Friday, January 10, 2014

अफाट आठवणींचा अजस्त्र गोफ

दिवाळीचा काळ दरवर्षी काही ना काही देऊन जातो. गेल्यावर्षी 'मिस्टर झी' पारितोषिक मिळालं. यंदा दिवाळीपूर्वीच कल्याणच्या 'सार्वजनिक वाचनालया'कडून मला पुरस्कार मिळाला. वाचनालयाला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत 'मला प्रभावित करणारं पुस्तक' या विषयावर मी लिहिलेल्या लेखाला प्रथम पुरस्कार मिळाला. २५०० रुपये रोख, सुंदरशी ट्रॉफी, भलामोठा पुष्गुच्छ आणि सन्मानपत्र मिळालं. 
एखादं पुस्तक हातात घेतो, तेव्हा आपल्या काही त्या पुस्तकाकडून अपेक्षा असतात. राजकीय पुस्तक वाचताना राजकीय विचारसरणी, राजकीय निर्णय आणि त्यामागची कारणं, त्यांचे परिणाम यांची अधिकाधिक संदर्भासह माहिती मिळावी, अशी अपेक्षा असते. कवितासंग्रह वाचताना आपल्या संवेदना जाग्या होतील, भाषेचं माधुर्य नव्याने जाणवावं. कवीच्या उत्तुंग कल्पनांची झिंग आपणही अनुभवावं अशी आपली अपेक्षा असते.  तर कादंबरी वाचताना विरंगुळा एवढंच उद्दिष्ट असतं. अर्थात काही कादंबऱ्या या संदर्भग्रंथांपेक्षा जास्त माहितीपर आणि उद्बोधक असतात. 
 
मुळातच माझं वाचन हे काहीसं ऑब्सेसिव्ह पद्धतीचं. एखादा विषय मनाला भिडला, तर त्या विषयावरची जितकी मिळतील, तितकी पुस्तकं शोधून वाचायची. एखाद्या लेखकाने प्रभावित केलं, तर त्या लेखकाचं समग्र साहित्य वाचून काढायचं, अशी माझी पद्धत. अशा वाचनपद्धतीत मला सर्वांत जास्त कुठला साहित्य प्रकार वाचायला आवडत असेल, तर तो म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र. हा साहित्यप्रकार अत्यंत गोळीबंद आणि तितकाच व्यापक असतो.  एखाद्या राजकीय किंवा सामाजिक संदर्भग्रंथांमधून तपशिल मिळतो. पण चरित्रामध्ये तत्कालिन परिस्थितीची स्पंदनं जाणवतात. घटनेकडे पाहाण्याची मनोभूमिका चरित्रांमधूनच दिसते आणि तरीही त्यात कल्पनेच्या डोहातल्या गटांगळ्या नसून व्यक्तिसापेक्ष सत्याची भक्कम जमीन असते. त्यामुळे अनेकदा अनेक विषयांवरील अभ्यासाची पुस्तकं वाचून जितकी गोष्ट कळत नाही, तितकी चरित्र किंवा आत्मचरित्रं समजावून जातात. चरित्रांमध्ये अर्थातच एक त्रयस्थता असते. आत्मचरित्रांमध्ये स्वतःचं मत पूर्णपणे समजून आपली बाजू मांडली असते. ते कदाचित पूर्णपणे प्रामाणिक असतं, किंवा नसतं. पण चरित्रांमधून मिळणारा एका समस्त काळाचा, एका पीढीचा धांडोळा स्तिमित करणारा असतो.

