Sunday, December 30, 2012

‘प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो...’

आदित्य निमकर

लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय.  त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या बाजूने असं बरंच बोललं जातंय. पण, त्यापलिकडे आपण या नात्याकडे बघू शकतोय का? मूळात लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय? लग्न न करता दोन व्यक्तींनी एकत्र राहून स्वीकारलेले सहजीवन अशी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची सोपी व्याख्या होईल. पण खरं सांगायचं तर लिव्ह-इनची संकल्पना मुळीच पाश्चात्त्य नाहीये. ती मध्ययुगापासून अस्तित्वात आहे. बहुतेक त्या ही आधीपासूनच. आदिम काळापासून. आणि ही संकल्पना शरीरसंबंधांइतकीच वैश्विक आहे. त्याकाळी 'लिव्ह इन' हा शब्द अस्तित्वात नव्हता, पण असे नातेसंबंध होते. 'माणूस' हा सिनेमा एक पोलीस वेश्येला राहण्यासाठी खोली घेऊन तिच्यासोबत घरोब्याचा केलेला विचार करू लागतो अशा थीमवर बनवला गेला होता. तो ही १९३८साली. सखाराम बाईंडरमधला काही हिंसात्मक अपवाद सोडला तर दिसतं की  सखाराम हा ही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मधलाच घटक होता. त्याला जगाने नावं ठेवली तरी तो त्याच्या तथाकथित तत्वांवर जगत होता. आजच्या काळात माणूस तसंच जगतोय ना..  समाजाची पर्वा करण्यापेक्षा आपण आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून जगलेलं आयुष्य जास्त महत्वाचं. ते 'लिव्ह इन'चंच रूप होतं.
 
आजच्या काळात प्रत्येक गोष्टीत इनसेक्युरिटी वाढत चालली आहे. नोकरी टिकेल का याची खात्री नसते. लग्नही केल्यावर ते टिकेल याची शाश्वती नसते. मग अशा अशाश्वत गोष्टींचा ताळमेळ बसवताना दमछाक होत असते. एकमेकांची गरज तर आहे, पण संसार संसार असं जे म्हणतात ते करायला वेळ नाही. अशा परिस्थितीत लिव्ह इनचा पर्याय सोपा वाटतो.
 
पण दोन्ही बाबतीतही पुढचा विचार करावाच लागतो. जसं लग्न झाल्यावर पुढचं प्लॅनिंग सुरू होतं तसंच ‘लिव्ह इन’मध्येही हा विचार सुरू होतोच की. लिव्ह इनमध्ये राहाण्याचा एक मोठा विश्वास म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं. पण आज बघितलं तर बहुतेक विवाहीत मंडळींमध्ये नवरा- बायको दोघेही कमावते असतात. आपापल्या पायावर उभे असतात.  स्वतंत्र असतात.    लग्नानंतर लाईफ पार्टनर असतो लिव्ह इनमध्ये नुसता पार्टनर असतो. (लाईफ लाँग पार्टनर नसतो हाच एक फरक. कधी कधी लाईफ विदाऊट पार्टनर असह्य होतं तेव्हा पार्टनर विदाऊट लाईफ लाँग रिलेशन हा उपाय आकर्षक वाटतो.)
 
लिव्ह इनमध्ये  आपलं स्वातंत्र्य अबाधित राहातं. नाती परिपक्व होत जाताना लग्नं हा फक्त एक सोपस्कार उरतो. सर्वच पातळींवर जवळीक साधल्यावर ती स्वेच्छेने की देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने हा विचारच उरतो कुठे?
 
