Sunday, July 7, 2013

सणसणीत कानाखाली!

“सर, सर बातमी पाहिलीत का?”

एक गोंधळलेला भांबावलेला असिस्टंट नामांकित, प्रथितयश अशा आपल्या दिग्दर्शकाला भेटून सांगू लागला. दिग्दर्शक आपल्या प्रगल्भ आणि विचारी नजरेने असिस्टंटकडे पाहू लागला. मोठ्या प्रयत्नांनी दिग्दर्शकाने ही नजर कमावलेली होती. इतर वेळी हिरोइन्सकडे आशाळभूत नजरेने पाहाण्याचाच त्याच्या डोळ्यांना सराव असावा. आपल्याला ब्रह्मज्ञान असल्याचा जरी दिग्दर्शकाने आव आणला असला, तरी त्याने असिस्टंट सांगत असलेली बातमी पाहिली नसल्यामुळे जरा गोंधळच उडाला होता. 

“कुठली बातमी?”- दिग्दर्शक

“सेन्सॉर बोर्डाची...”- असिस्टंट

सेन्सॉर बोर्डाला टाळं लावण्यात येतंय की काय अशी शंका दिग्दर्शकाच्या मनात डोकावली आणि आतल्या आतच त्याला गुदगुल्या झाल्या. पण बातमी भलतीच होती. 

“यापुढे सिनेमात महिलांना थोबाडीत मारायची दृश्यं दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...” असिस्टंटने शुभवर्तमान कळवलं. बातमी सांगताना त्याचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा झाला होता. बातमी ऐकून दिग्दर्शकच्या चेहऱ्यावर जे भाव अवतरले, ते सराईत हिरोही आणू शकणार नाही असे होते. काहीसा तुच्छतापूर्वक, काहीसा वैतागल्यासारखा असे अनेक भाव चेहऱ्यावर एकत्र आणत दिग्दर्शक गूढ हसला. (म्हणजे नेमका कसा? साधारण राहुल गांधींचं नाव काढलं की भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर कसे भाव असतात... किंवा नारायण राणेंचं नाव काढल्यावर उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर जसे भाव असतात... किंवा नरेंद्र मोदी सोडून इतर कुठल्याही नेत्याचं नाव काढलं की राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर जसे भाव असतात तसे...)

“अरे भाई, बरोबर आहे.. स्त्रिया या थोबाडीत खाण्यासाठी नसून पुरुषांनी त्यांच्यावर प्रेम करावं यासाठी असतात...” ऑस्कर वाइल्डचं कुठलंतरी वाक्यं आपल्या थाटात मारत दिग्दर्शकाने आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेची छाप भेदरलेल्या असिस्टंटवर पाडली. 

“पण सर, आता आपल्या सिनेमाचं काय?” असिस्टंटने घाबरून विचारलं?

“का?”- दिग्दर्शकाने त्याच पट्टीत प्रश्न केला.

“आपल्या सिनेमात हिरोइनच्या ८ वेळा थोबाडीत मारल्याची दृश्यं आहेत.” असिस्टंटचा संयम संपत आला होता.

दिग्दर्शकाचा खरंतर गोंधळ उडाला होता. सिनेमात हिरोइन्सच्या किसिंगचे सीन्स किती आहेत, याचाच हिशेब त्याच्याकडे होता. याच आकड्यांचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी करायचा बेत त्याने आखला होता. आता खरंच दिग्दर्शकाला आपल्या चेहऱ्यावरचे अभ्यासू भाव टिकवणं अशक्य झालं. यापूर्वी सेन्सॉरने तमाम शीला,मुन्न्या, अनरकल्या, चमेल्या, बबल्यांना परवानगी देऊन आता त्याच्या सिनेमातील ‘रसाळ रसिली’ या आयटम साँगला ‘गचाळ रसिली’ म्हणत टीव्हीवर दाखवण्याची परवानगी नाकारली होती. सिनेमातला सर्वांत जास्त खर्च याच गाण्यावर खरंतर झाला होता. महागडी आयटम गर्ल आणि (वीतभर असले तरी) तिच्याहून महाग असणारे कपडे यावर खर्च करताना निर्मात्याचे डोळे पांढरे झाले होते. निदान हे गाणं टीव्हीवर दिसलं, की लोक मोठ्या पडद्यावर हे गाणं पाहायला येऊन त्यांचे डोळे पांढरे करता येतील आणि त्यातून आपलं उखळ पांढरं होईल, असा दिग्दर्शकाचा अंदाज होता. पण आता सेन्सॉरच्या कात्रीमुळे हे गाणं फक्त इंटरनेटवर दाखवणं शक्य होतं. त्यानंतर घोड्यावरून येणाऱ्या नायकाचे सीन्सही प्राणीमित्र संघटनांच्या दबावाला बळी पडत सेन्सॉरने कट केले होते. अश्लील दृश्यांना कलात्मकतेची झालर देण्याचा प्रयत्न अंगाशी आला होता. सेन्सॉरच्या कृपेने ‘दिग्दर्शकीय नजरे’ला दिसलेलं सिनेमातलं स्त्री सौंदर्य प्रेक्षकांना दिसणं अशक्य झालं होतं. आता सिनेमात दाखवायचं तरी काय असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला होता. तामिळनाडूत म्हणे सिनेमातही रजनीकांतवर कुणी हात उचललेला चाहत्यांना पचत नाही. अशा सीन्सवर बंदी आणण्याची मागणी केली गेली होती. पण हिंदीत बंदी घातली समस्त महिला वर्गावरील अन्यायाला! टीव्हीवर अशी बंदी घातली तर काय होईल ? डेली सोप्सवाले तर घरीच बसतील... 
सणसणीत कानाखाली!

पण उसनं अवसान आणत दिग्दर्शकाने बोलायला सुरूवात केली. नाना पाटेकर जसा बोलताना समोरच्याशी बोलतोय, की स्वतःशीच बुद्धीवादी संवाद साधतोय असं वाटतं ना.. तसाच काहीशा पद्धतीने बोलत दिग्दर्शकाने असिस्टंटला समजवायला सुरूवात केली. “आजचा सिनेमा हा खूप पुरोगामी आहे. आणि सेन्सॉर प्रतिगामी. आता बघ ना... जुन्या सिनेमात रणजीत, शक्ती कपूर, गुलशन ग्रोवर यांचे महिला वर्गावर बलात्कार करण्याचे सीन्स असायचे... आता बिचाऱ्यांकडे फारसं कामच नाहीये. कारण...” दिग्दर्शकाने पॉझ घेतला. “कारण, हल्ली बलात्काराच्या सीनसाठी आवश्यक असणारी किमान प्रॉपर्टी म्हणजे कपडे हिरोइन्स एवढे कमी घातलात, की हे वस्त्रं फाडणार तरी कशी?” असिस्टंटने शंका उपस्थित केली.

दिग्दर्शक खरंतर निरुत्तर झाला होता. सिनेमात स्लॅपिंग सीन्समुळे हिंसाचार वाढत नाही रे... हल्ली तर टीव्ही, व्हिडिओ गेम्समध्येही हिंसाचार आणि रक्तपात असतो. त्याने वाढतो का हिंसाचार? एक चापट मारल्याने हिंसाचार वाढला तर आम्ही दिग्दर्शकांनी करायचं काय? असा आक्रोश तो आतून करत होता. खरंतर सेन्सॉरच्या कात्रीने वैचारिक हिंसाचार केला होता. पण बोलणार कुणाला? बाईने पुरुषाच्या श्रीमुखात भडकवल्यास सेन्सॉरच्या कैचीची गोची होणार का? असे अनेक प्रश्न दिग्दर्शकाला पडले. मुळाच थप्पड हा हिंसाचार असतो, का इथूनच त्याची सुरूवात होती. मात्र, त्याने आपली सर्व प्रतिभा, ज्ञान एकत्र आणत असिस्टंटला उत्तर दिलं.
सणसणीत कानाखाली!
आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये अग्रगण्य मानला जाणारा ‘बायसिकल थिफ’ या सिनेमातल्या हिंसाचाराचं उदाहरण दिग्दर्शकाने दिलं. “त्यातला एक सीन मला जगातला सर्वांत हिंसक वाटतो. ती हिंसा ना रॅम्बोच्या ‘गन’मध्ये आहे, ना आमिरच्या ‘गझनी’ मध्ये… दुसऱ्या महायुद्धात बेरोजगार बाप आपल्या लहानग्या पोराचं पोट भरावं यासाठी काम शोधत असतो. पोस्टर चिकटवण्याचं दिवसभराचं काम त्याला मिळतं. मात्र त्यासाठी सायकल असावी, एवढी एकमात्र अट असते. सायकल घेऊन बाप सानुल्या पोरासोबत पोस्टर चिकटवू लागतो. पण बिचाऱ्याची सायकल चोरीला जाते...” असिस्टंट कानात प्राण देऊन ऐकू लागला. “कथेच्या ओघात बापालाच सायकल चोर म्हणून पोलीस पकडतात. बाप हाता पाय पडून आपण चोर नसल्याचं सांगू लागतो. पण... पोलीस काय रे चोरा.. म्हणत त्याच्या सणसणीत कानाखाली मारतो... आपल्या कुटुंबासाठी राबणारा, वाट्टेल ते काम करून आपल्याला पोसणारा, आपल्या नजरेत हिरो असलेल्या बापाला ‘चोर’ म्हणत जेव्हा थोबाडीत खाताना तो चिमुकला पोरगा पाहातो आणि तो आतल्या आत कोसळतो. पाहाणारा प्रेक्षक छोट्याच्या नजरेत पाहून हादरतो... तेव्हा तो सीन प्रचंड हिंसक वाटतो. ती नजर ‘मेरा बाप चोर है’ या गोंदणामध्ये पण नाही. हिंसा अंगावर येते ती नजरेमुळे. चापटीमुळे नाही.” 