माझा आवडीचा आणि बराचसा अभ्यासाचा विषय म्हणजे नाटक. त्याच्याशी संबंधित बरीच पुस्तकं वाचली. देशोदेशींची नाटकं वाचली, पाहिली. विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड यांच्या नाटकांचं वाचन केल्यानंतर हळूहळू वाचन नाटकांच्या नाटकारांचं चरित्र समजवण्याच्या दिशेकडे वळलं. नाटक लिहिण्यासाठी आवश्यक ती मानसिक तयारी, अभ्यास, त्याचं क्राफ्टिंग हे कुठून निर्माण होतं, याचा वेध घ्यायचा प्रयत्न करू लागलो. या वाचनात हाती लागलेलं आणि सर्वांत प्रभावित करून गेलेलं पुस्तक म्हणजे विजया मेहता यांचं झिम्मा- गोफ आठवणींचा’…

विजया मेहता यांचा नाट्यसृष्टीतला दबदबा सर्वांना माहितीच आहे. त्यांची हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, महासागर, पुरूष, मुद्राराक्षस, शाकुंतल यांसारख्या नाटकांबद्दल मी ऐकलं बरंच काही होतं. पण मला स्वतःला त्यांचं कुठलंही नाटक पाहायची संधी मिळाली नव्हती. बाई या उल्लेखासोबत असणारा दरारा माझ्या परिचयाचा होता. विक्रम गोखले, नाना पाटेकर यांसारखे नाट्यसृष्टीतली तालेवार मंडळी ज्यांचं नाव घेताना कानाच्या पाळीला हात लावतात, बाईंनी आम्हाला घडवलं असं दिमाखाने सांगतात, त्या बाई मुळात कशा घडल्या हे जाणून घ्यायची उत्सुकता मला होतीच. पण झिम्मा पुस्तकाने मला केवळ उत्सुकता शमवली नाही, तर विलक्षण अनुभुती दिली. झिंग म्हणजे काय आणि तिची नशा काय असते, याचा अनुभव वाचनातून आला. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. रंगभूमीचा अभ्यासही या पुस्तकातून घडला. हा इतरवेळी रंगभूमीशी संबंधित इतर अभ्यासग्रंथ वाचूनही झाला नसता.

झिम्मा- गोफ आठवणींचा या पुस्तकात नाट्यसृष्टीत वावरताना अनुभवास अलेले जादुई क्षण बाईंनी शब्दबद्ध केले आहेत. वाचताना पहिल्यांदा प्रभावित करून गेलेली गोष्ट म्हणजे विजयाबाई या माझ्या आजीच्याच वयाच्या. गिरगावातल्या मराठमोळ्या संस्कृतीत लहानाच्या मोठ्या झालेल्या... माझ्या आजीसारख्याच. मात्र तरीही किती विलक्षण जीवन जगलेल्या... अत्यंत समृद्ध आयुष्य विजयाबाई जगल्या आहेत. समाधान, समाधान असं आपण म्हणतो, ते नेमकं गवसतं कसं? ते या पुस्तकात जाणवलं. सुखी माणसाचा सदरा असेल वा नसेल, सुखी स्त्रीच्या साडीचा पदर मात्र पुस्तकात  जाणवला. विजयाबाईंच्या आयुष्यात दुःख आलंच नाही, असं नाही. अवघ्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरवलं. तरुण वयात दोन मुलं पदरात टाकून पती अचानक संसार अर्धवट सोडून देवाघरी गेला. खरंतर हे किती मोठे आघात... पण यातून सावरून स्वतःचं आयुष्य कसं बाईंनी घडवलं, ते या पुस्तकात प्रभावीपणे मांडलं आहे. पुस्तकात बाई भेटतात त्या तीन नावांनी... ही तीन नावं म्हणजे तीन कालखंडाचं प्रतिबिंब आहे. तीन पिढ्यांची प्रगल्भतेकडे होणारी वाटचाल आहे. यात बाईंना भेटलेल्या विविध लोकोत्तर मंडळींचा सहभाग आहे. आधी बेबी, मग विजू जयवंत, त्यानंतर विजया खोटे, या ही पुढे विजया मेहता आणि सार्वकालिक बाई अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाची विजयाबाईंनी आपल्या आत्मचरित्रात हातचं राखून न ठेवता ओळख करून दिली आहे. हातचं राखलं, तरी अपूर्णत्व यात नाही. मी या आधी वाचलेल्या अनेक आत्मचरित्रांनी मला असमाधानाचाच अनुभव दिला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या गिरीश कार्नाड यांच्या खेळता खेळता आयुष्य या आत्मचरित्राने माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा नवे प्रश्नच मनात निर्माण केले. अगदी अमिताभ बच्चन, शाहरुख खानसारख्या सुपरस्टार्सचं चरित्र वाचतानाही बऱ्याचशा गोष्टी दडवल्या गेल्याचं लक्षात येत होतं. आपली इमेज संभाळण्याचा सोस बाळगून चरित्र लिहिलं की अशी गल्लत होते. त्यापेक्षा आपण केलेल्या चुकीचं समर्थन आपल्या चरित्रात केलं, तर खपून जातं. निदान आपल्यापुरता लेखक प्रामाणिक राहून आपली भूमिका मांडत असतो. (कधी कधी तेवढ्यासाठीच त्याने चरित्रप्रपंच मांडला असतो.)      