पण... लिव्ह इनमध्ये ज्या प्रकारे राहातो, त्याच प्रकारे लग्न करून माणूस राहात असतो ना... एकमेकांचा आधारही आणि स्वातंत्र्यही.  पण, लिव्ह इन मध्येही तुम्ही मानसिक पातळीवर कमिटेड झालात की दुसऱ्याशी संबंध ठेवावासा वाटत नाही. आणि लग्न करूनही काही जणांना विवाहबाह्य संबंध ठेवल्याशिवाय राहावत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य हा मुद्दा व्यक्तिसापेक्ष बनला आहे. लिव्ह इनमधून बाहेर पडलं की पुढे काय? हा विचार नेहमीच रिलेशन सुरू होण्यापूर्वी केलेला असतो. त्याच आधारावर लिव्ह-इन सुरू होते. मात्र, लग्नाच्यावेळी हा विचार केला जात नाही. पण, काहींच्या बाबतीत घटस्फोट ही गोष्टही घडतेच ना. लिव्ह इनमधून बाहेर पडलं काय किंवा घटस्फोटित बनलं काय… दोघांच्या परिस्थितीत फरक काय ? दोघांकडे पाहायच्या नजरा सारख्याच. मग, फरक कुठला?
 
पझेसिव्हनेस, संसारव्याप, राहाण्याची समस्या यांचा विचार जमेस धरला तर  लिव्ह इन रिलेशनशीप' ह्या संकल्पनेची आज खूप गरज आहे. मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरणाऱ्या एकाकीपणाला लिव्ह-इन चा पर्याय  उपयुक्त  ठरू शकतो.
 
उतारवयात लग्नासारख्या सोपस्कारांमध्ये न अडकता सहजीवन अनुभवण्यासाठी ८२ वर्षांच्या अरविंद गोडबोले यांनी नागपुरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ’ स्थापन केलं. त्याचं उपकेंद्र ठाण्यात सुरू करण्याचा निर्णयही नुकताच  घेण्यात आला आहे. म्हणजे अशा गोष्टी नकोच असं कसं म्हणणार?
 
लग्न न करताही सहजीवन जगणं हे आदिम आणि तितकंच नैसर्गिक आहे. उलट ‘विवाह’ ही नंतर आलेली संकल्पना आहे, हे मान्य करायला हवं. त्याला संस्कारांचं नाव दिलं तरीही मूळ तत्वांचं, प्रवृत्तींचं दमन करणं अशक्य आहे. शेवटी तो वैयक्तिक प्रश्न आहे. विवाह ही सोयही असते,तर कधी समस्याही असू शकते. व्यक्तिसापेक्ष बदलणाऱ्या या गोष्टीला एकाच नियमात कसं बसवता येईल. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न मानून त्याचा आदर केला, तर लिव्ह इनमध्ये काहीच वाईट नाही.

Thursday, May 17, 2012

वेश्यांचं भावविश्व उलगडणारा मंटो



आजपासून १०० वर्षांपूर्वी ११ मे १९१२ रोजी लुधियाना जिल्ह्यातील समराला गावी खानदानी बॅरिस्टरच्या घरात जन्म झाला सआदत हसन मंटोचा… पिढीजात बॅरिस्टर्सच्या घरात जन्म घेऊनही मंटो वकील बनला नाही, मात्र त्याला वारंवार कोर्टाची पायरी चढावी लागली. असा कोण होता मंटो?

गेलं संबंध शतक ज्याच्या लेखणीने हादरून गेलं, शहारून उठलं.. तो सआदत हसन मंटो. एक अतिसंवेदनशील आणि खरा लेखक.. आपल्याला आलेल्या अनुभवांना, सुचलेल्या कल्पनांना कुठलीही भीडभाड न बळगता ज्याने जगासमोर मांडलं तो मंटो… केवळ सेक्स, वेश्या यांच्यावर लिहीणारा लेखक म्हणून जगाने ज्याला बदनाम केलं, तरीही तो अत्यंत प्रभावशाली, प्रामाणिक आणि महान लेखक आहे हे सत्य कुणीही नाकारू शकलं नाही.

वडील अत्यंत कडक. मंटो मात्र वाया जात चाललेला उनाड पोरगा. अभ्यासात काडीचाही रस नसलेला. उर्दू साहित्यातला महानतम कथाकार मंटो हा परीक्षेत दोनदा नापास झाला, तो उर्दू विषयातच. एकीकडे नाटक आणि वाचन यांची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाचं इतकं वेड होतं त्याला की लहानपणी अमृतसर स्टेशनवरील पुस्तकांच्या स्टॉलवरून एक इंग्रजी पुस्तक चोरताना त्याला पकडलं होतं. मित्रांबरोबर त्याने नाट्य संस्थाही सुरू केली होती, पण काही दिवसांतच त्याच्या वडिलांनी येऊन तिथल्या सामानाची तोडफोड करत ‘असले धंदे ताबडतोब बंद’ करण्याची धमकी दिली.

