Saturday, March 23, 2013

‘बडे मियाँ’ तो बडे मियाँ....मुंबई महानगर... या महानगराच्या पोटात सगळीकडे पोटार्थी लोकांची गर्दी.. आणि या गर्दीची पोटं भरण्यासाठी वडापावच्या गाड्यांपासून ते उंची फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत सगळेजण योगक्षेमं वहाम्यहम् म्हणत हात जोडून उभे असतात. मुंबईच्या कुलाबा कॉजवेमध्येही एकीकडे ताजसारखं विश्वविख्यात फाईव्ह स्टार हॉटेल आहे, तर त्याच्याच मागच्या गल्लीत बडे मियाँसारखं अपरात्रीसुद्धा पोटाचे आणि जीभेचे चोचले पुरवणारा रोडसाईड ठेलादेखील आहे. म्हटलं तर ठेला पण ताज हॉटेलइतकाच मुंबईत नावाजलेला ब्रँड बनला आहे. 
बडे मियाँच्या मालकांपैकी एक असणाऱ्या सलमान शेखशी बडे मियाँबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना भेटलो. आणि मुंबईतल्या या सुप्रसिद्ध बडे मियाँबद्दल माहिती मिळवली.

बडे मियाँ मूळचे कुठले?
उत्तर प्रदेशातील बिजनौर या छोट्या गावातले. तिथून १३ वर्षांचा यासीन मोहम्मद मुंबईत आला. मटणाचे तुकडे करणं आणि वेगवेगळ्या हॉटेलांना पुरवण्याचं काम तो करत असे. त्यांची गुरू हाजरत फिदा मोहम्मद आदम चिश्ती यांच्यावर प्रचंड श्रद्धा होती. त्यांनी लोकांची उत्तम आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याची शिकवण दिली होती. बक्षिस म्हणून या मुलाला २० रुपयेही दिले आणि सीख कबाबांचं दुकान उघडण्याची सूचना केली. हा मुलगा मोहम्मद यासीन म्हणजेच बडे मियाँ...   
बडे मियाँची स्थापना कधी आणि कशी झाली?
स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वर्षभर आधी म्हणजे १९४६मध्ये मोहम्मद यासीन यांनी या कुलाबा कॉजवे परिसरात फूटपाथवर सीख कबाब विकायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ १ शेगडी होती. त्यावरच सीख कबाब भाजले जायचे. मोकळ्या हवेत या भाजल्या जात असलेल्या कबाबांचा वास असा काही जाणाऱ्या येणाऱ्यांना धुंद करायचा, की आपोआप कबाब खायला पावलं वळायची.. हळूहळू या कबाबांचे शौकीन वाढले.. व्यवसाय वाढत गेला आणि बडेमियाँ मुंबईतील एक महत्वाचं फूड जॉइंट बनलं. मोहम्मद यासीन यांचा उत्तर भारतीय खानदानी मुस्लिम पेहराव पाहून लोक त्यांना बडे मियाँ संबोधत असत. अखेर या सीख कबाब कॉर्नरला बडेमियाँ हेच नाव पडलं.
एवढं प्राइम लोकेशन कसं काय मिळालं?
दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे हा श्रीमंत आणि पर्यटकांनी गजबजलेला भाग वाटत असला, तरी त्या काळी या रस्त्याला अक्षरशः सामसूम होती. उलट,  चिश्तींनीही जेव्हा या ठिकाणी सीख कबाबांचं दुकान उघडण्याची कल्पना ऐकवली, तेव्हा बडे मियाँनी हाच प्रशन विचारला, की या वैराण भागात माझे कबाब खायला येणार कोण? पण चिश्तींनी याच जागेत बडे मियाँना भरभराटीचं मूळ असल्याचा विश्वास दिला... आणि घडलंही तसंच... बडे मियाँचं नाव आणि कबाब लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. दूर दूरवरून लोक बडे मियाँकडे कबाब खाण्यासाठी वाट वाकडी करून येऊ लागले. बडे मियाँचं नाव नावारुपाला येण्यामागे सर्वांत मोठा हात मात्र भारतीय नौदलाचा आहे. इथून जवळच असलेल्या नेव्हीच्या क्वार्टर्समधील ऑफिसर्स पहिल्यापासून मोठ्या प्रमाणावर इथे येऊन कबाब खात. बडे मियाँ हे नावदेखील या नेव्हीच्या लोकांकडूनच मोहम्मद यासीन यांना मिळाले.