बाईंच्या चरित्रात इमेज संभाळण्यापेक्षा नाटकातल्या बॉडी इमेजेस कशा मिळवाव्यात, याचं यथार्थ वर्णन मिळतं. आपल्या प्रत्येक वागण्यामागचे विचार बाईंनी परखडपणे मांडले आहेत. नॉट विदाऊट माय डॉटर, अमार मेयाबेल आणि अशी अनेक अफगाणी, इराणी, पाकिस्तानी स्त्रियांची संघर्षात्मक चरित्रं मी वाचली. प्रभावितही झालो. पण कट्टर मुस्लिम राष्ट्रांमधल्या अपवादात्मक बंडखोर स्त्रियांसारख्या बाई नसूनही त्या तितक्याच बंडखोर वाटतात. स्त्री मुक्ती आंदोलनात सहभागी नसूनही स्त्री मुक्तीचे धडे आपल्या आत्मचरित्रातील पाना पानांत मांडतात... ते ही स्वतः अनुभवलेले. केवळ प्रमेयरुप नव्हे. एक मराठी बुद्धिवादी स्त्री कुठलाही मोठा संघर्ष न करता आपल्या मध्यमवर्गीय संस्कारांतून एक विश्व निर्माण करते. अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचं घराणं निर्माण करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या नावाचा ठसा उमटवते, हे विलक्षण वाटतं. ती गरीब घरात जन्म घेऊन संघर्ष करत त्या पदापर्यंत पोहोचलेली नाही. ती तोंडात चांदीचा चमचाही घेऊन जन्माला आली नाही. पण तिच्यावर संघर्षाची वेळही येऊ नये, म्हणजे नशिबालाही काय दरारा जाणवत असेल या स्त्रीचा? याचं आश्चर्य वाटतं. जीवनाकडे बघताना ती स्त्री काळाच्या बरीच पुढे होती. हे मला जास्त भावलं. मराठी आणि अमराठी वादावर जिथे आजही राजकारण तापतं, तिथे बाई दोन्ही संस्कृतींमध्ये सहजपणे सामावून जातात, चपखल बसतात. एवढंच नव्हे, तर आपली दखल घ्यायला भाग पाडतात.

मराठीतील आद्य आत्मचरित्र स्मृतिचित्रेमधील लक्ष्मीबाई या पारतंत्र्यातील सनातन, सोवळ्या घरातील सवाष्ण महिला... पतीच्या चंचल, लहरी निर्णयांचा सोवळ्या मनावरचा परिणाम त्यांच्या लिखाणात आहे. विजयाबाईंचा काळ बराच नंतरचा... पण जुन्या चालीरीतींची सावली बाईंच्या बालपणावर आहेच. बाईंचा काळ म्हणजे कालखंडाचा भव्य पट पाहिलेल्या पिढीचा. ज्यांनी दुसरं महायुद्धही अनुभवलं, स्वातंत्र्य पाहिलं, नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाची पहिली पिढी म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं, अशा महिला... बाईंचं आयुष्य किती समृद्ध? जमिनदार घराणं. एकीकडे भक्तांनी वेढलेले बुवा बनून गेलेले काका, तर दुसरीकडे तुझ्या कामाची जबाबदारी देवाची नाही, तर तुझीच असा पुरोगामित्वाचा धडा शिकवणारे नानासाहेब रानडे, एकीकडे आजीचं लाल अलवणं तर दुसरीकडे राष्ट्रसेवादलाची खादी. नलिनी जयवंत, शोभना समर्थ, नुतन, तनुजा अशा प्रख्यात अभिनेत्रींशी आई- वडिलांकडून वारशाने मिळालेलं नातं असूनही त्यांचा फार कमी प्रभाव पडलेल्या बाई, तर पं. जवाहरलाल नेहरूंच्या हलक्याशा स्पर्शासाठी धावपळ करणाऱ्या जबरदस्त फॅन बाई...