“सौंदर्य बघणाऱ्याच्या डोळ्यांत असतं. तसशी हिंसाही असावी. इतरवेळी क्रौर्याची परीसीमा गाठणारे सीन थिजवत नसताना एक मुस्कटात भडकवणारा सीन माणसाला मारहाणीला प्रेरित करेल? नजरेवरच सगळं अवलंबून आहे. आणि त्याहून जास्त सेन्सॉरच्या धोरणांवर...” दिग्दर्शक हे असिस्टंटशी बोलत होता की नाना पाटेकरप्रमाणे स्वतःशी हे खुद्द दिग्दर्शकही सांगू शकत नव्हता. आता मारायचे सीन कट केले तरी बिकिनीतलं हिरोइनचं सौंदर्य दाखवायला बंदी नसल्याचं समाधान मानत दिग्दर्शक हिरोइनला ‘कन्व्हिन्स’ करायला निघाला. असिस्टंट मात्र स्टन्ड होऊन विचार करत राहिला. त्याची नजर ‘त्या’ चिमुकल्यासारखीच अगतिक झाली होती, अणि कानात होती ‘थप्पड की गुँज...’ 
आदित्य नीला दिलीप निमकर
 
९९२०७०२९१७
 
(झी २४ तास वृत्तवाहिनीच्या www.24taas.com या संकेतस्थळावर लिहिलेला ब्लॉग)

Saturday, March 23, 2013

तहसीलदार कँटीनची झणझणीत मिसळ


 
मुंबईचं धाकटं भावंडं समजल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये खवय्येगिरीसाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणची रेस्टॉरंट्स, डायनिंग हॉल तर जागोजागी मिळणारे वडापाव, चाट कॉर्नर्सवर लोकांची गर्दी दिसते. स्टेशनपासून काही अंतरावर असणारं एक ठिकाण मात्र कायम गर्दीने अक्षरशः झाकून गेलेलं असतं. ते रेस्टॉरंट नाहीये. ती वडापावची गाडीही नाहीये. ना ती कुठली खानावळ आहे. ते ठाण्याच्या मामलेदार कचेरीखाली असणारं एक कँटिनसदृश ठिकाण. हे सुप्रसिद्ध आहे ते येथे मिळणाऱ्या मिसळीसाठी. इथली तिखट झणझणीत मिसळ संबंध मुंबईत फेमस आहे. लोक इथे लाईन लावून उभे असतात. रोज सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १०.३० पर्यंत हे कँटीन सुरू असतं. रविवारी मात्र कँटीन बंद असतं. एक प्लेट मिसळ मागवल्यावर 2 ग्लास पाणी लागतंच लागतं. आणि नाका-डोळ्यांतूनही चांगलंच पाणी निघतं. या कँटीनबद्दल अधिक माहिती मिळाली ती त्याचे मालक लक्ष्मण मुरुडेश्वर यांच्याकडून


 
या हॉटेलचं नक्की नाव काय आहे?
नाव असं काहीच नाही. पहिल्यापासून सगळे याला तहसीलदार कँटीन असं म्हणतात. याच नावाने सगळे ओळखतात.
 
कधी सुरू झालं हे कँटीन?
 
साधारण 46 -47 साली कँटीन सुरू झालं. माझे वडील नरसिंह मुरूडेश्वर यांनी हे कँटीन सुरू केलं होतं. आमचं मूळ गाव कारवारमधील मुरूडेश्वर. पण तिथल्या हालाखीच्या परिस्थितीमुळे वडील इथे आले. तहसीलदार कार्यालयाखाली चहापाण्याची टपरी सुरू केली. त्याचंच आता वाढता वाढता हे कँटीन बनलं आहे. १९५२ पर्यंत माझे वडीलच हे कँटीन संभाळत होते.
 
हे कँटीन प्रसिद्ध कशामुळे झालं?
 
खरं सांगायचं तर १९६० सालापर्यंत फारसं गिऱ्हाईक नव्हतंच आमच्याकडे. तहसीलदार कार्यालयामुळे थोड्या प्रमाणात चालत होतं कँटीन. पुढे ठाणे शहर मोठं होऊ लागलं, लोकसंख्या वाढू लागली. ठाण्यातली वस्ती वाढली. त्यामुळे आमच्या कँटीनला बरे दिवस आले. MIDC इथे आल्यापासून आमच्याकडील मिसळीचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला. आज आमच्याकडे ६० लोक काम करतात.
 
हे कँटीन मिसळीसाठी एवढं प्रसिद्ध कसं झालं?
 
इथली मिसळ खूप तिखट आणि झणझणीत असते. त्यामुळे ज्यांना झणझणीत खायची आवड आहे, ते लोक हमखास आमच्याकडे मिसळ खायला येतात. ही मिसळ खाताना नकातून, डोळ्यांतून पाणी येतंच येतं. ज्या लोकांना एवढी झणझणीत मिसळ खाणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही मीडियम तिखट मिसळही बनवतो. तरी लोकांना तडका मारलेली झणझणीत मिसळच हवी असते. आम्ही इतरही अनेक पदार्थ कँटीनमध्ये ठेवले आहेत. अगदी लाडू, शंकरपाळेसुद्धा आमच्याकडे मिळतात. पण सर्वाधिक खप होतो तो मिसळीचाच. ताक, लस्सी, कोल्ड ड्रिंक्सही चांगल्या प्रमाणात विकली जातात. पण त्याचं श्रेयही आमच्या झणझणीत मिसळीलाच जातं. दिवसाला कमीत कमी १००० प्लेट्स मिसळ तरी जातेच जाते.

 
तुमच्याकडील मिसळ बऱ्याच राजकारण्यांमध्ये, अभिनेत्यांमध्ये प्रसिद्ध आहे...

 
आहे खरी.. पण ते लोक इथे येऊन कधी मिसळ खात नाहीत. ही जागा खूप लहान आहे. भर बाजारपेठेत आहे. त्यामुळे एखादे नेते ठाण्यात आले असतील, तर त्यांची माणसं इथून मिसळ पार्सल घेऊन जातात. राज ठाकरेंना आमच्याकडील मिसळ आवडते. पण, ते कधी इकडे येऊन तर खाणार नाहीत. त्यामुळे मी खात्रीपूर्वक त्याबद्दल सांगू शकत नाही. कलाकारांचं म्हणाल, तर गडकरी रंगायतनला बऱ्याच वेळा आमच्याकडील मिसळ मागवली जात असते. त्यामुळे बऱ्याच मराठी कलाकारांना आमच्याकडील मिसळ आवडल्याचे अभिप्राय आम्हाला मिळाले आहेत.
 
तुम्हीही पहिल्यापासून हे कँटीन संभाळण्याचंच काम करायचं ठरवलेलंत का?
 
