख कबाब भाजले जायचे. मोकळ्या हवेत या भाजल्या जात असलेल्या कबाबांचा वास असा काही जाणाऱ्या येणाऱ्यांना धुंद करायचा, की आपोआप कबाब खायला पावलं वळायची.. हळूहळू या कबाबांचे शौकीन वाढले.. व्यवसाय वाढत गेला आणि बडेमियाँ मुंबईतील एक महत्वाचं फूड जॉइंट बनलं. मोहम्मद यासीन यांचा उत्तर भारतीय खानदानी मुस्लिम पेहराव पाहून लोक त्यांना बडे मियाँ संबोधत असत. अखेर या सीख कबाब कॉर्नरला बडेमियाँ हेच नाव पडलं.
एवढं प्राइम लोकेशन कसं काय मिळालं?
दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे हा श्रीमंत आणि पर्यटकांनी गजबजलेला भाग वाटत असला, तरी त्या काळी या रस्त्याला अक्षरशः सामसूम होती. उलट,  चिश्तींनीही जेव्हा या ठिकाणी सीख कबाबांचं दुकान उघडण्याची कल्पना ऐकवली, तेव्हा बडे मियाँनी हाच प्रशन विचारला, की या वैराण भागात माझे कबाब खायला येणार कोण? पण चिश्तींनी याच जागेत बडे मियाँना भरभराटीचं मूळ असल्याचा विश्वास दिला... आणि घडलंही तसंच... बडे मियाँचं नाव आणि कबाब लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. दूर दूरवरून लोक बडे मियाँकडे कबाब खाण्यासाठी वाट वाकडी करून येऊ लागले. बडे मियाँचं नाव नावारुपाला येण्यामागे सर्वांत मोठा हात मात्र भारतीय नौदलाचा आहे. इथून जवळच असलेल्या नेव्हीच्या क्वार्टर्समधील ऑफिसर्स पहिल्यापासून मोठ्या प्रमाणावर इथे येऊन कबाब खात. बडे मियाँ हे नावदेखील या नेव्हीच्या लोकांकडूनच मोहम्मद यासीन यांना मिळाले.
इथले कुठले पदार्थ जास्त लोकप्रिय आहे?
पूर्वी मटणाचे पदार्थ जास्त खाल्ले जात. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात लोकांची आवड बदलली. त्यांना चिकन खाणं जास्त आवडू लागलं. त्यामुळे आज चिकनचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. चिकन सीख कबाब रोल, चिकन टिक्का, चिकन खिमा यांसारख्या पदार्थांची मागणी आज सर्वांत जास्त आहे. त्यामुळे चिकनचेच पदार्थ जास्त आहेत. मात्र आता व्हेज पदार्थही लोकांना आवडू लागले आहेत. मुख्य म्हणजे आम्ही व्हेज साठी काऊंटरही वेगळं ठेवलंय. जेव्हा एखादा खाणाऱ्यांचा ग्रुप येतो, तेव्हा त्यातले काहीजण शाकाहारी असतात, गुजराथी आणि मारवाडी समाजाचे बरेचजण इथे येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही व्हेज काऊंटर वेगळं उघडलंय. आता तिथेही बरीच गर्दी असते. आज ६५% लोक इथे नॉन-व्हेज खात असतील, तर ३५% लोक व्हेज फूड खातात. इथले पनीर टिक्का, पनीर सीख कबाबही खूप लोकप्रिय आहे.
ही बडे मियाँची कितवी पिढी?
आमची पिढी ही तिसरी पिढी... बडे मियाँची पाच मुलं. ते हे व्यवसाय संभाळू लागले. यांची मुलं म्हणजे आमची पिढी बडे मियाँ संभाळत आहे. आमच्या पिढीत एकंदर १३ भावंडं आहेत. सर्व मिळून एकत्र हा व्यवसाय संभाळतो.
लहानपणापासून तुम्ही हाच व्यवसाय संभाळण्याचं ठरवलेलंत का?
हो. आमच्याकडे कुणाला कधी याच व्यवसायात येण्याची बळजबरी नसते. पण, बडे मियाँचाच व्यापार एवढा मोठा आहे, की तो संभाळण्याचंच काम आपोआप करायला लागलो. पुढच्या पिढीचंही कदाचित तसंच होईल. मुळात, बडे मियाँचं नेहमी सांगणं असायचं, की नोकरी करू नका, नोकरी करणाऱ्याला  एक दिवस निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत बडे मियाँतर्फे कायम लोकांची सेवा करू.
तुम्ही बडे मियाँ संभाळण्यापूर्वी काही विशेष शिक्षण घेतलेलंत का?