पुढे पुढे तर बाईंच्या आयुष्यातील अशा विविध गोष्टींचा अवाका एवढा वाढत गेला आहे, की थक्क व्हायला होतं. त्यांची सकाळ साहित्य संघात गणपतराव बोडस, केशवराव दाते यांसारख्या नटश्रेष्ठांसोबत, दुपार इब्राहिम अल्काझींसारख्या दिग्गज पाश्चात्य शैलीच्या दिग्दर्शक गुरुंसोबत तर संध्याकाळी चौपाटीवरची भेळ साक्षात पु.ल देशपांडे आणि सुनीता ताईंसोबत... जगातलं कुठलं व्यक्तिमत्व विकास शिबिर याहून चांगलं ग्रुमिंग करू शकेल?  असं भाग्य असावं... अभिनयाचं शिक्षण, दिग्दर्शनाचे धडे अल्काझी, आदी मर्झबान, दुर्गाबाई खोटे यांच्याकडून.. आणि लग्नाची वेळ आल्यावर कुठलंही प्रेमप्रकरण न घडता किंवा अडचण न येता थेट दुर्गाबाईंच्या सुविद्य आणि सुशील मुलाशी अरेंज्ड मॅरेज... कुठे आधुनिक, तर कुठे पारंपरिक स्त्री अशी विजयाबाईंची प्रतिमा... संभ्रमात टाकण्यापेक्षा कौतुकास्पद वाटते.

वयाच्या एकविसाव्या वर्षीच खुद्द विजय तेंडुलकरांकडून त्यांना मिळालेली बाई ही पदवी त्यांच्या प्रतिभेची साक्ष देते. रंगायन चळवळीच्या आठवणींबद्दल बोलताना तर लुचत असलेलं बाळ मध्येच थांबून मातेकडे जसं गोडसं हसत पाहातं, तसं त्या पाहातात. वाद विवाद एखादी नाट्यसंस्था कशी फोडतात, हे मराठी रसिकांसाठी नवीन नाही. तरीही मराठीत एक नाट्य चळवळ उभी करणं, तिचं कणखर नेतृत्व करणं, या गोष्टी बाईंबद्दलचा आदर वाढवतात. पुन्हा या संस्थेच्या परिसरात त्यांच्या तालमी पाहायला येणारे लोक तरी कोण?... भारतरत्न पं. रवीशंकर, संतुरवाद पं. शिवकुमार शर्मा!...मराठी रंगभूमीवर रेनसां निर्माण करणाऱ्या बाईच. विवाह होऊन जमशेदपूरला बाई गेल्या आणि नाटकांशी संबंध तुटला, असं एखाद्या गृहिणीला शोभणाऱ्या  घटनेतूनही बाईंच्या आयुष्यातील वेगळेपणा भावतो. जमशेदपुरात नाटक करणं, ते ही टाटा मोटर्सचे बेताज सर्वेसर्वा सुमंत मुळगांवरांच्या सांगण्यावरून!... पत्नी नाटकांशिवाय तळमळतेय, हे लक्षात येताच तिच्यासाठी पुन्हा मुंबईला बस्तान हलवणारा, प्रसंगी नोकरी बदलणारा पती हिरेन... 