ते आपोआप घडलं. हे कँटीन एवढं मोठं होईल, प्रसिद्ध होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण १९६० नंतर ते नावारुपाला आलं. तो पर्यंत मी वडिलांसोबत इथे यायचो. शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यामुळे यातच पुढे लक्ष घालायचं ठरवून मी काम करू लागलो. कँटीन संभाळणारी माझी पिढी ही दुसरीच. या पिढीत मी एकटाच असल्यामुळे मीच कँटीन संभाळू लागलो.

 
वडिलांनंतर तुम्ही कँटीन संभाळू लागलात, तेव्हा मिसळीची ती चव ठेवणं कसं जमलं?
 
आमच्याकडे पहिल्यापासून मिसळीसाठी मसाल्यांचं एक माप ठरवून दिलेलं आहे. त्याच प्रमाणात आम्ही आजही मसाले घालतो. त्यामुळे मिसळीची चव अबाधित राहिली आहे.

 
हे कँटीन संभाळणारी तुमची दुसरी पिढी... पुढच्या पिढ्यांचा काय विचार आहे?
 
१९९१ साली आम्ही जवळच आमंत्रण हॉटेल उघडलं. माझा मुलगा ते हॉटेल संभाळतो. त्याचा मुलगा सध्या कॉलेजला आहे. त्याने पुढे या व्यवसायात उतरायचं की नाही, हे तोच ठरवेल.
 
केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित राहाण्याचा विचार आहे की मुंबईतसुद्धा ही मिसळ उपलब्ध करून देण्याच्या योजना आहेत?
 
व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे. पण, वयाप्रति ते मला सध्या शक्य वाटत नाही. माझं वय आता ६३ आहे. भविष्यात पुढच्या पिढ्यांनी त्यासाठी काम केलं, तर नक्कीच मुंबईतसुद्धा आमची मिसळ मिळू शकेल.

-    रवीश निमकर
९९२०७०२९१७
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)


‘बडे मियाँ’ तो बडे मियाँ....



मुंबई महानगर... या महानगराच्या पोटात सगळीकडे पोटार्थी लोकांची गर्दी.. आणि या गर्दीची पोटं भरण्यासाठी वडापावच्या गाड्यांपासून ते उंची फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत सगळेजण योगक्षेमं वहाम्यहम् म्हणत हात जोडून उभे असतात. मुंबईच्या कुलाबा कॉजवेमध्येही एकीकडे ताजसारखं विश्वविख्यात फाईव्ह स्टार हॉटेल आहे, तर त्याच्याच मागच्या गल्लीत बडे मियाँसारखं अपरात्रीसुद्धा पोटाचे आणि जीभेचे चोचले पुरवणारा रोडसाईड ठेलादेखील आहे. म्हटलं तर ठेला पण ताज हॉटेलइतकाच मुंबईत नावाजलेला ब्रँड बनला आहे. 
बडे मियाँच्या मालकांपैकी एक असणाऱ्या सलमान शेखशी बडे मियाँबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना भेटलो. आणि मुंबईतल्या या सुप्रसिद्ध बडे मियाँबद्दल माहिती मिळवली.

बडे मियाँ मूळचे कुठले?
उत्तर प्रदेशातील बिजनौर या छोट्या गावातले. तिथून १३ वर्षांचा यासीन मोहम्मद मुंबईत आला. मटणाचे तुकडे करणं आणि वेगवेगळ्या हॉटेलांना पुरवण्याचं काम तो करत असे. त्यांची गुरू हाजरत फिदा मोहम्मद आदम चिश्ती यांच्यावर प्रचंड श्रद्धा होती. त्यांनी लोकांची उत्तम आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याची शिकवण दिली होती. बक्षिस म्हणून या मुलाला २० रुपयेही दिले आणि सीख कबाबांचं दुकान उघडण्याची सूचना केली. हा मुलगा मोहम्मद यासीन म्हणजेच बडे मियाँ...   
बडे मियाँची स्थापना कधी आणि कशी झाली?
स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वर्षभर आधी म्हणजे १९४६मध्ये मोहम्मद यासीन यांनी या कुलाबा कॉजवे परिसरात फूटपाथवर सीख कबाब विकायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ १ शेगडी होती. त्यावरच सीख कबाब भाजले जायचे. मोकळ्या हवेत या भाजल्या जात असलेल्या कबाबांचा वास असा काही जाणाऱ्या येणाऱ्यांना धुंद करायचा, की आपोआप कबाब खायला पावलं वळायची.. हळूहळू या कबाबांचे शौकीन वाढले.. व्यवसाय वाढत गेला आणि बडेमियाँ मुंबईतील एक महत्वाचं फूड जॉइंट बनलं. मोहम्मद यासीन यांचा उत्तर भारतीय खानदानी मुस्लिम पेहराव पाहून लोक त्यांना बडे मियाँ संबोधत असत. अखेर या सीख कबाब कॉर्नरला बडेमियाँ हेच नाव पडलं.
एवढं प्राइम लोकेशन कसं काय मिळालं?
दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे हा श्रीमंत आणि पर्यटकांनी गजबजलेला भाग वाटत असला, तरी त्या काळी या रस्त्याला अक्षरशः सामसूम होती. उलट,  चिश्तींनीही जेव्हा या ठिकाणी सीख कबाबांचं दुकान उघडण्याची कल्पना ऐकवली, तेव्हा बडे मियाँनी हाच प्रशन विचारला, की या वैराण भागात माझे कबाब खायला येणार कोण? पण चिश्तींनी याच जागेत बडे मियाँना भरभराटीचं मूळ असल्याचा विश्वास दिला... आणि घडलंही तसंच... बडे मियाँचं नाव आणि कबाब लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. दूर दूरवरून लोक बडे मियाँकडे कबाब खाण्यासाठी वाट वाकडी करून येऊ लागले. बडे मियाँचं नाव नावारुपाला येण्यामागे सर्वांत मोठा हात मात्र भारतीय नौदलाचा आहे. इथून जवळच असलेल्या नेव्हीच्या क्वार्टर्समधील ऑफिसर्स पहिल्यापासून मोठ्या प्रमाणावर इथे येऊन कबाब खात. बडे मियाँ हे नावदेखील या नेव्हीच्या लोकांकडूनच मोहम्मद यासीन यांना मिळाले.
इथले कुठले पदार्थ जास्त लोकप्रिय आहे?
पूर्वी मटणाचे पदार्थ जास्त खाल्ले जात. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात लोकांची आवड बदलली. त्यांना चिकन खाणं जास्त आवडू लागलं. त्यामुळे आज चिकनचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. चिकन सीख कबाब रोल, चिकन टिक्का, चिकन खिमा यांसारख्या पदार्थांची मागणी आज सर्वांत जास्त आहे. त्यामुळे चिकनचेच पदार्थ जास्त आहेत. मात्र आता व्हेज पदार्थही लोकांना आवडू लागले आहेत. मुख्य म्हणजे आम्ही व्हेज साठी काऊंटरही वेगळं ठेवलंय. जेव्हा एखादा खाणाऱ्यांचा ग्रुप येतो, तेव्हा त्यातले काहीजण शाकाहारी असतात, गुजराथी आणि मारवाडी समाजाचे बरेचजण इथे येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही व्हेज काऊंटर वेगळं उघडलंय. आता तिथेही बरीच गर्दी असते. आज ६५% लोक इथे नॉन-व्हेज खात असतील, तर ३५% लोक व्हेज फूड खातात. इथले पनीर टिक्का, पनीर सीख कबाबही खूप लोकप्रिय आहे.
ही बडे मियाँची कितवी पिढी?
आमची पिढी ही तिसरी पिढी... बडे मियाँची पाच मुलं. ते हे व्यवसाय संभाळू लागले. यांची मुलं म्हणजे आमची पिढी बडे मियाँ संभाळत आहे. आमच्या पिढीत एकंदर १३ भावंडं आहेत. सर्व मिळून एकत्र हा व्यवसाय संभाळतो.
लहानपणापासून तुम्ही हाच व्यवसाय संभाळण्याचं ठरवलेलंत का?
हो. आमच्याकडे कुणाला कधी याच व्यवसायात येण्याची बळजबरी नसते. पण, बडे मियाँचाच व्यापार एवढा मोठा आहे, की तो संभाळण्याचंच काम आपोआप करायला लागलो. पुढच्या पिढीचंही कदाचित तसंच होईल. मुळात, बडे मियाँचं नेहमी सांगणं असायचं, की नोकरी करू नका, नोकरी करणाऱ्याला  एक दिवस निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत बडे मियाँतर्फे कायम लोकांची सेवा करू.
तुम्ही बडे मियाँ संभाळण्यापूर्वी काही विशेष शिक्षण घेतलेलंत का?
हो. मी आयएचएम, औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. त्यानंतर अनुभवासाठी काही काळ विदेशातील हॉटेल्समध्ये कामही केलं. माझी बहुतेक भावंडंही याच मार्गाने व्यवसायात शिरतील.
पण इतकी वर्षं तुम्ही बडे मियाँच्या पदार्थांची चव, गुणवत्ता तशीच कशी काय राखू शकलात?
याचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबाला बडे मियाँनी दिलेला सिक्रेट मसाला.. तो मसाला फक्त आमच्या कुटुंबालाच माहित आहे. आजही बडे मियाँमध्ये पदार्थ बनवताना त्यात मसाला आम्ही आमच्या हातानेच घालतो. तसंच सकाळी चिकन, मटण ते अगदी पनीरही आम्हा कुटुंबियांपैकीच एकजण सकाळी जाऊन आमच्या ठरलेल्या सप्लायर्सकडून जिन्नस निवडून आणतो. अर्थात ते मसाले आणि सप्लायर्स यांची माहिती आम्ही कधीही उघड करत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या काउंटरवर पाहिलं असेल, तिथ कुठल्याही प्रकारची स्टोअरेज सिस्टम नाही, फ्रिज वगैरे नाही. आम्ही ग्राहकांना कायम ताजे पदार्थच देतो. एखादवेळेस जिन्नस कमी पडले तर सप्लायर्सकडून ऐनवेळी मागवतो. पण, बेगमी करून ठेवत नाही.
दिवसाला साधारण किती ग्राहक येतात?
वीकेण्डच्या सुमारास दररोज संध्याकाळी सुमारे १ लाख लोक येतात. इतर दिवशीही साधारण तेवढीच गर्दी असते. इथे मर्सिडिससारख्या गांड्यांमधून लोक खायला येतात, आणि कारच्या टबवर प्लेट ठेवून खातात, इतकं त्यांना बडे मियाँचं आकर्षण आहे. विदेशी पाहुणेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर येतात. ते एवढं मसालेदार खाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी सौम्य मसाले वापरून कबाब बनवतो. तसंच काही वेळा प्रवासामध्ये ऍडव्हेंचर म्हणून विदेशी लोक स्पेशल तिखट, मसालेदार पदार्थही मागवतात. सौदी अरेबिया, युरोप, अमेरिकेतून आलेल्या लोकांनाही बडे मियाँतले पदार्थ खूप आवडतात. ताजमध्ये पार्टीसाठी आलेले, आसपासच्या डिस्कोथेकमध्ये थिरकायला आलेले कित्येक तरुण रात्री- अपरात्री बडे मियाँमध्ये गरमा-गरम कबाब, टिक्के खायला येतात. मोकळ्या हवेत रात्रीच्या वेळी बडे मियाँचे कबाब खाणं ते फाईव्ह स्टारच्या वातावरणापेक्षा जास्त एंजॉय करतात.
कुणी सेलिब्रिटी येतात?
राज कपूर बडे मियाँच्या कबाबांचे खूप शौकीन होते. मुंबईतले बहुतेक सगळे सेलिब्रिटी इथे हजेरी लावत असतात. टीव्हीवर काम करणारे जवळपास सर्वच कलाकार रात्री इथे येतात, जॅकी श्रॉफ तर महिन्यातून दोन-तीन वेळा येतातच येतात. पण सेलिब्रिटी म्हणून कुणाला वेगळी वागणूक मिळत नाही. आमच्यासाठी आमचा प्रत्येक ग्राहक सेलिब्रिटीच असतो.
भविष्यात बडे मियाँचा पसारा आणखी वाढवण्याचा काही विचार आहे का?
नक्कीच आमचा तसा इरादा आहे, गेल्या ८० वर्षांत पहिल्यांदाच आम्ही हॉर्निमन सर्कलला मोठं रेस्टॉरंट उघडलं आहे. अशीच आणखी रेस्टॉरंट्स उघडण्याचा आमचा मानस आहे. मात्र चेन किंवा फ्रंचाइजी बनवण्याची आमची इच्छा नाही. ज्याप्रमाणे मघाशी म्हणालो त्याप्रमाणे पदार्थांमध्ये मसाला घालण्याचं काम आमच्याच कुटुंबातील लोक करतात. ते मसाले आम्ही कुणासमोर उघड करत नाहीत. त्यामुळे इतरत्र जरी बडे मियाँची हॉटेल्स उघडली, तरी ते काम आमचंच कुटुंब करेल. सध्या आम्ही लक्ष मुंबईवर केंद्रित केलं असलं, तरी इन्शाल्ला भविष्यात देशभरात बडे मियाँची हॉटेल्स उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू....   
 
