Sunday, May 17, 2020

मतकरींच्या गूढकथांचा आशय

मराठीमध्ये गूढकथा हा विषय म्हटला की पहिलं आणि महत्वाचं नाव येतं ते म्हणजे अर्थातच रत्नाकर मतकरी यांचं. नवल सारख्या दिवाळी अंकांत अनेक गूढकथा वाचायला मिळतात. पण त्यातल्या original  कथा किती असतात? बहुतांश कथा या अनुवादित स्वरुपाच्या असतात. मात्र जी कथा original असते, ती रत्नाकर मतकरींचीच असते. त्यातही ती कादंबरी प्रमाणे वर्णनांच्या प्रवाहात भरकटत नाही. अत्यंत चोख, गोळीबंद रचनेत या कथेची जादू असते. एखादी लघुकथा लिहिणे आणि गूढकथा लिहिणे, यांत खूप फरक आहे. एखादी कथा लिहिताना चक्षुर्वैसत्यम घटनेचा आधार घेत त्याभोवती काल्पनिक पात्रांची मांडणी करत कथा लिहिणं हे कठीण असलं, तरी अद्भूत ठरत नाही. मात्र, एखाद्या सामान्य घटनेचा वेध घेताना त्याला गुढतेची किनार देणं, त्याच्या अंतापर्यंत त्याच्या शेवटाचा अंदाज येऊ न देता, एखादी चकमक घडावी, तद्वत शेवट अंगावर येईल आणि दीर्घकाळ स्मरणात राहील, अशा प्रकारे त्याची रचना करणं, हे गुढकथेचं सामर्थ्य आहे आणि तेच त्याचं वैशिष्ट्य. दुर्दैवाने मराठीत कथेचा या दृष्टीकोनातून विचार कऱण्याची हिंमत कुणी करत नाही आणि समीक्षकही ठराविक समीकरणाबाहेरची शैली मानत गूढकथेचं अभिजातपण मान्य करत नाही. गूढतेच्या या गर्भात एक नात्यांची वीण असणारी लघुकथाच असल्याचं विसरणं चूक आहे.
मतकरींच्या गूढकथा वाचल्यावर या कथेच्या शैलीमध्ये असणारं वेगळेपण नजरेत भरतं. गुढतेची झाक आली, की कथा आपोआप पुढे सरकताना वाचकाला ओढू लागते. गूढकथेचं विश्व वेगळं असेल, तर वाचकाला कथा आवडू शकते. पण ती त्याला आपलीशी वाटत नाही. मतकरींच्या कथेशी वाचक अधिक समरस होऊ लागतो. कथा अर्ध्यातच सोडून देण्याची शक्यताच नष्ट होऊन जाते. कारण मतकरींच्या बऱ्याचशा कथेतील पात्रं मुळात प्रथम पुरुषी असतात. आत्मकथन करत आपला अनुभव मांडतात. हे त्यांच्या कथांचं ठळक वैशिष्ट्य. एखादा माणूस स्वतःचा अनुभव सांगू लागतो, तेव्हा दुसरा त्यात समरस होण्याची शक्यता वाढते. दुसऱ्याच्या आयुष्यातील असामान्य आणि अतार्किक घटनेची माहिती मिळत असेल, तर त्यात जास्त रस घेणं, हा माणसाचा गूणच आहे. त्यामुळे अशा प्रथम पुरुषी पद्धतीने कथेची मांडणी करणं, हे मतकरींच्या कथांना जास्त जिवंत करतं. हे वैशिष्ट्य केवळ गूढकथा असल्यामुळेच अधोरेखित होतं असं नव्हे, कथा गूढ नसली तरीही प्रथम पुरुषी वक्तव्यांमुऴे ती रंजक होते. कथेमध्ये नाट्य असणं, ही कथेच्या रसाळपणाची पहिली अट असते. ती बहुतांश उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या लघुकथा पूर्ण करतच असतात. मात्र त्याला वेगळा आयाम देण्याचं काम मतकरींच्या लघुकथा करतात. आणि यासाठी लघुकथनाची शैली अधिक प्रभावी आणि धारदार असावी लागते. गूढत्व ही ती शैली आहे.
बहुतांश लघुकथा या लेखकांने ऐकलेले अनुभव किंवा त्यातून त्याला सुचलेलं पुढील काल्पनिक नाट्य यावर आधारित असतात. मात्र त्यातून लेखकांच्या विचार करण्याची शैली प्रतीत होत जाते. एखाद्या माणसाच्या आयुष्याची गोष्ट मांडताना तो कशाप्रकारे जगला, त्याने आयुष्यात काय केलं याचा ताळेबंद असतो. लघुकथेत आयुष्यातील एखादा प्रसंगच लिहिलेला असतो. आणि त्याच्या अंताशी एखादं नाटकीय वळण किंवा काव्यात्मक न्याय यांची बांधणी केली असते. बहुतांश मराठी लघुकथांचा आकृतीबंध याच  स्वरूपाचा असतो. मात्र इथेच मतकऱींच्या विचारसरणीतील वेगळेपण अधोरेखित