वयाच्या अठराव्या वर्षी आपलं कार्यक्षेत्र सरकारी नोकरी किंवा सिनेमा इंडस्ट्री नसून नाट्यक्षेत्र आहे, याची झालेली जाणीव ही बाबच विजया बाईंच्या स्पष्ट विचारपद्धतीची जाण देते. नाट्य क्षेत्रातले त्यांनी लिहिलेले एकेक अनुभव तर अफाटच... 

गो.नी.दांची शितू साकारताना त्यांनी शोधलेली बॉडी इमेज आणि त्यानंतरच्या अनेक नाटकांमध्ये (संध्याछाया, हमिदाबाईची कोठी इ.) आपली बॉडी इमेज शोधण्याचा प्रयत्न हा नवोदितच नव्हे, तर कसलेल्या रंगकर्मींनाही वस्तुपाठ ठरावा असा. प्रायोगिक मराठी रंगभूमीवर सशक्त वावर सुरू असतानाच लोकमान्य रंगभूमीकडे (व्यवसायिक किंवा धंदेवाईक शब्दाला इतका सकारात्मक शब्द फक्त बाईंनाच सुचू शकतो.) बाई आल्या. आणखी एक नवा प्रवास सुरू झाला. या रंगभूमीवरही बाईंनी अनेक तगडी नाटकं सादर केली. हमिदाबाईची कोठी सारखं नाटक असो वा बॅरिस्टर, जास्वंदी असो वा संध्याछाया... अभिनेत्री म्हणून त्यांचा अवाका आणि दिग्दर्शिका म्हणून त्यांची हुकुमत पुस्तक वाचतानाही प्रत्ययाला येते. विजय तेंडुलकरांसारख्या लेखकाला ओळख मिळवून देण्याचं काम बाईंनी केलं. तर लोकमान्य रंगभूमीवर एक पर्व त्यांनी निर्माण केलं. सशक्त अभिनय करणाऱ्या दमदार कलाकारांची फौज बाईंनी तयार केली.

मराठी रंगभूमीसोबतच इंग्रजी आणि जर्मन रंगभूमीवरही बाईंचा दरारा कायम राहिला. पु.ल. देशपांडेंची लाघवी नाटकं करत असताना एकीकडे ब्रेख्तसारख्या नाटककाराला मराठी मातीत रुजवण्याचं कार्य त्यांनी केलं. मराठीच्या बंदिस्त नाट्यगृहात न अडकता ग्रीक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन रंगभूमीलाही सहज गवसणी घातली. पायाखाली मराठी माती असली, तर आकाशाला सीमा नव्हती. थिएटर ऑफ अॅब्झर्ड करण्याची हिंमत त्यांनी दाखवली. सार्त्र, बेकेटची नाटकं जी जगभरातल्या भल्याभल्यांना चकवतात, त्याच्यात काम करण्याची संधी बाईंना मिळाली. दुसरे पती फारोख मेहतांसोबत इंग्लंडला वास्तव्यासाठी गेल्यानंतर तर ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवत बाईंनी जागतिक रंगभूमीचं साक्षेपी ज्ञान मिळवलं. मुख्य म्हणजे चरित्रात पाश्चात्य कसे चांगले आणि आपण किती मागे अशा पद्धतीचा निरर्थक तौलनिक अभ्यास न करता त्या जागतिक रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी यांच्यातल्या दुवा बनल्या. विजया बाई नामक पुलावरून मराठीतील तमाशा प्रकार ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेला. कुडियाट्टी हा केरळी प्रकार जर्मन थिएटरमध्ये सादर झाला. मुद्राराक्षस, शाकुंतलसारखी एतद्देशीय संस्कृत नाटकं जर्मन भाषेत सादर झाली, गाजली. आधुनिक भारतातील महत्वाचे नाटककार, ज्यांचा अमरीश पुरी तत्वज्ञ नाटककारअशा उल्लेख करत, त्या गिरीश कार्नाडांचं हयवदन आणि नागमंडल त्यांनी जर्मनीत सादर केली. वास्तविक मी ही नाटकं वाचली होती. पण काही केल्या मला या नाटकांचा रंगमंचीय अविष्कार डोळ्यांसमोर आणता येत नव्हता. विजयाबाईंनी केवळ तो कसा सादर केला, एवढंच या पुस्तकात लिहिलेलं नाही, तर त्याचे अर्थ बाईंनी प्रकट केले. पारंपरिक कथांमधलं नाट्य आणि त्यांना समकालीन संदर्भ देणं, बिटवीन द लाईन्स शोधणं, याचं भान मला हे पुस्तक वाचताना आलं. ऑक्सफोर्डमध्ये शिकताना आलेले अनुभवच बाईंनी शब्दबद्ध केले नाहीत, तर तेथील शिक्षणही आपल्या आत्मचरित्रामार्फत भावी रंगकर्मींना दिलं आहे. सरधोपट पद्धतीचा अभनय आणि आडतालातला अभिनय त्यांनी फोड करून सांगितला. विसंगत अभिनयातील ताकदही दाखवली. संवाद म्हणजे हिमनगाचं टोक असतं, खरा भावनांचा पर्वत मनात उभा करायचा असतो, तो ही केवळ पात्रांपुरताच, हे ज्ञान यथार्थ आहे. केवळ आपल्या यशस्वी नाटकांबद्दल लिहून अपयशी नाटकांकडे डोळेझाक बाईंनी केली नाही. तर अयशस्वी झालेल्या नाटकांची कारणमीमांसा शोधणारं स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिलंय. हे प्रकरणही नाट्यशिक्षणाच्या अभ्यासक्रमात वापरावं, इतकं जबरदस्त आहे. अनेकांशी मतभेद, वाद होऊनही बाईंनी संबंधित व्यक्तींबद्दल आकसानं न लिहिता वादाचं स्वरूप सांगत संबंधित व्यक्तींबद्दल आत्मियतेनेच लिहिलं आहे. आपल्या चरित्राला वादांचं गालबोट लागू दिलं नाही. त्यामुळे आठवणींचा गोफ हा गोफच राहिला आहे. इतरांवर डागणारी तोफ झाला नाही.