आदित्य (रवीश) निमकर
9920702917
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)  

Sunday, December 30, 2012

‘प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो...’

आदित्य निमकर

लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय.  त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या बाजूने असं बरंच बोललं जातंय. पण, त्यापलिकडे आपण या नात्याकडे बघू शकतोय का? मूळात लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय? लग्न न करता दोन व्यक्तींनी एकत्र राहून स्वीकारलेले सहजीवन अशी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची सोपी व्याख्या होईल. पण खरं सांगायचं तर लिव्ह-इनची संकल्पना मुळीच पाश्चात्त्य नाहीये. ती मध्ययुगापासून अस्तित्वात आहे. बहुतेक त्या ही आधीपासूनच. आदिम काळापासून. आणि ही संकल्पना शरीरसंबंधांइतकीच वैश्विक आहे. त्याकाळी 'लिव्ह इन' हा शब्द अस्तित्वात नव्हता, पण असे नातेसंबंध होते. 'माणूस' हा सिनेमा एक पोलीस वेश्येला राहण्यासाठी खोली घेऊन तिच्यासोबत घरोब्याचा केलेला विचार करू लागतो अशा थीमवर बनवला गेला होता. तो ही १९३८साली. सखाराम बाईंडरमधला काही हिंसात्मक अपवाद सोडला तर दिसतं की  सखाराम हा ही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मधलाच घटक होता. त्याला जगाने नावं ठेवली तरी तो त्याच्या तथाकथित तत्वांवर जगत होता. आजच्या काळात माणूस तसंच जगतोय ना..  समाजाची पर्वा करण्यापेक्षा आपण आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून जगलेलं आयुष्य जास्त महत्वाचं. ते 'लिव्ह इन'चंच रूप होतं.
 
आजच्या काळात प्रत्येक गोष्टीत इनसेक्युरिटी वाढत चालली आहे. नोकरी टिकेल का याची खात्री नसते. लग्नही केल्यावर ते टिकेल याची शाश्वती नसते. मग अशा अशाश्वत गोष्टींचा ताळमेळ बसवताना दमछाक होत असते. एकमेकांची गरज तर आहे, पण संसार संसार असं जे म्हणतात ते करायला वेळ नाही. अशा परिस्थितीत लिव्ह इनचा पर्याय सोपा वाटतो.
 
पण दोन्ही बाबतीतही पुढचा विचार करावाच लागतो. जसं लग्न झाल्यावर पुढचं प्लॅनिंग सुरू होतं तसंच ‘लिव्ह इन’मध्येही हा विचार सुरू होतोच की. लिव्ह इनमध्ये राहाण्याचा एक मोठा विश्वास म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं. पण आज बघितलं तर बहुतेक विवाहीत मंडळींमध्ये नवरा- बायको दोघेही कमावते असतात. आपापल्या पायावर उभे असतात.  स्वतंत्र असतात.    लग्नानंतर लाईफ पार्टनर असतो लिव्ह इनमध्ये नुसता पार्टनर असतो. (लाईफ लाँग पार्टनर नसतो हाच एक फरक. कधी कधी लाईफ विदाऊट पार्टनर असह्य होतं तेव्हा पार्टनर विदाऊट लाईफ लाँग रिलेशन हा उपाय आकर्षक वाटतो.)
 
लिव्ह इनमध्ये  आपलं स्वातंत्र्य अबाधित राहातं. नाती परिपक्व होत जाताना लग्नं हा फक्त एक सोपस्कार उरतो. सर्वच पातळींवर जवळीक साधल्यावर ती स्वेच्छेने की देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने हा विचारच उरतो कुठे?
 