अमृतसरच्या मुस्लिम हायस्कूलमध्ये शिकत असताना मंटोच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली ती अमृतसरमधीलच जालियनवाला बागेतील हत्याकांडाची घटना. त्यावेळी मंटोचे वय वर्ष होतं अवघं ७. याच घटनेची परिणती मंटोच्या पहिल्या वहिल्या कथेत झाली. या कथेचं नाव होतं ‘तमाशा’.  या लघुकथेत जालियनवाला बागेतील हत्याकांडाचं एका ७ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून दर्शन घडतं.

भारतात ब्रिटीशविरोधात वातावरण तापत चाललं होतं. अशात लहानग्या मंटोच्या मनावर क्रांतीकारी, साम्यवादी विचारांनी परिणाम करायला सुरूवात केली. १९३२ साली वडिलांच्या म़ृत्यूपश्चात त्यांच्या फोटोखाली भगतसिंगची मूर्ती त्याने ठेवली होती. साम्यवादी लिखाणावरील प्रेमापोटी आणि अब्दूल बारी यांच्या आग्रहाखातर मंटोने व्हिक्टर ह्यूगोच्या ‘द लास्ट डेज़ ऑफ़ अ कंडेम्ड’ या पुस्तकाचं ‘सरगुजश्त-ए- असिर’ हे उर्दू रुपांतर केलं. लाहोरवरून ते प्रकाशित झालं. तसंच रुसी अफसाने हे उर्दू भाषांतरीत पुस्तक लिहीलं. आतापावेतो उर्दू साहित्यात मंटोचं नाव होऊ लागलं होतं.

बाविसाव्या वर्षी पुन्हा कॉलेजचा रस्ता पकडून मंटोने शिक्षण घ्यायला सुरूवात केली. मुस्लिम यूनिव्हर्सिटीत काही दिवस शिक्षण ही घेतलं. पण पूर्ण नाहीच केलं. याच सुमारास काही मासिकांत ‘इन्कलाब पसंद’ या नावाने लघुकथा लिहीण्यास सुरूवात केली.

ऑल इंडिया रेडिओ
मुळातच उनाड असणाऱ्या आणि आपल्या सावत्र भावांकडून मिळणाऱ्या वागणुकीने वैतागलेला मंटो लाहोरला निघून गेला. तिथे ‘पारस’, ‘मुसव्विर’ या मासिकांत संपादकीय कामाकरता रुजू झाला. १९४१ साली दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये मंटोला लेखकाची नोकरी मिळाली. त्या दिवसांत मंटोने साहित्य जगताला कथांचा खजिना दिला. ‘मंटो के ड्रामे’, ‘आओ…’, ‘जनाज़े’, ‘तीन औरते’, ‘धुवाँ ‘इत्यादी लघुकथा त्याने लिहील्या. पण १७ महिन्यांतच ही नोकरी सोडून मंटो मुंबईत दाखल झाला.


सिनेमांच्या मायानगरीत

१९४२ ते १९४८ मंटो मुंबईत राहिला. मंटोने या सुमारास फिल्मी मासिकांसाठी लिखाण केलं. सिनेमांच्या कथा, पटकथा लिहिल्या. आठ दिन नामक सिनेमात तर लिखाणाबरोबरच छोटीशी भूमिकाही केली. मिर्झा गालिब, अपनी नगरीया यासारख्या सिनेमांच्या कथा लिहील्या. मुंबईतच राहिला असता, तर मंटो सिनेवर्तुळात नामांकित लेखक म्हणून प्रसिद्धही झाला असता आणि श्रीमंतही. पण, मुळातच अस्थिर स्वभावाच्या मंटोला मायानगरीत चैन पडत नव्हतं. त्यात १९४७ साली फाळणीनंतर तर मंटो पुरता घाबरून गेला. आपले सगळे मित्र, शहर सोडून अखेर मंटो १९४८ साली पाकिस्तानला निघून गेला.. लाहोर येथे स्थायिक झाला. आणि त्याच्या आयुष्यातील लेखक म्हणून अत्यंत वादळी आणि दुर्दैवी कालखंड सुरू झाला.