हो. मी आयएचएम, औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. त्यानंतर अनुभवासाठी काही काळ विदेशातील हॉटेल्समध्ये कामही केलं. माझी बहुतेक भावंडंही याच मार्गाने व्यवसायात शिरतील.
पण इतकी वर्षं तुम्ही बडे मियाँच्या पदार्थांची चव, गुणवत्ता तशीच कशी काय राखू शकलात?
याचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबाला बडे मियाँनी दिलेला सिक्रेट मसाला.. तो मसाला फक्त आमच्या कुटुंबालाच माहित आहे. आजही बडे मियाँमध्ये पदार्थ बनवताना त्यात मसाला आम्ही आमच्या हातानेच घालतो. तसंच सकाळी चिकन, मटण ते अगदी पनीरही आम्हा कुटुंबियांपैकीच एकजण सकाळी जाऊन आमच्या ठरलेल्या सप्लायर्सकडून जिन्नस निवडून आणतो. अर्थात ते मसाले आणि सप्लायर्स यांची माहिती आम्ही कधीही उघड करत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या काउंटरवर पाहिलं असेल, तिथ कुठल्याही प्रकारची स्टोअरेज सिस्टम नाही, फ्रिज वगैरे नाही. आम्ही ग्राहकांना कायम ताजे पदार्थच देतो. एखादवेळेस जिन्नस कमी पडले तर सप्लायर्सकडून ऐनवेळी मागवतो. पण, बेगमी करून ठेवत नाही.
दिवसाला साधारण किती ग्राहक येतात?
वीकेण्डच्या सुमारास दररोज संध्याकाळी सुमारे १ लाख लोक येतात. इतर दिवशीही साधारण तेवढीच गर्दी असते. इथे मर्सिडिससारख्या गांड्यांमधून लोक खायला येतात, आणि कारच्या टबवर प्लेट ठेवून खातात, इतकं त्यांना बडे मियाँचं आकर्षण आहे. विदेशी पाहुणेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर येतात. ते एवढं मसालेदार खाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी सौम्य मसाले वापरून कबाब बनवतो. तसंच काही वेळा प्रवासामध्ये ऍडव्हेंचर म्हणून विदेशी लोक स्पेशल तिखट, मसालेदार पदार्थही मागवतात. सौदी अरेबिया, युरोप, अमेरिकेतून आलेल्या लोकांनाही बडे मियाँतले पदार्थ खूप आवडतात. ताजमध्ये पार्टीसाठी आलेले, आसपासच्या डिस्कोथेकमध्ये थिरकायला आलेले कित्येक तरुण रात्री- अपरात्री बडे मियाँमध्ये गरमा-गरम कबाब, टिक्के खायला येतात. मोकळ्या हवेत रात्रीच्या वेळी बडे मियाँचे कबाब खाणं ते फाईव्ह स्टारच्या वातावरणापेक्षा जास्त एंजॉय करतात.
कुणी सेलिब्रिटी येतात?
राज कपूर बडे मियाँच्या कबाबांचे खूप शौकीन होते. मुंबईतले बहुतेक सगळे सेलिब्रिटी इथे हजेरी लावत असतात. टीव्हीवर काम करणारे जवळपास सर्वच कलाकार रात्री इथे येतात, जॅकी श्रॉफ तर महिन्यातून दोन-तीन वेळा येतातच येतात. पण सेलिब्रिटी म्हणून कुणाला वेगळी वागणूक मिळत नाही. आमच्यासाठी आमचा प्रत्येक ग्राहक सेलिब्रिटीच असतो.
भविष्यात बडे मियाँचा पसारा आणखी वाढवण्याचा काही विचार आहे का?
नक्कीच आमचा तसा इरादा आहे, गेल्या ८० वर्षांत पहिल्यांदाच आम्ही हॉर्निमन सर्कलला मोठं रेस्टॉरंट उघडलं आहे. अशीच आणखी रेस्टॉरंट्स उघडण्याचा आमचा मानस आहे. मात्र चेन किंवा फ्रंचाइजी बनवण्याची आमची इच्छा नाही. ज्याप्रमाणे मघाशी म्हणालो त्याप्रमाणे पदार्थांमध्ये मसाला घालण्याचं काम आमच्याच कुटुंबातील लोक करतात. ते मसाले आम्ही कुणासमोर उघड करत नाहीत. त्यामुळे इतरत्र जरी बडे मियाँची हॉटेल्स उघडली, तरी ते काम आमचंच कुटुंब करेल. सध्या आम्ही लक्ष मुंबईवर केंद्रित केलं असलं, तरी इन्शाल्ला भविष्यात देशभरात बडे मियाँची हॉटेल्स उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू....   
 