पण... लिव्ह इनमध्ये ज्या प्रकारे राहातो, त्याच प्रकारे लग्न करून माणूस राहात असतो ना... एकमेकांचा आधारही आणि स्वातंत्र्यही.  पण, लिव्ह इन मध्येही तुम्ही मानसिक पातळीवर कमिटेड झालात की दुसऱ्याशी संबंध ठेवावासा वाटत नाही. आणि लग्न करूनही काही जणांना विवाहबाह्य संबंध ठेवल्याशिवाय राहावत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य हा मुद्दा व्यक्तिसापेक्ष बनला आहे. लिव्ह इनमधून बाहेर पडलं की पुढे काय? हा विचार नेहमीच रिलेशन सुरू होण्यापूर्वी केलेला असतो. त्याच आधारावर लिव्ह-इन सुरू होते. मात्र, लग्नाच्यावेळी हा विचार केला जात नाही. पण, काहींच्या बाबतीत घटस्फोट ही गोष्टही घडतेच ना. लिव्ह इनमधून बाहेर पडलं काय किंवा घटस्फोटित बनलं काय… दोघांच्या परिस्थितीत फरक काय ? दोघांकडे पाहायच्या नजरा सारख्याच. मग, फरक कुठला?
 
पझेसिव्हनेस, संसारव्याप, राहाण्याची समस्या यांचा विचार जमेस धरला तर  लिव्ह इन रिलेशनशीप' ह्या संकल्पनेची आज खूप गरज आहे. मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरणाऱ्या एकाकीपणाला लिव्ह-इन चा पर्याय  उपयुक्त  ठरू शकतो.
 
उतारवयात लग्नासारख्या सोपस्कारांमध्ये न अडकता सहजीवन अनुभवण्यासाठी ८२ वर्षांच्या अरविंद गोडबोले यांनी नागपुरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ’ स्थापन केलं. त्याचं उपकेंद्र ठाण्यात सुरू करण्याचा निर्णयही नुकताच  घेण्यात आला आहे. म्हणजे अशा गोष्टी नकोच असं कसं म्हणणार?
 
लग्न न करताही सहजीवन जगणं हे आदिम आणि तितकंच नैसर्गिक आहे. उलट ‘विवाह’ ही नंतर आलेली संकल्पना आहे, हे मान्य करायला हवं. त्याला संस्कारांचं नाव दिलं तरीही मूळ तत्वांचं, प्रवृत्तींचं दमन करणं अशक्य आहे. शेवटी तो वैयक्तिक प्रश्न आहे. विवाह ही सोयही असते,तर कधी समस्याही असू शकते. व्यक्तिसापेक्ष बदलणाऱ्या या गोष्टीला एकाच नियमात कसं बसवता येईल. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न मानून त्याचा आदर केला, तर लिव्ह इनमध्ये काहीच वाईट नाही.

Thursday, May 17, 2012

वेश्यांचं भावविश्व उलगडणारा मंटो



आजपासून १०० वर्षांपूर्वी ११ मे १९१२ रोजी लुधियाना जिल्ह्यातील समराला गावी खानदानी बॅरिस्टरच्या घरात जन्म झाला सआदत हसन मंटोचा… पिढीजात बॅरिस्टर्सच्या घरात जन्म घेऊनही मंटो वकील बनला नाही, मात्र त्याला वारंवार कोर्टाची पायरी चढावी लागली. असा कोण होता मंटो?

गेलं संबंध शतक ज्याच्या लेखणीने हादरून गेलं, शहारून उठलं.. तो सआदत हसन मंटो. एक अतिसंवेदनशील आणि खरा लेखक.. आपल्याला आलेल्या अनुभवांना, सुचलेल्या कल्पनांना कुठलीही भीडभाड न बळगता ज्याने जगासमोर मांडलं तो मंटो… केवळ सेक्स, वेश्या यांच्यावर लिहीणारा लेखक म्हणून जगाने ज्याला बदनाम केलं, तरीही तो अत्यंत प्रभावशाली, प्रामाणिक आणि महान लेखक आहे हे सत्य कुणीही नाकारू शकलं नाही.

वडील अत्यंत कडक. मंटो मात्र वाया जात चाललेला उनाड पोरगा. अभ्यासात काडीचाही रस नसलेला. उर्दू साहित्यातला महानतम कथाकार मंटो हा परीक्षेत दोनदा नापास झाला, तो उर्दू विषयातच. एकीकडे नाटक आणि वाचन यांची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाचं इतकं वेड होतं त्याला की लहानपणी अमृतसर स्टेशनवरील पुस्तकांच्या स्टॉलवरून एक इंग्रजी पुस्तक चोरताना त्याला पकडलं होतं. मित्रांबरोबर त्याने नाट्य संस्थाही सुरू केली होती, पण काही दिवसांतच त्याच्या वडिलांनी येऊन तिथल्या सामानाची तोडफोड करत ‘असले धंदे ताबडतोब बंद’ करण्याची धमकी दिली.

अमृतसरच्या मुस्लिम हायस्कूलमध्ये शिकत असताना मंटोच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली ती अमृतसरमधीलच जालियनवाला बागेतील हत्याकांडाची घटना. त्यावेळी मंटोचे वय वर्ष होतं अवघं ७. याच घटनेची परिणती मंटोच्या पहिल्या वहिल्या कथेत झाली. या कथेचं नाव होतं ‘तमाशा’.  या लघुकथेत जालियनवाला बागेतील हत्याकांडाचं एका ७ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून दर्शन घडतं.

भारतात ब्रिटीशविरोधात वातावरण तापत चाललं होतं. अशात लहानग्या मंटोच्या मनावर क्रांतीकारी, साम्यवादी विचारांनी परिणाम करायला सुरूवात केली. १९३२ साली वडिलांच्या म़ृत्यूपश्चात त्यांच्या फोटोखाली भगतसिंगची मूर्ती त्याने ठेवली होती. साम्यवादी लिखाणावरील प्रेमापोटी आणि अब्दूल बारी यांच्या आग्रहाखातर मंटोने व्हिक्टर ह्यूगोच्या ‘द लास्ट डेज़ ऑफ़ अ कंडेम्ड’ या पुस्तकाचं ‘सरगुजश्त-ए- असिर’ हे उर्दू रुपांतर केलं. लाहोरवरून ते प्रकाशित झालं. तसंच रुसी अफसाने हे उर्दू भाषांतरीत पुस्तक लिहीलं. आतापावेतो उर्दू साहित्यात मंटोचं नाव होऊ लागलं होतं.

बाविसाव्या वर्षी पुन्हा कॉलेजचा रस्ता पकडून मंटोने शिक्षण घ्यायला सुरूवात केली. मुस्लिम यूनिव्हर्सिटीत काही दिवस शिक्षण ही घेतलं. पण पूर्ण नाहीच केलं. याच सुमारास काही मासिकांत ‘इन्कलाब पसंद’ या नावाने लघुकथा लिहीण्यास सुरूवात केली.

ऑल इंडिया रेडिओ
मुळातच उनाड असणाऱ्या आणि आपल्या सावत्र भावांकडून मिळणाऱ्या वागणुकीने वैतागलेला मंटो लाहोरला निघून गेला. तिथे ‘पारस’, ‘मुसव्विर’ या मासिकांत संपादकीय कामाकरता रुजू झाला. १९४१ साली दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये मंटोला लेखकाची नोकरी मिळाली. त्या दिवसांत मंटोने साहित्य जगताला कथांचा खजिना दिला. ‘मंटो के ड्रामे’, ‘आओ…’, ‘जनाज़े’, ‘तीन औरते’, ‘धुवाँ ‘इत्यादी लघुकथा त्याने लिहील्या. पण १७ महिन्यांतच ही नोकरी सोडून मंटो मुंबईत दाखल झाला.


सिनेमांच्या मायानगरीत

१९४२ ते १९४८ मंटो मुंबईत राहिला. मंटोने या सुमारास फिल्मी मासिकांसाठी लिखाण केलं. सिनेमांच्या कथा, पटकथा लिहिल्या. आठ दिन नामक सिनेमात तर लिखाणाबरोबरच छोटीशी भूमिकाही केली. मिर्झा गालिब, अपनी नगरीया यासारख्या सिनेमांच्या कथा लिहील्या. मुंबईतच राहिला असता, तर मंटो सिनेवर्तुळात नामांकित लेखक म्हणून प्रसिद्धही झाला असता आणि श्रीमंतही. पण, मुळातच अस्थिर स्वभावाच्या मंटोला मायानगरीत चैन पडत नव्हतं. त्यात १९४७ साली फाळणीनंतर तर मंटो पुरता घाबरून गेला. आपले सगळे मित्र, शहर सोडून अखेर मंटो १९४८ साली पाकिस्तानला निघून गेला.. लाहोर येथे स्थायिक झाला. आणि त्याच्या आयुष्यातील लेखक म्हणून अत्यंत वादळी आणि दुर्दैवी कालखंड सुरू झाला.