पाकिस्तान   
मंटो मुंबईत राहिला असता, तर नक्कीच स्थिरावला असता, पण पाकिस्तानात जाणं ही त्याची मोठीच चूक ठरली. पाकिस्तानच्या कर्मठ मुस्लिम देशात मंटोचा श्वास गुदमरायला लागला. मुळात पाकिस्तानातील सर्व  हिंदू सिनेनिर्माते फाळणीनंतर मुंबईत आले होते. लाहोरमध्ये सिनेमा निर्माण होत नव्हते. त्यामुळे मंटोला काम मिळत नव्हतं. त्यातूनच मंटोला दारूचं व्यसन लागलं होतं. जे त्याला मृत्यूपंथाला घेऊन जाणार होतं. वेगवेगळ्या मासिकांत मंटो लघुकथा लिहीत होत्या. त्याही दोन पैसे मिळावेत आणि दारू पिता यावी म्हणून. कधी कधी तर मासिकाच्या ऑफिसात गेल्यावर पैसे हवेत म्हणून तिकडचा कागद आणि पेन उचलून मंटो काहीतरी खरडून द्यायचा. पण हे खरडणं विसाव्या शतकातल्या महान कथांचं लेखन होतं. पाकिस्तानात मंटोचे १४ कथासंग्रह प्रकाशित झाले. ज्यात १६१ लघूकथा होत्या. बू, ठंडा गोश्त,नंगी आवाजे, काली सलवार, सियाह हाशिये या कथांनी देशभरात खळबळ माजवली. असं काय होतं या कथांमध्ये?

फाळणीचं विदारक चित्र अतिसंवेदनशील मंटोच्या नजरेसोर घडल्यावर त्यातून जे उमटलं, ते या कथांमध्ये होतं. वेश्यावस्तीचं चित्रणही त्याच्या कथेत सर्रास येत होतं. ही वस्ती त्याच्या आसपासच होती आणि तिथे जाणारेही… पण या कथांनी मंटोची ‘वेश्यांचा लेखक’ अशी बदनामी केली. पण मंटो लिहीतच राहिला.

वेश्यांचा लेखक
माझ्या आसपास जे आहे, त्यावरच मी लिहीतोय. जर मी वेश्यांबद्दल लिहित असेन, तर माझ्यावर आक्षेप घेण्याऐवजी परिस्थिती सुधारा असे कडवं आव्हान मंटोने कोर्टाला दिलं. मंटोवर एकूण सहावेळा खटले भरण्यात आले, कारण त्याच्या कथांमध्ये वेश्यांबद्दल लिहीलं गेलं होतं. ‘ठंडा गोश्त’मध्ये फाळणीत मुलींना पळवणाऱ्या माणसाला आपण एका मुलीच्या प्रेतावर बलात्कार केला याची जाणीव होते आणि तो सुन्न होतो या मनःस्थितीचं वर्णन होतं. तर ‘खोल दो’मध्ये फाळणीत हरवलेल्या अर्धमेल्या, बलात्काराने मरणोन्मुख झालेल्या मुलीसमोर बापाचं येणं होतं. ‘काली सलवार’मध्ये फाळणीनंतर एका वेश्येची झालेली परवड चित्रित करण्यात आली होती. ‘धुवाँ’मध्ये वयात येत असणाऱ्या मुलाचं आपल्याला नेमकं काय होतंय याबद्दलची अस्वस्थता लिहिली होती. ‘बू‘मध्ये सेक्समधील गंध आणि दर्प मंटोने समोर आणले. ‘ऊपर, निचे और दरमियाँ’मध्ये विविध वयातील लोकांचं शरीरसंबंधांकडे पाहाण्याचं तंत्र अत्यंत संयत पद्धतीने लिहीलं होतं. या सर्व कथांवरे खटले भरण्यात आले होते. पण मंटो मनाने इतका निष्पाप होता की, आपलं नेमकं काय चुकलंय, हेच मंटोला समजत नव्हतं. मंटो या खटल्यांतून सहिसलामत सुटला खरा. पण सततच्या खटल्यांनी, बदनामीने मनाने पूर्णपणे खचून गेला.