इथले कुठले पदार्थ जास्त लोकप्रिय आहे?
पूर्वी मटणाचे पदार्थ जास्त खाल्ले जात. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात लोकांची आवड बदलली. त्यांना चिकन खाणं जास्त आवडू लागलं. त्यामुळे आज चिकनचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. चिकन सीख कबाब रोल, चिकन टिक्का, चिकन खिमा यांसारख्या पदार्थांची मागणी आज सर्वांत जास्त आहे. त्यामुळे चिकनचेच पदार्थ जास्त आहेत. मात्र आता व्हेज पदार्थही लोकांना आवडू लागले आहेत. मुख्य म्हणजे आम्ही व्हेज साठी काऊंटरही वेगळं ठेवलंय. जेव्हा एखादा खाणाऱ्यांचा ग्रुप येतो, तेव्हा त्यातले काहीजण शाकाहारी असतात, गुजराथी आणि मारवाडी समाजाचे बरेचजण इथे येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही व्हेज काऊंटर वेगळं उघडलंय. आता तिथेही बरीच गर्दी असते. आज ६५% लोक इथे नॉन-व्हेज खात असतील, तर ३५% लोक व्हेज फूड खातात. इथले पनीर टिक्का, पनीर सीख कबाबही खूप लोकप्रिय आहे.
ही बडे मियाँची कितवी पिढी?
आमची पिढी ही तिसरी पिढी... बडे मियाँची पाच मुलं. ते हे व्यवसाय संभाळू लागले. यांची मुलं म्हणजे आमची पिढी बडे मियाँ संभाळत आहे. आमच्या पिढीत एकंदर १३ भावंडं आहेत. सर्व मिळून एकत्र हा व्यवसाय संभाळतो.
लहानपणापासून तुम्ही हाच व्यवसाय संभाळण्याचं ठरवलेलंत का?
हो. आमच्याकडे कुणाला कधी याच व्यवसायात येण्याची बळजबरी नसते. पण, बडे मियाँचाच व्यापार एवढा मोठा आहे, की तो संभाळण्याचंच काम आपोआप करायला लागलो. पुढच्या पिढीचंही कदाचित तसंच होईल. मुळात, बडे मियाँचं नेहमी सांगणं असायचं, की नोकरी करू नका, नोकरी करणाऱ्याला  एक दिवस निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत बडे मियाँतर्फे कायम लोकांची सेवा करू.
तुम्ही बडे मियाँ संभाळण्यापूर्वी काही विशेष शिक्षण घेतलेलंत का?
हो. मी आयएचएम, औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. त्यानंतर अनुभवासाठी काही काळ विदेशातील हॉटेल्समध्ये कामही केलं. माझी बहुतेक भावंडंही याच मार्गाने व्यवसायात शिरतील.
पण इतकी वर्षं तुम्ही बडे मियाँच्या पदार्थांची चव, गुणवत्ता तशीच कशी काय राखू शकलात?
याचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबाला बडे मियाँनी दिलेला सिक्रेट मसाला.. तो मसाला फक्त आमच्या कुटुंबालाच माहित आहे. आजही बडे मियाँमध्ये पदार्थ बनवताना त्यात मसाला आम्ही आमच्या हातानेच घालतो. तसंच सकाळी चिकन, मटण ते अगदी पनीरही आम्हा कुटुंबियांपैकीच एकजण सकाळी जाऊन आमच्या ठरलेल्या सप्लायर्सकडून जिन्नस निवडून आणतो. अर्थात ते मसाले आणि सप्लायर्स यांची माहिती आम्ही कधीही उघड करत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या काउंटरवर पाहिलं असेल, तिथ कुठल्याही प्रकारची स्टोअरेज सिस्टम नाही, फ्रिज वगैरे नाही. आम्ही ग्राहकांना कायम ताजे पदार्थच देतो. एखादवेळेस जिन्नस कमी पडले तर सप्लायर्सकडून ऐनवेळी मागवतो. पण, बेगमी करून ठेवत नाही.
दिवसाला साधारण किती ग्राहक येतात?
वीकेण्डच्या सुमारास दररोज संध्याकाळी सुमारे १ लाख लोक येतात. इतर दिवशीही साधारण तेवढीच गर्दी असते. इथे मर्सिडिससारख्या गांड्यांमधून लोक खायला येतात, आणि कारच्या टबवर प्लेट ठेवून खातात, इतकं त्यांना बडे मियाँचं आकर्षण आहे. विदेशी पाहुणेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर येतात. ते एवढं मसालेदार खाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी सौम्य मसाले वापरून कबाब बनवतो. तसंच काही वेळा प्रवासामध्ये ऍडव्हेंचर म्हणून विदेशी लोक स्पेशल तिखट, मसालेदार पदार्थही मागवतात. सौदी अरेबिया, युरोप, अमेरिकेतून आलेल्या लोकांनाही बडे मियाँतले पदार्थ खूप आवडतात. ताजमध्ये पार्टीसाठी आलेले, आसपासच्या डिस्कोथेकमध्ये थिरकायला आलेले कित्येक तरुण रात्री- अपरात्री बडे मियाँमध्ये गरमा-गरम कबाब, टिक्के खायला येतात. मोकळ्या हवेत रात्रीच्या वेळी बडे मियाँचे कबाब खाणं ते फाईव्ह स्टारच्या वातावरणापेक्षा जास्त एंजॉय करतात.
कुणी सेलिब्रिटी येतात?
राज कपूर बडे मियाँच्या कबाबांचे खूप शौकीन होते. मुंबईतले बहुतेक सगळे सेलिब्रिटी इथे हजेरी लावत असतात. टीव्हीवर काम करणारे जवळपास सर्वच कलाकार रात्री इथे येतात, जॅकी श्रॉफ तर महिन्यातून दोन-तीन वेळा येतातच येतात. पण सेलिब्रिटी म्हणून कुणाला वेगळी वागणूक मिळत नाही. आमच्यासाठी आमचा प्रत्येक ग्राहक सेलिब्रिटीच असतो.
भविष्यात बडे मियाँचा पसारा आणखी वाढवण्याचा काही विचार आहे का?
नक्कीच आमचा तसा इरादा आहे, गेल्या ८० वर्षांत पहिल्यांदाच आम्ही हॉर्निमन सर्कलला मोठं रेस्टॉरंट उघडलं आहे. अशीच आणखी रेस्टॉरंट्स उघडण्याचा आमचा मानस आहे. मात्र चेन किंवा फ्रंचाइजी बनवण्याची आमची इच्छा नाही. ज्याप्रमाणे मघाशी म्हणालो त्याप्रमाणे पदार्थांमध्ये मसाला घालण्याचं काम आमच्याच कुटुंबातील लोक करतात. ते मसाले आम्ही कुणासमोर उघड करत नाहीत. त्यामुळे इतरत्र जरी बडे मियाँची हॉटेल्स उघडली, तरी ते काम आमचंच कुटुंब करेल. सध्या आम्ही लक्ष मुंबईवर केंद्रित केलं असलं, तरी इन्शाल्ला भविष्यात देशभरात बडे मियाँची हॉटेल्स उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू....   
 
आदित्य (रवीश) निमकर
9920702917
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)  

No comments:

Post a Comment