पाकिस्तान   
मंटो मुंबईत राहिला असता, तर नक्कीच स्थिरावला असता, पण पाकिस्तानात जाणं ही त्याची मोठीच चूक ठरली. पाकिस्तानच्या कर्मठ मुस्लिम देशात मंटोचा श्वास गुदमरायला लागला. मुळात पाकिस्तानातील सर्व  हिंदू सिनेनिर्माते फाळणीनंतर मुंबईत आले होते. लाहोरमध्ये सिनेमा निर्माण होत नव्हते. त्यामुळे मंटोला काम मिळत नव्हतं. त्यातूनच मंटोला दारूचं व्यसन लागलं होतं. जे त्याला मृत्यूपंथाला घेऊन जाणार होतं. वेगवेगळ्या मासिकांत मंटो लघुकथा लिहीत होत्या. त्याही दोन पैसे मिळावेत आणि दारू पिता यावी म्हणून. कधी कधी तर मासिकाच्या ऑफिसात गेल्यावर पैसे हवेत म्हणून तिकडचा कागद आणि पेन उचलून मंटो काहीतरी खरडून द्यायचा. पण हे खरडणं विसाव्या शतकातल्या महान कथांचं लेखन होतं. पाकिस्तानात मंटोचे १४ कथासंग्रह प्रकाशित झाले. ज्यात १६१ लघूकथा होत्या. बू, ठंडा गोश्त,नंगी आवाजे, काली सलवार, सियाह हाशिये या कथांनी देशभरात खळबळ माजवली. असं काय होतं या कथांमध्ये?

फाळणीचं विदारक चित्र अतिसंवेदनशील मंटोच्या नजरेसोर घडल्यावर त्यातून जे उमटलं, ते या कथांमध्ये होतं. वेश्यावस्तीचं चित्रणही त्याच्या कथेत सर्रास येत होतं. ही वस्ती त्याच्या आसपासच होती आणि तिथे जाणारेही… पण या कथांनी मंटोची ‘वेश्यांचा लेखक’ अशी बदनामी केली. पण मंटो लिहीतच राहिला.

वेश्यांचा लेखक
माझ्या आसपास जे आहे, त्यावरच मी लिहीतोय. जर मी वेश्यांबद्दल लिहित असेन, तर माझ्यावर आक्षेप घेण्याऐवजी परिस्थिती सुधारा असे कडवं आव्हान मंटोने कोर्टाला दिलं. मंटोवर एकूण सहावेळा खटले भरण्यात आले, कारण त्याच्या कथांमध्ये वेश्यांबद्दल लिहीलं गेलं होतं. ‘ठंडा गोश्त’मध्ये फाळणीत मुलींना पळवणाऱ्या माणसाला आपण एका मुलीच्या प्रेतावर बलात्कार केला याची जाणीव होते आणि तो सुन्न होतो या मनःस्थितीचं वर्णन होतं. तर ‘खोल दो’मध्ये फाळणीत हरवलेल्या अर्धमेल्या, बलात्काराने मरणोन्मुख झालेल्या मुलीसमोर बापाचं येणं होतं. ‘काली सलवार’मध्ये फाळणीनंतर एका वेश्येची झालेली परवड चित्रित करण्यात आली होती. ‘धुवाँ’मध्ये वयात येत असणाऱ्या मुलाचं आपल्याला नेमकं काय होतंय याबद्दलची अस्वस्थता लिहिली होती. ‘बू‘मध्ये सेक्समधील गंध आणि दर्प मंटोने समोर आणले. ‘ऊपर, निचे और दरमियाँ’मध्ये विविध वयातील लोकांचं शरीरसंबंधांकडे पाहाण्याचं तंत्र अत्यंत संयत पद्धतीने लिहीलं होतं. या सर्व कथांवरे खटले भरण्यात आले होते. पण मंटो मनाने इतका निष्पाप होता की, आपलं नेमकं काय चुकलंय, हेच मंटोला समजत नव्हतं. मंटो या खटल्यांतून सहिसलामत सुटला खरा. पण सततच्या खटल्यांनी, बदनामीने मनाने पूर्णपणे खचून गेला.


काही दिवस तर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येही त्याला काढावे लागले. पण, त्यावर मंटोने आयुष्यातील सर्वांत गाजलेली लघुकथा लिहीली. ‘टोबा टेक सिंग’ नावाची. फाळणीनंतर वेड्यांच्या भावविश्वात निर्माण झालेला ‘देश’ संकल्पनेवरील गोंधळ इतक्या जबरदस्त पद्धतीने लिहिला की जगाला प्रश्न पडला, हिंदुस्तानाचं विभाजन हा नेत्यांना आलेला वेडाचा झटका तर नव्हता ना?

असा हा मंटो… फक्त छान छान, गोड गोड, कौटुंबिक गोष्टी लिहिणाऱ्यांपैकी नव्हता. तर परखडपणे आणि कडवट लेखणीने परिस्थितीवर भाष्य करणारा ‘माणूस’ होता. आसपासच्या घटनांमधली विदारकता टिप कागदाप्रमाणे त्याच्या प्रतिभेने टिपून घेतली होती. त्याच्या लिखाणामुळे प्रशासनाने तौबा केलं. पण तो लिहितच राहिला. नवऱ्याचा मार खाऊन रडणाऱ्या आणि तरीही नवऱ्याची सेवा करत राहाणाऱ्या अबला बायकांपेक्षा त्याला ‘आपलं म्हातारपण जवळ आलंय हे कळल्यावर घाबरलेल्या वेश्ये’ची मानसिकता आव्हानात्मक वाटली. समाजातल्या उपेक्षित मानल्या गेलेल्या अशा व्यक्तींवर आणि समाजाची त्यांच्या प्रती असणारी वागणूक यावर मंटोने कुठलाही पक्षपात न करता लेखणी चालवली. त्याचं लेखन म्हणजे समाजाला दाखवलेला आरसा होता. त्यात समाजाला त्याचं हिडिस रुप मंटोने दाखवलं. आपलं हे बीभत्स रूप पाहून समाजालाच घृणा वाटली, मात्र त्यांनी मंटोलाच ‘अश्लील लेखक’ म्हणून बदनाम केलं. कारण त्याने शरीरसंबंधांना श्रृंगार, रोमान्सची झालर न लावता त्यातील पशूत्वासकट लिहिलं. समाजाने त्याला अश्लील लेखक ठरवलं. पण, त्याच्या कथांचं महत्व जगाला समजून घ्यावंच लागलं. त्याच्या कथा या केवळ कल्पनेची भरारी न राहाता फाळणीची आणि त्या सुमारास असलेल्या समाजमनाची बखर म्हणून उपयुक्त ठरते. त्याच्या कथांमधील मनोविश्लेषण भल्या भल्या मानसशास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडतात..

बेचाळीस वर्षं आठ महिने आणि सात दिवस इतक्या आयुष्यात मंटोने २३० लघुकथा, ६७ नभोनाट्य, २२ व्यक्तिचित्रं, ७० लेख आणि १ कादंबरी लिहीली. जाती-धर्माच्या भेदभावाला न जुमानता त्याने लिहिलेल्या कथांमुळे मंटो हा विसाव्या शतकातला अशियातील सर्वोत्कृष्ट कथाकार ठरला.

मात्र, तोपर्य़ंत उशिर झाला होता. मंटो वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी दारिद्र्यावस्थेत, कोर्ट कचेऱ्यांना कंटाळून, खचलेल्या अवस्थेत १८ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तानात मरण पावला. त्याचवेळी मुंबईच्या थिएटरमध्ये मंटो लिखित ‘मिर्झा गालिब’ सिनेमापुढे हाऊसफुल्लचा बोर्ड होता.

तो म्हणालेला त्याप्रमाणेच, ‘सआदत हसन मेला, तरी मंटो जिवंतच राहिला.’