काही दिवस तर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येही त्याला काढावे लागले. पण, त्यावर मंटोने आयुष्यातील सर्वांत गाजलेली लघुकथा लिहीली. ‘टोबा टेक सिंग’ नावाची. फाळणीनंतर वेड्यांच्या भावविश्वात निर्माण झालेला ‘देश’ संकल्पनेवरील गोंधळ इतक्या जबरदस्त पद्धतीने लिहिला की जगाला प्रश्न पडला, हिंदुस्तानाचं विभाजन हा नेत्यांना आलेला वेडाचा झटका तर नव्हता ना?

असा हा मंटो… फक्त छान छान, गोड गोड, कौटुंबिक गोष्टी लिहिणाऱ्यांपैकी नव्हता. तर परखडपणे आणि कडवट लेखणीने परिस्थितीवर भाष्य करणारा ‘माणूस’ होता. आसपासच्या घटनांमधली विदारकता टिप कागदाप्रमाणे त्याच्या प्रतिभेने टिपून घेतली होती. त्याच्या लिखाणामुळे प्रशासनाने तौबा केलं. पण तो लिहितच राहिला. नवऱ्याचा मार खाऊन रडणाऱ्या आणि तरीही नवऱ्याची सेवा करत राहाणाऱ्या अबला बायकांपेक्षा त्याला ‘आपलं म्हातारपण जवळ आलंय हे कळल्यावर घाबरलेल्या वेश्ये’ची मानसिकता आव्हानात्मक वाटली. समाजातल्या उपेक्षित मानल्या गेलेल्या अशा व्यक्तींवर आणि समाजाची त्यांच्या प्रती असणारी वागणूक यावर मंटोने कुठलाही पक्षपात न करता लेखणी चालवली. त्याचं लेखन म्हणजे समाजाला दाखवलेला आरसा होता. त्यात समाजाला त्याचं हिडिस रुप मंटोने दाखवलं. आपलं हे बीभत्स रूप पाहून समाजालाच घृणा वाटली, मात्र त्यांनी मंटोलाच ‘अश्लील लेखक’ म्हणून बदनाम केलं. कारण त्याने शरीरसंबंधांना श्रृंगार, रोमान्सची झालर न लावता त्यातील पशूत्वासकट लिहिलं. समाजाने त्याला अश्लील लेखक ठरवलं. पण, त्याच्या कथांचं महत्व जगाला समजून घ्यावंच लागलं. त्याच्या कथा या केवळ कल्पनेची भरारी न राहाता फाळणीची आणि त्या सुमारास असलेल्या समाजमनाची बखर म्हणून उपयुक्त ठरते. त्याच्या कथांमधील मनोविश्लेषण भल्या भल्या मानसशास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडतात..

बेचाळीस वर्षं आठ महिने आणि सात दिवस इतक्या आयुष्यात मंटोने २३० लघुकथा, ६७ नभोनाट्य, २२ व्यक्तिचित्रं, ७० लेख आणि १ कादंबरी लिहीली. जाती-धर्माच्या भेदभावाला न जुमानता त्याने लिहिलेल्या कथांमुळे मंटो हा विसाव्या शतकातला अशियातील सर्वोत्कृष्ट कथाकार ठरला.

मात्र, तोपर्य़ंत उशिर झाला होता. मंटो वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी दारिद्र्यावस्थेत, कोर्ट कचेऱ्यांना कंटाळून, खचलेल्या अवस्थेत १८ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तानात मरण पावला. त्याचवेळी मुंबईच्या थिएटरमध्ये मंटो लिखित ‘मिर्झा गालिब’ सिनेमापुढे हाऊसफुल्लचा बोर्ड होता.

तो म्हणालेला त्याप्रमाणेच, ‘सआदत हसन मेला, तरी मंटो जिवंतच राहिला.’

आदित्य नीला दिलीप निमकर
९९२०७०२९१७
adi.nimkar@gmail.com