होताना दिसतं. एखाद्याच्या मृत्यूची बातमी आणि मृत्यूची कथा यात जितका फरक असेल, तितका फरक इतर कथा आणि मतकरींची कथा यांत दिसतो. उदा. भुतांच्या गोष्टी बहुतेक सर्वच गावात ऐकायला मिळतात. कुठल्या तरी घरात, विहिरीत कुणीतरी आत्महत्या केल्याची घटना घडलेली असते. त्याला अनुसरून भुताची  सुरस कथाही ऐकायला मिळू लागतात. पण इथे दुसरा लेखक जर केवळ माणसाच्या आत्महत्येतलं कारुण्य शोधत असेल, तर मतकी त्याचा मनोव्यापार शोधतात. आत्महत्या करण्याची वेळ का आली, याबद्दल एखादा लेखक काल्पनिक कथा रंगवत असेल, तर मतकरी आत्महत्येनंतर त्याची काय अवस्था होत असेल, याचा विचार करत व्यक्तिचित्रण करतात. त्यामुळे त्या व्यक्तिची मानसिकता अधिक प्रखरपणे जाणवते. कथेची सूत्रं वेगळ्या बाजूने फिरवली गेल्याचं जाणवू लागतं. कुठलाही माणूस हा थोड्या फार प्रमाणात विकृत असतोच. हे मानसोपचारतज्ज्ञांचंच विधान आहे. फक्त त्याच्या विकृती किती प्रमाणात आहेत, यावर त्याचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. मतकरींच्या कथा नेमक्या या वास्तवाच्याच डोहातून वर येतात. प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात एक असं रहस्य असतं, जे त्याला कधीही उघड व्हावं असं वाटत नसतं. ते फारसं भयानक नसतं, खरंतर. पण ते असतं. अशा रहस्यमय घटनांमध्ये बहुतांशवेळा अपराधगंड असतो. आपल्याच एखाद्या निर्णयाचा पश्चात्ताप असतो. आपल्या गुन्ह्याचं दडपण असतं. अशा  माणूस आडकाठीविना सुटल्याचं तर उदहरण आपण अनेकवेळा पाहिलं असतं, पण अशा भावनांना अपराधाची टोचणी लावून पश्चात्तापदग्धतेची वेगळी अवस्था मतकरी आपल्या कथेतून उलगडतात. आता सामान्य माणूस, त्याचं दैनंदिन आयुष्य त्याची चूक, त्याचं प्रेम या सर्व गोष्टी इतरही लेखक दर्शवतात. मतकरीही तेच करतात. त्यामुळे मूळात मतकरींच्या लघुकथा या लघुकथाच असतात. त्यांना गूढकथा म्हणण्याची तशी आवश्यकता नाही. मात्र त्यांचं तंत्र मात्र विलक्षण असतं. वातावरणनिर्मिती, माणसाचं वागणं यातून ते एक गारूड वाचकांच्या मनावर घालतात. 
लघुकथांमध्ये असणारी सर्व वैशिष्ट्यं गूढकथांमध्ये असतात. त्यामुळे गूढकथा या लघुकथांचाच एक प्रकार आहे, हे निश्चित. जेम तेम 5- 6 पानांमध्ये मावणारं पण दीर्घकाळ ठसा उमटवणारं कथानक, मानवी संबंधांमधील गुंतागुंत, अनोखी व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत आपल्याला एकरूप करणारी वातावरणनिर्मिती या सर्व गोष्टी लघुकथांचं अविभाज्य अंग असतात. मतकरींच्या गूढकथा या सर्व नियमांत बसतात. पण वाचकांना गुंतवून ठेवत शेवटी काहीतरी धक्कातंत्र वापरून अद्भुताचा आनंद देणं, करमणूक करणं एवढ्यावरच मतकरींच्या गूढकथा थांबत नाहीत. त्यामुळेच त्या लौकिकार्थाने लघुकथा एवढीच ओळख राखत नाहीत. या लघुकथा मनोरंजनाची पातळी ओलांडून तात्विक पातळी गाठतात. आध्यात्मिक विचार, सामाजिक प्रश्न, माणुसकी, अगतिकता यांसारखे विषय मतकरींच्या गूढकथांची खरी बलस्थानं आहेत. सामाजिक समस्या मांडणारी एखादी लघुकथा साधारण ज्या रेषेत जाईल, त्या रेषेला खोडून मतकरींना एक वेगळं स्वरूप लघुकथेला दिलं. त्यासाठी गूढ हे माध्यम बनवलं. यामुळे रोजच्या व्यवहारिक पातळीवरील गोष्टींना नवी डूब मिळाली. अज्ञाताशी नातं जोडल्यामुळे ज्ञात गोष्टींकडे पाहाण्याची वेगळी दृष्टी या कथांमुळे मिळते. त्या अर्थाने या कथा मराठी साहित्यातील अत्यंत महत्वाच्या आहेत.

-
आदित्य नीला दिलीप निमकर