आदित्य नीला दिलीप निमकर
९९२०७०२९१७
adi.nimkar@gmail.com

Monday, September 5, 2011

बेरीज.. काल, आज आणि उद्याची

लोकससत्ताच्या लोकरंग पुरवणीसाठी लिहीलेलं  पुस्तक परीक्षण. 
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=125
आदित्य निमकर 
alt‘मागची पिढी बुरसटलेली आणि पुढची पिढी बहकलेली’ असं मधल्या पिढीचं नेहमीच म्हणणं असतं. पण या दोन पिढय़ांच्या दरम्यान घडलेल्या मधल्या पिढीने बहकलेपणाकडे काहीच वाटचाल केलेली नसते का? मधल्या पिढीचं बहकलेपणही बुरसटलेलं ठरावं इतक्या वेगाने आणि विविध आवेगाने नवी पिढी बदलत असते. दिनकर जोषींच्या ‘एकडा वगारना मिंडा’ या गुजराथी पुस्तकाच्या अंजली नरवणे यांनी केलेल्या ‘अंकरहित शून्याची बेरीज’ या अनुवादित कादंबरीत अशाच पिढी दर पिढी होत असणाऱ्या स्थित्यंतराची कथा मांडलेली आहे.
‘अंकरहित शून्याची बेरीज’ ही कथा आहे व्रजमोहनदास, त्यांचा मुलगा अविनाश आणि अविनाशचा मुलगा प्रतीप यांची. वर्तमानातून भविष्याकडे सरकत असलेली कथा ही थोडय़ा थोडय़ा वेळाने व्रजमोहनदास यांच्या आठवणींद्वारे भूतकाळातही डोकावत असते. कारण, शेवटी वर्तमान असो वा भविष्य, त्याची नाळ ही भूतकाळाशीच जोडलेली असते. व्रजमोहनदास यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईत पाऊल ठेवलेलं असतं. चिकाटीने आणि मेहनतीने व्रजमोहनदासांनी व्यापार सुरू करून भरभराटीला आणलेला असतो. यात त्यांना वेगवेगळ्या लोकांची मोलाची मदत झालेली असते आणि या लोकांचे ऋण व्रजमोहनदासांनी कधीच नाकारले नसते. योग्य मार्गाने मिळेल तेवढा पैसा कमावण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे त्यांची ही सर्व समृद्धी मूल्याधिष्ठित असते. त्यांचा मुलगा अविनाश याला वडलांच्या संघर्षांची जाणीव असते आणि त्याबद्दल खूप आदरही असतो. पण, व्यापार वृद्धिंगत करायचा असेल तर माणसांमध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा नव्या व्यापारात किंवा नव्या जागेत गुंतवणूक करणं अविनाशला महत्त्वाचं वाटतं. व्यापार हातात आल्यावर अविनाश प्रत्येक वेळी वडलांचं मन वळवून आपल्याला हवं तसं करून घ्यायला लागतो. पण, जेव्हा बायकोच्या नावावर घर घेतो, त्या वेळी पहिल्यांदाच व्रजमोहनदासांना अविनाशच्या मानसिकतेतला बदल जाणवतो. अविनाशलाही वडलांच्या नाराजीची पूर्वकल्पना असतेच. त्याचा विचार असतो की बापूजींचा राग आज नाही तर उद्या मावळेल. पण, आपल्या मुलांच्या भविष्याची तरतूद म्हणून व्यापारात अधिकाधिक नफा मिळवून आपला उत्कर्ष साधणं त्याला महत्त्वाचं वाटत असतं. नात्यांचं महत्त्व अविनाशला मान्य असतं, पण त्यावर वारेमाप पैसे उधळणं त्याला पटत नसतं. अविनाश  व्रजमोहनदासांचा एकुलता एक मुलगा असतो. वडलांचा सगळा व्यापार, सगळी संपत्ती आपल्याकडेच येणार आहे हे त्याला माहीत असतं, पण तरीही त्याला आपल्या मोठय़ा बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची भीती वाटत असते. वडलांनी आपल्या संपत्तीतला अर्धा वाटा तिला दिला तर आपल्या मुलांचं कसं होणार या विवंचनेत अविनाश असतो. पण, जशी आपल्याला आपल्या मुलांची काळजी आहे, तशीच आपल्या वडलांना आपली आणि बहिणीची काळजी आहे हे तो विसरून जात असतो.  अविनाशला आणखी एका गोष्टीची चिंता भेडसावत असते. वडलांनी आपला सर्व व्यापार आता त्याच्याकडेच सोपवलेला असतो. मात्र त्यांचं चांगलं नाव असणाऱ्या, पैसा मिळवून देणाऱ्या चित्रपट वितरणाच्या व्यवसायापासून मात्र वडील अविनाशला जाणूनबुजून दूर ठेवत असतात. त्यांच्या स्वच्छ चारित्र्याला कंचनीबाई नावाचं गालबोट लागलेलं असतं. पण, या संबंधांनाही नैतिक ठरावी अशी उदात्ततेची एक करुण किनार लाभलेली असते. अर्थात त्यातूनही ते कुणावर अन्याय करत नाहीत.
अविनाशची मुलं मात्र वयात आल्यावर फारच पुढे निघून गेल्याचं अविनाशच्या लक्षात येतं. अविनाशचा वकिली शिकणारा मुलगा प्रतीप वडलांशीच वकिलीची भाषा करू लागतो. त्याला आपल्या वडलांचं वागणं अव्यवहारी वाटायला लागतं. तो घरचा जुना ‘धंदा’ न करता जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या रॅप शोजचं ‘कल्चर’ मुंबईत आणायचा घाट घालतो. वडलांशी भांडण करून तो यासाठी पैसे मिळवतो. अनेक नैतिक-अनैतिक गोष्टी करून यशस्वीही होत जातो. कारण, नैतिकता ही पैशापेक्षा मोठी नाही, हा विचार त्याच्यात पूर्णपणे रुजलेला असतो. थोडंफार गैरवर्तन अविनाशकडूनही झालेलं असल्यामुळे तोही आपल्या मुलांना समजावण्यासाठी आवश्यक असलेला खंबीरपणा गमावून बसला असतो. अशा प्रकारे पुढे जात असलेलं पण दिशाहीन असणारं चक्र पूर्ण होतं.
समृद्धीला महत्त्व देताना जो मूल्यऱ्हास आपल्याकडून होत आहे, त्यावर ही कथा आहे. एक अंकापुढे जितकी शून्यं वाढवत नेऊ, तितके आपण श्रीमंत होतो हे खरं, पण ही नुसती लौकिकार्थाने मिळवलेली श्रीमंती किती खरी? ही सगळी शून्यं ज्या एक अंकाच्या दावणीला बांधली आहेत तो अंकच नष्ट झाला, तर नुसत्या शून्यांना काय किंमत राहणार? हाच प्रश्न ही कादंबरी मांडते. पैसा कमावण्याच्या नादात, शून्य वाढवण्याच्या नादात अविनाश धावत असतो. पण मन:शांती असणारा, नीतिमूल्यं असणारा मूळचा एक अंकच तो विसरून जातो. धंद्याला प्रतिष्ठेची गरज नसते असं मानून ‘धंदा’ करणारा प्रतीप पाहून त्याला जाणीव होते की या नुसत्या शून्यांनी सगळंच नियंत्रणाबाहेर नेलं आहे. त्यांना नैतिकतेच्या, शिस्तीच्या, सचोटीच्या एक अंकाचं अधिष्ठान आवश्यक आहे. कारण ही मूल्यंच तुमच्या समृद्धीचा डोलारा ताठ मानेने सांभाळू शकतात. पैसा मिळवताना त्यासाठी आपण संस्कारांनाच तिलांजली देत आहोत याची कुठलीही शिकवणी न देत बसता ही कादंबरी आपल्या विवेकबुद्धीलाच हा प्रश्न विचारते आणि पुस्तक वाचून संपल्यावरही आपल्या मनातून आणि डोक्यातून हा प्रश्न जात नाही.. हेच या पुस्तकाचं मोठं यश आहे.