आदित्य (रवीश) निमकर
9920702917
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)  

Sunday, December 30, 2012

‘प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो...’

आदित्य निमकर

लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय.  त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या बाजूने असं बरंच बोललं जातंय. पण, त्यापलिकडे आपण या नात्याकडे बघू शकतोय का? मूळात लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय? लग्न न करता दोन व्यक्तींनी एकत्र राहून स्वीकारलेले सहजीवन अशी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची सोपी व्याख्या होईल. पण खरं सांगायचं तर लिव्ह-इनची संकल्पना मुळीच पाश्चात्त्य नाहीये. ती मध्ययुगापासून अस्तित्वात आहे. बहुतेक त्या ही आधीपासूनच. आदिम काळापासून. आणि ही संकल्पना शरीरसंबंधांइतकीच वैश्विक आहे. त्याकाळी 'लिव्ह इन' हा शब्द अस्तित्वात नव्हता, पण असे नातेसंबंध होते. 'माणूस' हा सिनेमा एक पोलीस वेश्येला राहण्यासाठी खोली घेऊन तिच्यासोबत घरोब्याचा केलेला विचार करू लागतो अशा थीमवर बनवला गेला होता. तो ही १९३८साली. सखाराम बाईंडरमधला काही हिंसात्मक अपवाद सोडला तर दिसतं की  सखाराम हा ही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मधलाच घटक होता. त्याला जगाने नावं ठेवली तरी तो त्याच्या तथाकथित तत्वांवर जगत होता. आजच्या काळात माणूस तसंच जगतोय ना..  समाजाची पर्वा करण्यापेक्षा आपण आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून जगलेलं आयुष्य जास्त महत्वाचं. ते 'लिव्ह इन'चंच रूप होतं.
 
आजच्या काळात प्रत्येक गोष्टीत इनसेक्युरिटी वाढत चालली आहे. नोकरी टिकेल का याची खात्री नसते. लग्नही केल्यावर ते टिकेल याची शाश्वती नसते. मग अशा अशाश्वत गोष्टींचा ताळमेळ बसवताना दमछाक होत असते. एकमेकांची गरज तर आहे, पण संसार संसार असं जे म्हणतात ते करायला वेळ नाही. अशा परिस्थितीत लिव्ह इनचा पर्याय सोपा वाटतो.
 