बाईंचा जन्म हा नाटकासाठीच झाला आहे, हे त्यांच्याबद्दल वाचताना जाणवलं. बाळंतीण होईपर्यत आणि बाळंतीण झाल्यावर १२-१५ दिवसांत तालमीला उभं राहाणं बाईंमध्ये असलेली झिंग दाखवतं. इतकंच नव्हे तर पती निधनानंतरही घटकाभर वियोगानंतर पुन्हा रंगमंचावर उभं राहाणं, हे बाईंचं केवळ व्यावसायिक शिस्तच नव्हे, तर भक्तीभाव दर्शवतं. पतीच्या मृत्यूनंतरही जेव्हा बाई पहिल्यांदा रडल्या, त्या घरात नाही, तर रंगमंचावरच्या प्रोसिनियम आर्कमध्ये परफॉर्म करताना... बाईंचे अश्रूही नाटकाच्या पात्राला मिळाले. ही उदाहरणं बाईंच्या व्यक्तिमत्वाची शक्ती दाखवण्यास पुरेशी आहेत. अशा एक दोन नव्हे, तर असंख्य अनुभवांचा गोफ झिम्मा पुस्तकात वाचायला मिळतो. एका अजस्त्र अनुभवाला सामोरं गेल्याची भावना जागी होते. एका सुखवस्तू बाईची प्रतिभा तिला किती रम्य अनुभवांच्या लाटांवरून फिरवते, याचा प्रत्यय येतो. ज्यातला थेंबभर अनुभव आपल्याला मिळावा, अशी आपण मनिषा बाळगतो, त्या अनुभवांचा महासागर बाईंकडे आहे.
 
बाईंना जर्मन सरकराकडून फ्रेंड ऑफ पीपल्स हा अद्वितिय सन्मानही प्राप्त झाला. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या अशियाई नागरीक... जर्मनी हे तर त्यांचं माहेरच बनलं. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये लेटर्स टू डॉटर्सचा अद्भुत प्रयोग त्यांनी केला. फ्रेंच महाभारतासाठी पीटर ब्रुकच्या खांद्याला खांदा लावून इतिहास घडवला.   