अंकरहित शून्याची बेरीज
मूळ लेखक - दिनकर जोषी, 

अनुवाद - अंजली नरवणे  
पृष्ठे- १६८, 
मूल्य - १६० रुपये

Friday, June 3, 2011

|| दृष्टीदायी अंधत्व||

        ही यशोगाथा आहे मी अटेंड केलेल्या माझ्या पहिल्या वहिल्या Press Conferenceमध्ये भेटलेल्या बहिण भावांची. 'श्वास' सारखा चित्रपट पाहिला तेव्हा हेलावून गेलेलो. पण, आशिष आणि गरीमा यांना भेटल्यावर हेलावलो नाही...प्रेरित झालो. मुंबईच्या प्रेस क्लबला जाऊन मी जेव्हा या बहिण-भावाला भेटलो. त्यांच्याबद्दल माहिती मिळवली, तेव्हा मला वाटलं -एकवेळ जन्मांध माणूस जन्मतःच मिळालेलं अंधत्व स्वीकार करू शकेल. पण, वयाच्या नवव्या-दहाव्या किंवा चौदा पंधराव्या वर्षी जेव्हा डोळ्यांमध्ये उज्ज्वल भविष्याची स्वप्नं उजळत असतात, त्यावेळी असं आयुष्य  झाकोळून टाकणारं, अंधःकारमय करणारं, इलाजच नसलेलं अंधत्व स्वीकार करणं हे आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलिकडची गोष्ट आहे. हे स्वीकारण्याची, सहन करण्याची आणि ते आपलंसं  करण्याची हिंमत आशिष, गरीमा आणि मुख्य म्हणजे त्यांचे आई-वडिलांनी कुठून आणली असेल?    
नऊ वर्षांचा आशिष गोयल रात्री सायकल चालवत होता. पोहोणं, घोडेस्वारी, टेनिस, क्रिकेट अशा अनेक गोष्टींसारखाच सायकल चालवणं हा ही त्याचा छंद. भोवताली अंधार दाटून येत होता. अचानक डोळ्यांसमोर काही दिसेनासं झाल्यामुळे तो धडपडला. घरी या गोष्टीबद्दल सांगावं इतकं त्याला ते गंभीर वाटलं नाही. पण, त्यावेळी गंभीर न वाटलेला तो अंधार त्याला कायमचा चिकटला... डॉक्टरांनी निदान केलं-रेटिनायटेस पिग्मेंटोजा... एक असा आजार ज्यामुळे आशिष आपली दृष्टी कायमची गमावून बसला. या आजारावर अजूनही वैद्यकशास्त्राला इलाज सापडलेला नाही.
आपल्या लाडक्या आंद्रे आगासी सारखं टेनिसपटू बनण्याचं त्याच्या नजरेतलं स्वप्न त्याच्या नजरेबरोबरच अप्राप्य बनून गेलं. पण, आशिषने हार मानली नाही. त्याने अभ्यासावर सर्व लक्ष केंद्रित केलं. पुढे जाऊन एन. एम. इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये तो दुसरा आला. कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंट चा पुरस्कारही मिळवला. पण, कॅंपस इंटरव्ह्यूंमध्ये मात्र नोकरी मिळवताना त्याच्या अंधत्वामुळे अनेक संस्थांनी त्याच्या शैक्षणिक कर्तृत्त्वाकडे न पहाता आंधळेपणे नकार दिला. सरते शेवटी ING VYSYA बॅंकेने त्याच्या अपंगत्वापेक्षा टॅलेंटला महत्व दिलं. आशिष बंगळुरूला ING VYSYA मध्ये इन्कम ट्रेडर म्हणून काम करू लागला. पुढे तीन वर्षांनी नव्या नोकरीचा शोध घेत असतानाही तीच समस्या भेडसावू लागली. लोक त्याला अंधत्वाच्या कारणामुळे नोकरी देण्यास नकार देत.
याच सुमारास परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा विचार आशिषच्या मनात मूळ धरू लागला. आणि त्याने ग्लोबल फायनान्शल मार्केट या विषयाचा अभ्यास करण्यासाठी फिलाडेल्फीयाच्या वॉर्टन विद्यापीठाची निवड केली. प्रवेश मिळालाही, पण ही प्रक्रिया काही तितकीशी सोपी नव्हती. एका सर्वस्वी अनोळखी देशात जाऊन शिक्षण घेणं ही खूप कठीण गोष्ट होती. हा अनुभव जसा आशिषसाठी नवा होता, तसाच तो  वॉर्टन विद्यापीठासाठीही अनोखा होता. पण, आशिषने पुन्हा आपल्या सकारात्मक विचारांनी, आत्मविश्वासाने आणि जिद्दीने या सर्व अडथळ्यांवर मात केली. वॉर्टन विद्यापीठातून डिग्री घेऊन बाहेर पडलेला पहिला अंध विद्यार्थी ठरला. याचबरोबर तो कॉलेजच्या जोसेफ वॉर्टन पुरस्काराचा मानकरीही ठरला.  
      त्यानंतर आशिष जे. पी. मॉर्गन सध्ये काम करु लागला. सध्या तो याच कंपनीच्या लंडन ऑफिसमध्ये मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम संभाळत आहे. आज त्याच्या हाताखाली १००हून अधिक माणसं काम करत आहेत. अर्थव्यवस्था क्षेत्रात काम करणारा आशिष हा ब्राझिलीयन ड्रमींग ग्रुपचाही सदस्य आहे.
            दुर्दैवाने आशिषची बहीण गरीमा हिलादेखील दहावीत असताना याच संकटाशी सामना करावा लागला आणि ती ही दृष्टीही गमावून बसली. पण, आपल्या भावाचा आदर्श समोर ठेवत गरीमानेही शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. आपलं चित्रकार होण्याचं स्वप्न धुळीत मिळाल्यावर गरीमाने लेखन कलेला आपलंसं केलं. सोशल मीडिया कम्युनिकेशनचा अभ्यासही तिने मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आणि हिंदुस्तान टाईम्सच्या मेट्रो डेस्कवर तीन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. रॅपलींग, ट्रेकींग, रिव्हर क्रॉसींग यांसारख्या साहसी खेळांमध्येही तिने हिरीरीने सहभाग घेतला. दुर्दैवाने आशिषची बहीण गरीमा हिलादेखील दहावीत असताना याच संकटाशी सामना करावा लागला आणि ती ही दृष्टीही गमावून बसली. पण, आपल्या भावाचा आदर्श समोर ठेवत गरीमानेही शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. आपलं चित्रकार होण्याचं स्वप्न धुळीत मिळाल्यावर गरीमाने लेखन कलेला आपलंसं केलं. सोशल मीडिया कम्युनिकेशनचा अभ्यासही तिने मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आणि हिंदुस्तान टाईम्सच्या मेट्रो डेस्कवर तीन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. रॅपलींग, ट्रेकींग, रिव्हर क्रॉसींग यांसारख्या साहसी खेळांमध्येही तिने हिरीरीने सहभाग घेतला. असाईनमेंट्सच्या निमित्ताने अगदी फोटोग्राफीचंही काम तिने केलं. आत्ता तिचं वय पंचवीस आहे. सध्या ती डॉ. बालाजी तांबे यांच्याबरोबर ग्रंथांच्या भाषांतराचे, लेखनाचे काम करत आहे. पुढच्या काही वर्षांत एखादी कादंबरी लिहीण्याचीही तिचा मानस आहे.  
     आत्तापर्यंतच्या दोघांच्याही या प्रवासात आपल्या आई-वडलांचा आणि बहीण डॉ. नेहा गोयल हिचा खंबीर पाठिंबा लाभला. मनातलं दुःख बाजूला ठेऊन आपल्या मुलांना सकारात्मक विचार करायला लावणारे, त्यांच्या परीक्षेच्या काळात धावपळ करणारे, त्यांना सतत प्रोत्साहन देणारे पालकही खरोखरच महान म्हटले पाहिजे. समाजाने आपल्याला वेगळी वागणूक न देता सर्वसामान्यांप्रमाणेच वागवावे यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतो. जर आपण आपल्या कामात अपयशी ठरलो, तर त्याचा परिणाम इतर अंध व्यक्तींना मिळत असलेल्या वागणुकीवर होईल, या जबाबदारीचीही त्यांना जाणीव आहे.  आपल्याला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल, तर त्यासाठी आपले शंभर टक्के देण्याची तयारी असायला हवी, असं या बहीण-भावाचं म्हणणं आहे. असे हे आशिष आणि गरीमा गोयल सर्व समाजासाठीच आदर्श आणि प्रेरणादायी ठरत आहेत.

आदित्य नीला दिलीप निमकर

९९२०७०२९१७
adi.nimkar@gmail.com