पण दोन्ही बाबतीतही पुढचा विचार करावाच लागतो. जसं लग्न झाल्यावर पुढचं प्लॅनिंग सुरू होतं तसंच ‘लिव्ह इन’मध्येही हा विचार सुरू होतोच की. लिव्ह इनमध्ये राहाण्याचा एक मोठा विश्वास म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं. पण आज बघितलं तर बहुतेक विवाहीत मंडळींमध्ये नवरा- बायको दोघेही कमावते असतात. आपापल्या पायावर उभे असतात.  स्वतंत्र असतात.    लग्नानंतर लाईफ पार्टनर असतो लिव्ह इनमध्ये नुसता पार्टनर असतो. (लाईफ लाँग पार्टनर नसतो हाच एक फरक. कधी कधी लाईफ विदाऊट पार्टनर असह्य होतं तेव्हा पार्टनर विदाऊट लाईफ लाँग रिलेशन हा उपाय आकर्षक वाटतो.)
 
लिव्ह इनमध्ये  आपलं स्वातंत्र्य अबाधित राहातं. नाती परिपक्व होत जाताना लग्नं हा फक्त एक सोपस्कार उरतो. सर्वच पातळींवर जवळीक साधल्यावर ती स्वेच्छेने की देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने हा विचारच उरतो कुठे?
 
पण... लिव्ह इनमध्ये ज्या प्रकारे राहातो, त्याच प्रकारे लग्न करून माणूस राहात असतो ना... एकमेकांचा आधारही आणि स्वातंत्र्यही.  पण, लिव्ह इन मध्येही तुम्ही मानसिक पातळीवर कमिटेड झालात की दुसऱ्याशी संबंध ठेवावासा वाटत नाही. आणि लग्न करूनही काही जणांना विवाहबाह्य संबंध ठेवल्याशिवाय राहावत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य हा मुद्दा व्यक्तिसापेक्ष बनला आहे. लिव्ह इनमधून बाहेर पडलं की पुढे काय? हा विचार नेहमीच रिलेशन सुरू होण्यापूर्वी केलेला असतो. त्याच आधारावर लिव्ह-इन सुरू होते. मात्र, लग्नाच्यावेळी हा विचार केला जात नाही. पण, काहींच्या बाबतीत घटस्फोट ही गोष्टही घडतेच ना. लिव्ह इनमधून बाहेर पडलं काय किंवा घटस्फोटित बनलं काय… दोघांच्या परिस्थितीत फरक काय ? दोघांकडे पाहायच्या नजरा सारख्याच. मग, फरक कुठला?
 
पझेसिव्हनेस, संसारव्याप, राहाण्याची समस्या यांचा विचार जमेस धरला तर  लिव्ह इन रिलेशनशीप' ह्या संकल्पनेची आज खूप गरज आहे. मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरणाऱ्या एकाकीपणाला लिव्ह-इन चा पर्याय  उपयुक्त  ठरू शकतो.
 
उतारवयात लग्नासारख्या सोपस्कारांमध्ये न अडकता सहजीवन अनुभवण्यासाठी ८२ वर्षांच्या अरविंद गोडबोले यांनी नागपुरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ’ स्थापन केलं. त्याचं उपकेंद्र ठाण्यात सुरू करण्याचा निर्णयही नुकताच  घेण्यात आला आहे. म्हणजे अशा गोष्टी नकोच असं कसं म्हणणार?
 
लग्न न करताही सहजीवन जगणं हे आदिम आणि तितकंच नैसर्गिक आहे. उलट ‘विवाह’ ही नंतर आलेली संकल्पना आहे, हे मान्य करायला हवं. त्याला संस्कारांचं नाव दिलं तरीही मूळ तत्वांचं, प्रवृत्तींचं दमन करणं अशक्य आहे. शेवटी तो वैयक्तिक प्रश्न आहे. विवाह ही सोयही असते,तर कधी समस्याही असू शकते. व्यक्तिसापेक्ष बदलणाऱ्या या गोष्टीला एकाच नियमात कसं बसवता येईल. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न मानून त्याचा आदर केला, तर लिव्ह इनमध्ये काहीच वाईट नाही.