नाटकांपलिकडे जात बाईंच्या आयुष्यातलं माध्यमांतरही तितकंच प्रभावी आहे. स्मृतीचित्रेवर सिनेमा बनवण्यासाठी त्यांना सल्ला देतात, ते साक्षात व्ही. शांताराम... सिनेमाचं शिक्षण घ्यायला जावं, तर थेट श्याम बेनेगल सारखे दिग्दर्शक लहानशी भूमिका करत तंत्र शिकून घे अशी ऑफर देतात... यांसारखे अनुभव किती व्यापक स्तरावर घेऊन जाणारे असतात, याची झलक झिम्मा वाचताना मिळते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं त्यांनी भूषवलेलं चेअरमन पद असो, वा १२ वर्षं एन.सीपी.ए सारख्या संस्थेची वाहिलेली धूरा असो. बाई या तितक्याच प्रभावी आणि कणखर असल्याचं जाणवतं. यासाठी कुठल्याही स्त्री लेखिकेप्रमाणे त्यांनी स्त्री मुक्ती, बंडखोरी अशा शब्दांचा आधार घेतलेला नाही. एक व्यक्ती म्हणून कशा रीतीने त्या समृद्ध होत गेल्या, जगण्याला कशा रीतीने भिडल्या याचीच माहिती दिली आहे.
दुःख त्यांच्या वाट्याला आलीच नव्हती, असं नाही, पण पतीच्या मृत्यूनंतर कामामध्ये स्वतःला झोकून देणं, दुसऱ्या लग्नाचा योग्य निर्णय घेऊन तो इतरांचा नकार झेलत पूर्ण करणं आणि त्यातून पुन्हा संसारी स्त्री आणि रंगकर्मी अशी तारेवरची कसरत करणं हे बाईंच्या बहुआयामी व्यक्तित्वाचं लक्षण प्रकर्षाने जाणवतं.

सर्व लिखाणात मला आवडलेली गोष्ट म्हणजे लिखाणाचं झालेलं संपादन. अंबरीश मिश्रंचं याबद्दल कौतुक. लिखाणाची शैली, त्यातली घटनांची मेख. कधी नाट्य प्रवास आणि त्यात इतर गोष्टी विसरण्याच्या आतच पुन्हा लिहिलेल्या कौटुंबिक आघाडीवरच्या घटना. काही सुसंस्कृत मराठीतले काळाआड लोप पावत असलेले शब्द, अजिबात बोजड न होता गप्पांमध्ये रंगावी तशी भाषा... त्यात बासुंदीचा गोडवा चाखताना दाताखाली बदाम येऊन मजा द्यावी, तसा येणार एखादा उर्दू शब्द... भाषेतलं लालित्य पूर्णपणे जपलं आहे.


रंगकर्मींनी हे पुस्तक वाचलं, तर त्यांची रंगभूमीबद्दलची जाण समृद्ध होईल. इतरांनी वाचलं तर एका बाईची झेप किती अफाट असू शकते, याची माहिती मिळेल. झिम्मा नावाचा गोफ विणताना प्रभावित करू शकणाऱ्या घटनांची मालिका आशयघन आणि संपन्न आहेच, पण तितकीच मातीतली आणि बहुपेडी आहे. हे पुस्तक एकदा वाचलं तर अवाक व्हायला होतं. पण पुन्हा पुन्हा वाचलं, की त्यांच्या आयुष्यातल्या कित्येक घटना जगण्याची प्रेरणा देऊ लागतात. जादुई क्षण अनुभवायची झिंग देतात. संघर्षापलिकडे पाहात ध्येय, स्वप्न, ध्यास आणि जगण्याचे क्षण चिरंतन करून जाण्याचं बळ देतात. त्यासाठी हे पुस्तक नुसतं वाचूच नये, तर प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं आहे.

No comments:

Post a Comment